Ela Bhatt
Ela Bhatt sakal
Blog | ब्लॉग

उत्तुंग समाज कार्यकर्त्या इला भट

विजय नाईक,दिल्ली

`सेवा (सेल्फ एम्पलॉईड विमेन्स असोसिएशन)’ संस्थेच्या संस्थापक व पद्मभूषण इला भट यांचे 2 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे समाजकार्य केवळ भारतापुरते मर्यादित नव्हते. दक्षिण आफ्रिकेतही त्यांनी `सेवा’च्या माध्यमातून तेथील दुर्गम भागातील ग्रामीण महिलांना केवळ चरितार्थाचे साधन उपलब्ध करून दिले नाही, तर त्यांना बचत करावयास शिकविले. बँकातून खाती उघडावयास शिकविले.

दक्षिण आफ्रिकेत साडे तीनशे वर्षांच्या वसाहतवादानंतर राजकीय परिवर्तन झाले ते 1993 मध्ये नेल्सन मंडेला राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यावर. श्वेतवर्णीयांच्या हातून सत्ता कृष्णवर्णीय नेतृत्वाकडे गेली, तथापि, पुढील सुमारे दहा ते बारा वर्ष वांशिक व सामाजिक तणाव कायम राहिला. देशातील आर्थिक परिस्थितीच्या नाड्या बव्हंशी श्वेतवर्णीयांच्या हाती राहिल्या. तेथील परिवर्तनाचे व राजकीय परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी सकाळ तर्फे मी दक्षिण आफ्रिकेत गेलो होतो. त्या काळात सर्वोदयी नेत्या इला भट यांना क्वाझुलू नाताळच्या सरकारने आमंत्रित केले होते.

डर्बनमध्ये त्यांच्याबरोबर माझी भेट झाली. या भेटीचे काऱण विचारता त्या म्हणाल्या होत्या, ``क्वाझुलू नाताळच्या ग्रामीण भागात हस्तकलावस्तू बनविणारे असंख्य आदिवासी पुरूष व महिला कारागीर आहेत. त्यांचे काम पाहण्यास मी आले आहे. त्यांच्यापुढे, प्रश्न आहे, तो त्यांच्या कलावस्तू विकण्याचा. त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यांच्या कलावस्तूंना योग्य किंमत मिळत नाही. कष्ट मात्र भरपूर असतात.

त्यांची राहाणी अत्यंत साधी होती. बोलण्यात मृदुता, दुसऱ्याचे म्हणणे अयकून घेण्यासाठी लागणारी सहनशीलता, महिला कल्याणाची उर्मी, गांधीजींच्या विचारांची बैठक, महिलांना स्वावंलबी करण्याचा घेतलेला वसा, हे सारं काही त्यांच्या ठायी होतं.

इला भट यांच्याबरोबर सेवामधील दोन तीन कार्यकर्त्या होत्या. त्या येण्यापूर्वी मी डर्बनमध्ये काही दिवस राहिलो होतो. शहरांची भ्रमंती करताना रस्त्यांच्या कडेला चटया टाकून त्यावर पसरून ठेवलेल्या छोट्या मोठ्या रंगीबेरंगी मण्यांच्या माळा विकणाऱ्या महिला मी पाहिल्या होत्या. मनगट, दंड, मान, पाय व कमरेवर अलंकार म्हणून घालण्यात येणाऱ्या माळा, धातूंची कडी, बांगड्या आदी वस्तू त्या विकायला ठेवायच्या.

त्यातून होणाऱ्या विक्रीतून व कुटुंबाला आर्थिक हातभार लागत असे. पण, त्याने त्यांच्या कुटुंबाचे भागत नसे. वस्तू विकल्यावर त्या गावाकडे जात व काही दिवसांनी कलावस्तू घेऊन पुन्हा डर्बनमध्ये येत. क्वाझुलू सरकारने भट यांचा सल्ला घेण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी क्वाझुलू नाताळमध्ये झुलूंच्या विरोधी `इंकाथा फ्रिडम पार्टी’ चे राज्य होते, तर इतर राज्यात व केंद्रात मंडेला यांच्या `आफ्रिकन नॅशनल काँग्रेस’ची सत्ता होती.

भट यांनी या कारागिरांना एकत्र करून सरकारच्या साह्याने त्यांची बैठक घेतली व त्यांच्या प्रश्नांवर विचारविनिमय केला. त्यांच्या वस्तूंना किफायतशीर बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची समस्या होती. भट यांनी या कलावस्तूंना दक्षिण आफ्रिकेतील अन्य प्रांतात पाठवून देशातील बाजारपेठेत त्या वस्तू कशा विकता येतील, याचे व्यवस्थापन व तंत्र त्यांना सांगितले. तसेच, देशाबाहेर आफ्रिकेतील इतर राष्ट्र व युरोपात त्यांची विक्री करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करावे लागतील, याचे मार्गदर्शन केले. महिला कारागिरांना संघटित केलं. त्यासाठी भट काही दिवस तेथे राहिल्या व नंतर अधुनमधून त्या डर्बन ला भेट देत होत्या.

कलावस्तू तयार करणाऱ्यात प्रामुख्याने खोसा, एन्डेबेले, स्वाझी, त्सोंगा, वेंडा, बापेडी, बात्सवाना, बासोथो हे वांशिक गट असून, या सर्वांचे प्रश्न जवळजवळ समान आहेत. कलावस्तू तयार करण्याचे काम पुरुष तसेच प्रामुख्याने महिला करतात.

इला भट यांनी `अनुबंध’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. तीनुसार, ग्रामीण भागातील लोकांना लागणाऱ्या जीवनावश्यक गरजा ( अन्न, निवारा, कपडे, प्राथमिक शिक्षण व प्राथमिक आरोग्य) त्या परिसराच्या शंभर मैल परिघात उपलब्ध करून देणे, हे उद्दीष्ट होते. त्यांना त्या `शंभर मैलाचा समुदाय’ असे म्हणत. त्या सर्वोदयी व गांधीवादी होत्या. ``गावांचा विकास होईल, तेव्हाच देशाचा विकास होईल,’’ असे गांधीजी म्हणत. त्याचाच धागा पकडून इलाबेन यांनी महिलांना स्वावलंबी करून ग्रामविकासाची कल्पना राबविली. तरीही देशातील बव्हंशी ग्रामीण भाग हा विकासापासून आजही वंचित आहे.

दक्षिण आफ्रिकेतील इला भट यांच्या कार्यात नंतर भर घातली त्या `दस्तकारी हाट समिती’च्या जया जेटली यांनी. त्यांनी `आफ्रिखादी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. `आफ्रिखादी’ म्हणजे उच्च प्रतीची भारतीय खादी व दक्षिण आफ्रिकेतील आदीवासी कलांचा संगम. याचा अर्थ खादीचे उत्तमोत्तम कपडे तयार करताना त्यात रंगीबेरंगी मणी, धातूंची कलाकुसरी करून त्यांची विक्री करणे. पुढे `आफ्रिखादी’ला युरोपातून मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ मिळाली. परिणामतः ज्या वस्तू दक्षिण आफ्रिकेत पाच चे दहा रँड्स ला (एक रँड बरोबर 4.67 भारतीय रुपया) विकल्या जात, त्या शंभर ते दिडशे पौंड व युरोला विकल्या जाऊ लागल्या. त्याचा मोठा आर्थिक लाभ या गटांना मिळाला. देशातील महिलांप्रमाणेच, दक्षिण आफ्रिकेतील आदीवासी कलाकार महिलांच्या गटात इला भट यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shrikant Shinde: एक ठाकरे धनुष्य बाणाला तर दुसरे ठाकरे हाताच्या पंजाला करणार मतदान, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

Wagholi Accident: नवीन कारचा आनंद काही काळच टिकला! पुण्यात भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

SCROLL FOR NEXT