NSS
NSS Sakal
अर्थविश्व

संधी गुंतवणुकीची : घरबसल्या अमेरिकेचा वेध

सुहास राजदेरकर

अमेरिकी शेअर बाजारांमधील शेअरची खरेदी-विक्री आता अधिकच सहजसुलभ झाली आहे.

जगात ‘गुंतवणूक गुरू’ म्हणून प्रसिद्ध असलेले वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे या कंपनीचे शेअर घरबसल्या खरेदी करायचे आहेत?

होय, आता ते सहजशक्य आहे.

अमेरिकी शेअर बाजारांमधील शेअरची खरेदी-विक्री आता अधिकच सहजसुलभ झाली आहे. ‘एनएसई-आयएफएससी’, अर्थात नॅशनल स्टॉक एक्स्चेंज-इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर या एक्स्चेंजमधून हे व्यवहार नुकतेच म्हणजे तीन मार्चपासून सुरू करण्यात आले आहेत. सुरुवातीला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज आणि ‘नॅस्डॅक’ या बाजारांमधील निवडक शेअर खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यानंतर इतर बाजार आणि शेअरसुद्धा सामील केले जातील. सध्या फक्त आठ शेअर खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात अल्फाबेट, ॲमेझॉन, मेटा प्लॅटफॉर्म, नेटफ्लिक्स, ॲपल, वॉलमार्ट, टेस्ला आणि मायक्रोसॉफ्ट यांचा समावेश आहे. लवकरच यामध्ये वाढ करण्यात येणार असून, बर्कशायर हॅथवे, मास्टरकार्ड, व्हिसा, पेपल अशा ५० शेअरचा समावेश असेल. एनएसई इंटरनॅशनल एक्स्चेंज ही नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची उपकंपनी आहे आणि ती गुजरातच्या गिफ्ट सिटी येथे आहे.

कसे करता येतील व्यवहार?

आपल्या बाजारामध्ये जसे शेअर खरेदी-विक्रीसाठी येतात, तसेच अमेरिकी बाजारातील शेअरसुद्धा येथूनच खरेदी करता येतील. सर्वांत प्रथम, तुम्हाला एनएसई-आयएफएससी नोंदणीकृत ब्रोकरकडे ट्रेडिंग आणि डिमॅट खाते सुरू करावे लागेल. सध्या ३६ ब्रोकर या बाजारावर रजिस्टर्ड आहेत. त्यात एचडीएफसी बँक (जी कस्टोडिअन म्हणूनसुद्धा काम पाहणार आहे.), मोतीलाल ओसवाल, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, एडल्वाईज आदींचा समावेश आहे. ही संख्या पुढे वाढेल. खरेदीपूर्वी तुम्हाला त्या ब्रोकरच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे लागतील. तुमचे पैसे डॉलरमध्ये रूपांतरित केले जातील.

खरेदी केल्यावर, तुम्हाला प्रत्यक्ष शेअर न मिळता ‘एनएसई-आयएफएससी रिसीट’च्या स्वरूपात मिळतील. त्यासाठी ठराविक प्रमाण (रेशो) निश्चित केले असेल. जसे, की १ टेस्ला शेअर म्हणजे १०० रिसिट. १ ऍमेझॉन म्हणजे २०० रिसिट, १ मायक्रोसॉफ्ट म्हणजे ५० रिसिट आदी. असे असले तरीही कंपनीने वेळोवेळी दिलेले फायदे, जसे की लाभांश, बोनस आदी तुम्हाला तुमच्याकडील रिसीट स्वरूपात असलेल्या शेअरच्या प्रमाणात मिळतील. देशातील सर्वसामान्य (रिटेल) गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) जारी केलेल्या लिबरलाईज्ड रेमिटन्स योजनेच्या अंतर्गत, एका आर्थिक वर्षात कमाल २,५०,००० डॉलरपर्यंत (सध्याचे साधारणपणे १.९० कोटी रुपये) खरेदी करता येईल. आपल्या आणि अमेरिकेच्या वेळेमध्ये फरक असल्यामुळे, अमेरिकेचा बाजार जेव्हा सकाळी सुरु होतो, तेव्हा आपल्या देशात सायंकाळचे साधारण आठ वाजलेले असतात. त्यामुळे, हे व्यवहार भारतीय वेळेनुसार रोज सायंकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी पहाटेच्या अडीच वाजेपर्यंत करता येतील. तसेच, तेथील बाजार जेव्हा बंद असेल, त्यावेळी आपल्याकडे सुद्धा व्यवहार बंद राहतील.

फायदे काय होतील ?

1) इतर देशातील चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करता आल्यामुळे, गुंतवणुकीत विविधता येऊन एकाच देशामधील गुंतवणुकीतील जोखीम कमी करता येईल.

2) रिसीट पद्धतीमुळे एका शेअरपेक्षासुद्धा कमी खरेदी करणे शक्य.

3) ‘सेबी’ ही नियामक संस्था असून, एनएसई-आयएफएससी, प्रत्येक व्यवहाराची पूर्ण जबाबदारी घेऊन ते पारदर्शक पद्धतीने पार पाडतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना व्यवहारासाठीची जोखीम असणार नाही.

प्राप्तिकर कसा लागू होईल?

या शेअरना परदेशी मालमत्ता समजून कर नियम लागू होतील. दोन वर्षांच्या आत विकलेल्या शेअरवर झालेला नफा तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये मिळविला जाईल व त्या स्लॅबप्रमाणे कर लागेल. दोन वर्षांनंतर विकलेल्या शेअरवरील नफ्यावर २० टक्के दीर्घकालीन भांडवली लाभ कर लागेल, ज्याला ‘इंडेक्सेशन’चा फायदा असेल.

जोखीम काय आहे?

शेअर बाजारामध्ये गुंतवणुकीची जी जोखीम असते ती येथे पण आहे. किंबहुना, बहुतेक गुंतवणूकदारांना बाहेरील देशातील कंपन्या आणि त्यांचे शेअर यांची माहिती आणि ज्ञान आपल्या देशातील शेअरपेक्षा कमी असल्याने यामध्ये जोखीम वाढणार आहे.

तात्पर्य

सध्या बहुतेक ब्रोकरकडून अमेरिकी बाजारातील सर्व शेअर खरेदी करता येतातच. त्यामुळे, एनएसई- आयएफएससीमधून खरेदी केल्याने वेळ किंवा खर्च कमी लागतो का, हा खरा प्रश्न आहे. याचे उत्तर काही काळाने मिळेल. तज्ज्ञांच्या सल्ल्याने, एकूण गुंतवणुकीच्या ५ ते ७ टक्के भाग देशाबाहेरील शेअरमध्ये गुंतवायला हरकत नाही. तसेच, बाहेरील बाजारातील शेअरमध्ये थेट गुंतवणूक करण्यापेक्षा म्युच्युअल फंडांच्या ग्लोबल योजनांचा लाभ घेणे कमी जोखमीचे ठरेल.

(लेखक भांडवली बाजाराचे अभ्यासक आणि गुंतवणूक सल्लागार आहेत. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते, हे लक्षात घेऊन गुंतवणुकीबाबतचे निर्णय वैयक्तिक तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने घेणे अपेक्षित आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT