30857
कला महोत्सवांमुळे संस्कृतीचे जतन
जिल्हाधिकारी धोडमिसे ः मळगाव येथे ‘लोक-सिंधू’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ ः लोक-सिंधू महोत्सव हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. यामुळे स्थानिक कलाकारांना संधी आणि स्थानिक खाद्यपदार्थांना बाजारपेठ मिळणार आहे. संस्थेने सिंधुदुर्गची सांस्कृतिक नाळ घट्ट जपली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मळगाव येथे केले.
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी, साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव-सावंतवाडी येथे १३ मार्चपासून तीन दिवसीय ‘लोक-सिंधू’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हाधिकारी धोडमिसे यांच्या हस्ते झाले.
व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीच्या संचालिका सई ठाकूर-बिजलानी, संचालक पंढरी परब, गजानन धामणेकर, दामोदर वागळे, सल्लागार प्रीतम बिजलानी आणि पत्रकार शेखर सामंत उपस्थित होते. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘सिंधू सुंदरी’, ‘फॅशन शो’ आणि ‘खेळ पैठणीचा’ यांसारखे विविध सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा झाल्या. शेखर सामंत यांनी, जिल्ह्यातील युवकांचे स्थलांतर रोखण्यासाठी कौशल्यावर आधारित शिक्षणाची गरज आहे. याचा फायदा भविष्यात पर्यटनासाठी होईल, असे सांगितले. पंढरी परब यांनी, आज महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्लीत २१३ शाखांमार्फत ११ हजार कोटींच्या ठेवींचा टप्पा संस्थेने ओलांडला आहे, असे सांगितले.
या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात मूर्तिकार विलास माळगावकर, प्रगतिशील शेतकरी प्रमोद दळवी, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे (सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान), सतीश बागवे (सामाजिक बांधिलकी), सुहानी गावडे (सरपंच, विलवडे) उद्योजक रघुवीर मंत्री, सुधीर नाईक, बादल चौधरी, विराज मडकईकर यांचा समावेश होता. बादल चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. साक्षी मयेकर यांनी आभार मानले. महोत्सवातील खाद्य स्टॉल्स आणि पुस्तक प्रदर्शनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.