रोहिणी गुराम यांचा खुनी
न पकडल्यास उपोषण
गुरामवाडी ग्रामस्थांचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १६ : गुरामवाडी (ता. मालवण) येथील रोहिणी गुराम यांचा त्यांच्या राहत्या घरी खून होऊन चार महिने उलटले, तरी अद्याप पोलिसांना खुनी सापडलेला नाही. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या १५ दिवसांत, म्हणजेच २ एप्रिलपर्यंत खुन्याला अटक न झाल्यास कट्टा पोलिस ठाण्यासमोर उपोषणास बसण्याचा इशारा गुरामवाडी ग्रामस्थांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना आज निवेदनातून दिला.
गुरामवाडी येथील ग्रामस्थ बाळ महाभोज, सुनील गुरव, शेखर पेनकर, अरुण गुरव, स्मिता गुराम यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांची भेट घेऊन रोहिणी यांच्या खुनाबाबत त्यांचे लक्ष वेधले.
गुरामवाडी येथील ६५ वर्षीय रोहिणी यांचा १० नोव्हेंबर २०२५ ला सकाळी दहाच्या सुमारास राहत्या घरी एका अनोळखी व्यक्तीने खून केला होता. त्या दिवशी रोहिणी या कारणेवाडी शाळेत मुलांच्या पोषण आहारासाठी गेल्या होत्या. त्या घरी परतण्यापूर्वीच चोरीच्या किंवा खुनाच्या हेतूने एका अनोळखी व्यक्तीने घराच्या मागच्या बाजूची कौले काढून आत प्रवेश केला होता. रोहिणी घरात आल्यावर त्या व्यक्तीला पाहून ओरडल्या, तेव्हा त्या व्यक्तीने त्यांचा खून करून तिथून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस उपअधीक्षकांसह अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तपासासाठी श्वान पथकाचीही मदत घेण्यात आली; मात्र चार महिने उलटूनही खुनी मोकाट असल्याने गुरामवाडीत चिंतेचे वातावरण आहे. कट्टा पोलिसांकडे चौकशी केली असता, ‘तपास सुरू आहे’, असेच उत्तर दिले जात आहे. कट्टा पंचक्रोशीत यापूर्वी अशा प्रकारच्या गंभीर घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास करून संबंधित खुन्याला तत्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. २ एप्रिलपर्यंत निकाल न लागल्यास कट्टा पोलिस ठाण्यासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.