rat18p12.jpg-
78313
चिपळूण : एनडीआरएफकडून येथील जलतरण तलावात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
-rat18p13.jpg-
78314
कालुस्ते येथील विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देताना एनडीआरएफचे टीम कमांडर प्रमोद राय.
------------------------
एनडीआरएफकडून विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
बचावकार्यात स्थानिकांचा सहभाग वाढवण्यावर भर; २४ तास जिल्ह्यावर लक्ष
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ : पूर आणि अतिवृष्टीच्या काळात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत स्थानिकांना तातडीने मदतकार्य कसे करावे, दरड कोसळली किंवा एखादा अपघात झाल्यास कशा प्रकारे बचाव मोहीम राबवावी, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण चिपळुणात दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाकडून नागरिकांना देण्यास सुरुवात झाली आहे. आजचे विद्यार्थी भविष्यातील नागरिक असणार आहेत. त्यामुळे त्यांनाही आपत्तीला कसे सामोरे जावे, याचे संस्कार एनडीआरएफच्या टीमकडून प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिले जात आहे.
चिपळूणमध्ये दरवर्षी येणाऱ्या महापुराच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून एनडीआरएफचे पथक पाठवले आहे. २७ मे २०२५ रोजी चिपळूणमध्ये दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाकडून चिपळूण शहर, खेर्डी, कालुस्ते, मिरजोळी, उक्ताड, पेढे, कळंबस्ते, वालोपे परिसरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शालेय सुरक्षा कार्यक्रमांतर्गत आपत्तीतील बचाव कार्याची माहिती दिली जात आहे.
याबाबत माहिती देताना एनडीआरएफचे येथे दाखल झालेले टीम कमांडर प्रमोद राय म्हणाले, जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तींबरोबरच रस्ते अपघात, पाण्यात बुडून मृत्युमुखी, वाहून जाणे, दरीमध्ये कोसळणे, वणवे लागणे, कंपन्यांमध्ये आग लागणे, अशा घटना सातत्याने घडत असतात. या घटनांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात बचाव मोहीम राबवणे खूपच गरजेचे असते. यातून जीवितहानी टाळण्यास मदत होते. यासाठी गावातील तरुण पुढाकार घेऊन ही मोहीम राबवतात; मात्र अनेकवेळा त्यांना योग्य प्रशिक्षण नसल्याने अडचणी येतात. काही वेळा बचाव कार्यातील तरुणाला प्राण गमवावा लागतो. असे होऊ नये म्हणून मदतीसाठी जाणाऱ्यांना बचाव कार्याची माहिती असावी यासाठी एनडीआरएफच्या पथकाचे प्रशिक्षण उपयोगी पडते. त्यामुळे जिल्ह्यात दुर्गम भागात एखादी दुर्घटना घडली तर स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिकांनी बचाव कार्य कसे करावे, याचे प्रशिक्षण आम्ही देत आहोत.
शालेय विद्यार्थ्यांना आज जे शिकवले जाईल ते भविष्यात उपयोगी येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी केंद्राकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत आम्ही शाळा-महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देत आहोत. तसेच आमच्या पथकातील सदस्य गावागावांत जाऊन ग्रामस्थांना बचाव कार्य कसे राबवावे, याबाबतचे प्रशिक्षण देत आहेत.
कोट
शहरातील खेंड-कांगणेवाडी येथे दरडीसह दोन महिन्यांपूर्वी बांधलेली संरक्षक भिंतही कोसळल्याने या भागातील घरांसह एका बहुमजली इमारतीला धोका निर्माण झाला आहे. ही घटना समजल्यानंतर कोणाच्याही आदेशाची वाट न पाहता आम्ही घटनास्थळी पोहोचलो. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याबरोबर घटनेची संयुक्त पाहणी करून चर्चा केली. त्यामुळे या घटनेवर उपाययोजना करणे पालिकेला सोपे झाले.
- प्रमोद राय, एनडीआरएफ टीम कमांडर, चिपळूण
कोट
शहराच्या प्रत्येक प्रभागातील तरुणांना तेथील भौगोलिक परिस्थितीची पूर्ण माहिती असते. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्तीच्या कक्षेत राहणाऱ्या तरुणांचा एक तीव्र प्रतिसाद गट तयार केलेला आहे. या गटाकडे सरकारी अधिकाऱ्यांबरोबरच रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. त्यामुळे बचाव कार्यात स्थानिक तरुणांनी घेतलेली पहिली धाव मोलाची ठरत आहे.
- विशाल भोसले, मुख्याधिकारी, चिपळूण पालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.