कोकण

नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

CD

नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
रत्नागिरी ः राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे गरजेचे असल्याच्या सूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या आहेत. तसे न केल्यास संबंधित महाविद्यालयांना येणार्‍या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ६० टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन झालेले नाही. राज्यातील नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे अन्यथा मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे त्या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रिया सर्व महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे या आदेशात सांगितले आहे. राज्यातील विनाअनुदानित २१४१ महाविद्यालयांपैकी केवळ १३८ महाविद्यालयांचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्याचे समोर आल्याने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने या विषयी गंभीर होऊन निर्देश दिले आहेत.
----
पावसाच्या हलक्या सरींची शक्यता
रत्नागिरी ः भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) निरीक्षणानुसार, मार्चमधील उन्हाच्या झळांची तीव्रता कोकणात जाणवू लागली आहे. रविवारपासून कोकण आणि गोव्यात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. कोकण आणि गोव्यात तुरळक तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) अंदाज व्यक्त केला आहे. किनारपट्टी भागात सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुपारनंतर आकाश ढगाळ असेल तसेच विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज आहे. सोमवारी सकाळी रत्नागिरीच्या विविध भागात तापमान वाढले असून सकाळच्या सत्रात ३५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. रात्रीच्या कमाल तापमानातही वाढ झाली. दरम्यान, रविवारी रात्री कमाल तापमान २७ ते २८ अंशाने वर-खाली सरकत होते.
-------

खोकला व तापाचे रुग्ण वाढताहेत

रत्नागिरी ः गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात इन्फ्लुएन्झा-ए या विषाणूचा उपप्रकार असलेल्या एच-३ एन-२ चा झपाट्याने प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, खोकला आणि तापाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातही खोकल्याचे रुग्ण वाढले असून, रुग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी केले आहे. ‘आयसीएमआर’चे वैज्ञानिक श्वसनाशी संबंधित उद्भवणार्‍या या आजाराकडे विविध विषाणू संशोधन प्रयोगशाळा माध्यमांतून लक्ष ठेवून आहेत तसेच या विषाणूच्या संसर्गात अँटिबायोटिकचा अतिरेक करू नये, रुग्णांची तपासणी करून गरज असेल तरच त्याचा वापर करावा, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केल्या आहेत. तापमानात अचानकपणे झालेली वाढ यामुळे ताप, सर्दी यातून खोकला असा संसर्ग होत आहे. कोरोना काळात ज्या पद्धतीने सर्दी, खोकला, ताप आल्यावर काळजी घेतली जात होती त्याप्रमाणे प्रत्येक रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
------

माती नमुना प्रशिक्षण प्रत्येक गावात

रत्नागिरी ः शेतकर्‍यांच्या अवाजवी खर्चाची बचत व्हावी आणि मातीसुद्धा पुढील पिढीसाठी सुपिक राहावी यासाठी प्रयत्न म्हणून कृषी विभागाच्या सलग्न उपक्रमांतर्गत कृषी सारथीचे पथक १५ मार्चपासून प्रत्येक गावात माती नमुना कसा घ्यायचा याचे प्रशिक्षण देणार आहे. माती परीक्षणाची गरज आणि फायदे शेतकर्‍यांना समजून सांगण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात माती परीक्षण अहवाल शेतकर्‍यांना घरपोच आणून देण्यात येणार आहे. वर्षभर त्या माती परीक्षण अहवालानुसारच खते, कीटकनाशके बियाणे यांचे नियोजन कसे करता येईल याचं मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
------

दिव्यांग खेळाडूंची राज्य कबड्डी स्पर्धा

खेड ः दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान संस्थेच्यावतीने २२, २३ एप्रिलला महाराष्ट्रातील दिव्यांग कबड्डी खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी कोकणातील व रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन खेड येथे करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या अस्थिव्यंग दिव्यांग कबड्डी खेळाडूंना कबड्डी स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Lok Sabha Result: अयोध्येत श्रीरामाचा आशीर्वाद समाजवादी पार्टीला! भाजपच्या उमेदवाराचा मोठा पराभव

Thane Loksabha Result: शिंदेनी बालेकिल्ला ठेवला शाबूत; नरेश म्हस्केंना विचारेंचा केला दणदणीत पराभव!

INDIA vs NDA: सगळे भाजप-भाजप करत होते पण 'या' एकाच पठ्ठ्याचे अंदाज ठरले खरे

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

India Lok Sabha Election Results Live : अधीर रंजन चौधरी यांचा पराभव, युसूफ पठाणचा विजय

SCROLL FOR NEXT