esakal | पाटबंधारे विभागाचे जिल्हा परिषदेकडे अडीच कोटी थकीत

बोलून बातमी शोधा

पाटबंधारे विभागाचे जिल्हा परिषदेकडे अडीच कोटी थकीत
पाटबंधारे विभागाचे जिल्हा परिषदेकडे अडीच कोटी थकीत
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ता. २५ ः ८४ खेडी व ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे जिल्हा परिषदेकडे दोन कोटी ७८ लाख रुपये थकीत आहेत. त्यामुळे सदर रक्कमेचा भरणा न केल्यास दोन्ही योजनांचा पाणीपुरवठा खंडित करावा लागेल, असा इशारा पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषदेला दिला आहे. त्यामुळे सदर योजनांचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे.

पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेल्या पत्रानुसार, ६४ व ८४ खेडी पाणी पुरवठा याेजनांना काटेपूर्णा व वान प्रकल्पातून पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा करण्यात येताे. या पुरवठ्याची माहे फेब्रुवारी २०२१ पर्यंतची थकबाकी २ काेटी ७८ लाख ५१ हजार ८९८ रुपये आहे. थकबाकी त्वरित भरण्यात यावी; अन्यथा नाईलाजास्तव पुरवठा बंद करण्यात येईल आणि त्या परिस्थितीला जिल्हा परिषदच जबाबदार राहाल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवण्यात आल्याने आता पुन्हा एकदा थकीत पाणीपट्टी वसुलीचा विषय चर्चेला आला आहे. जिल्हा परिषदेने ४३ काेटी ५५ लाख ६४ हजार २६६ रुपयांची थकीत पाणीपट्टी वसुलीला सुरुवात न केल्यास पाटबंधारे विभागाला जिल्हा परिषदेला सेस फंडातून थकीत रक्कमेचा भरणा करावा लागेल.