निवडणूक पानासाठी
कणकवलीत नव्या चेहऱ्यांमध्ये चढाओढ
उमेदवारीसाठी इच्छुकः खुल्या प्रवर्गात संख्या वाढली
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ११ः येथील नगरपंचायत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्यांची संख्या मोठी आहे; मात्र यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मतदारांनाही पारंपरिक उमेदवारांपेक्षा नवे चेहरे हवे आहेत. येथे खुल्या प्रवर्गातील पाच मतदारसंघांत इच्छुकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना बंडखोरी थोपवणे अडचणीचे ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपंचायतीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार आहेत; परंतु खरी रंगत शहरी भागातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी सुरू झाली आहे. कणकवली विकासाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर असलेले शहर आहे. यात कोणतेही उद्योग व्यवसाय नाहीत, तरीही शहराची वाढती लोकसंख्या आणि शहराचा होणारा विस्तार, यामुळे नागरी सुविधांच्या पातळीवर अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या लढतीत इच्छुकांची संख्या मोठी आहे. नगरपंचायत निर्मितीनंतर पहिले नगराध्यक्षपद संदेश पारकर यांनी सांभाळले. अर्थात तो सुरुवातीचा काळ असला तरी त्यांनी विकासात्मक दृष्ट्या परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. अर्थात याला तशा मर्यादा होत्या. त्यानंतरचा कालावधी हा महिला नगराध्यक्षांनी सांभाळला.
अलीकडच्या पाच वर्षांत समीर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा कारभार हाकला गेला. आतापर्यंत येथे अनेक विकासकामे झाली असली तरी अपेक्षाही वाढल्या आहेत. विशेषतः शहरामध्ये उद्योग व्यवसाय निर्माण व्हावेत, छोट्या व्यवसायांना प्रोत्साहन मिळावे, स्थानिकांना रोजगार मिळावा आणि याबरोबरच नागरी सुविधा अधिक विस्ताराव्यात, असे स्थानिकांना वाटत आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणारे प्रतिनिधी हे पुढच्या काळात नगरपंचायतीचे नेतृत्व करणारे असायला हवेत. वर्षानुवर्षे तेच तेच प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांवर असल्यानंतर विकासाच्या संकल्पनांना मर्यादा येते. त्यामुळे नव्या पालिकेच्या टिममध्ये व्हिजन असलेल्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करू लागले आहेत. इच्छुकांमध्येही नव्या चेहऱ्यांचा भरणा आहे.
शहराच्या १७ प्रभागांचा विस्तार हा वेगवेगळ्या वाडी-वस्तींवर झाला आहे, परंतु सर्वाधिक इच्छुकांची संख्या ही खुल्या झालेल्या पाच प्रभागांमध्ये आहे. यामधील प्रभाग १, ३, १५, १६ आणि १७ यांचा समावेश आहे. येथील इच्छुकांची भाऊगर्दी लक्षात घेता राजकीय नेते जय-पराजयाच्या गणिताबरोबरच उमेदवारांच्या पातळीवर सामाजिक गणिते मांडताना दिसत आहेत.
निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अनेकांनी तयारी केली होती. प्रस्थापित नगरसेवकही इच्छुकांमधून दिसत होते, परंतु अलीकडच्या कालावधीत नव्याने काही उमेदवार इच्छुक झाल्याचे चित्र शहरामध्ये आहे. विशेषतः भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. ठाकरे शिवसेनेकडूनही पूर्वीपासून तयारी सुरू होती. शहरविकास आघाडी झाली नाही तर, नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढती होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
चौकट
अशी सुरू आहे इच्छुकांची मोर्चेबांधणी
इच्छुक आवश्यक कागदपत्रे मिळवण्याच्या कामाला लागले आहेत. त्यांच्याकडून संबंधित प्रभागातील मतदारांच्या याद्या मिळवून त्यावरून राजकीय गणिते मांडली जात आहेत. शहराबाहेर वास्तव्याला असलेले आणि नोकरीनिमित्त विविध शहरांत गेलेल्या मतदारांच्या याद्याही तयार केल्या जात आहेत. त्यांचे मोबाईल क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. आपल्याला मत मिळावे, यासाठी प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आतापासून तयारी सुरू केली आहे. तसे पाहता, बहुतांशी प्रभागांमध्ये ७०० ते ८०० इतकेच मतदार आहेत. त्यामुळे साधारण साडेचारशे ते पाचशे मतदारांशी संपर्क साधून जास्तीत जास्त मतदान कसे मिळेल, असा प्रयत्न इच्छुकांकडून सुरू झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.