actress sukhada khandkekar and sayli mohadkar
actress sukhada khandkekar and sayli mohadkar sakal
लाइफस्टाइल

मैत्रीच्या धाग्यांची घट्ट वीण

सकाळ वृत्तसेवा

- सुखदा खांडकेकर, सायली मोहाडकर

असं म्हणतात, की समान विचारांची माणसं भेटली, की त्यांच्याशी आपली मैत्री होते; पण त्यातही एक अशी व्यक्ती असते, ज्याच्याशी आपलं कनेक्शन खूप वेगळं असतं. असंच नातं आहे अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि तिची बालमैत्रीण सायली मोहाडकर यांच्यामध्ये.

सुखदा सांगत होती, ‘माझी आणि सायलीची पहिली भेट वयाच्या पाचव्या वर्षी झाली. आम्ही कथक क्लासमध्ये पहिल्यांदा भेटलो. आमच्या मैत्रीला आता ३३ वर्षं पूर्ण झाली आहेत. सायली आणि मी तेव्हापासूनच्या बेस्ट फ्रेंड्स आहोत, जेव्हा आम्हाला मैत्री म्हणजे काय असतं हेसुद्धा माहीत नव्हतं. कथक क्लासच्या निमित्तानं आम्ही रोज एकमेकींना भेटायचो; पण आम्हाला एकमेकींची एवढी ओढ होती, की मी तिच्यासोबत राहण्यासाठी म्हणून माझी शाळाही बदलली आणि तिच्या शाळेत ॲडमिशन घेतली.

त्यानंतर आमचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं सगळंच शिक्षण एकत्र झालं. आमची मैत्री एवढी घट्ट होती, की लोकांना आम्ही जुळ्या बहिणी वाटायचो. कारण आम्ही बऱ्याचवेळा सेम ड्रेसेस घालायचो आणि तशा आम्ही दिसायलाही थोड्या-थोड्या सारख्याच होतो. गंमत म्हणजे आमच्या घरातल्यांनाही याची सवय झाली होती, त्यामुळे आम्ही बऱ्याचदा एकमेकींच्या घरी पडीक असायचो.’

ती पुढे म्हणाली, ‘ग्रॅज्युएशननंतर मी मास्टर्ससाठी पुण्याला आले आणि सायली तिथंच राहिली आणि तिनं कथक सुरू ठेवलं. आता तिची नाशिकला कथक डान्स ॲकेडमी आहे. मी पुण्याला आले; पण त्याचा परिणाम आमच्या नात्यावर कधीच झाला नाही. कामाच्या व्यापामुळे दोघींनाही एकमेकींना नेहमी कॉल करायला वगैरे होत नव्हते, किंवा मी गावी आले, तरी दोन दिवसांपुरतीच असायचे. त्यामुळे आमची भेट नाही व्हायची; पण तिनं मला प्रत्येकवेळी समजून घेतलं.’

सायली सांगत होती, ‘‘सुखदा माझा कंफर्ट झोन आहे. तिच्याकडे माणसांना जोडायची कला आहे. ती पटकन् एखाद्याशी कनेक्ट होऊन जाते आणि फक्त तेवढंच नाही तर जोडलेली नाती कशी टिकवायची हेही तिला खूप छान जमतं. अर्थात बऱ्याचवेळा तिच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेणारेही असतात, त्यामुळे आम्ही तिला अनेकदा सांगतो, की चांगुलपणाचा फायदा घेणारे कोण आहेत हे ओळख आणि त्यांच्यापासून लांब राहा.

बाकी ती मस्त आहे. ती माझ्यासाठी खूप जास्त प्रोटेक्टिव आहे. ज्यावेळी माझं लग्न ठरत होतं, त्यावेळेस तिनं माझ्या नवऱ्याचा इंटरव्ह्यूच घेतला होता. एक माणूस म्हणून, मैत्रीण म्हणून ती चांगली आहे, तसंच अभिनेत्री म्हणूनही उत्तम आहे. लवकरच सोनी टीव्हीवर तिची ‘पुकार’ ही मालिका आपल्या भेटीस येणार आहे. यासाठी मी खूप उत्सुक आहे.’

सुखदा म्हणाली, ‘मी वीस वर्षांची होते, तेव्हा माझ्या आई-बाबांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी मी आणि आईनं बाबांचं घर सोडलं आणि दुसरीकडे राहायला गेलो. त्यावेळी नवीन घरात लागणाऱ्या बेसिक गोष्टी काय असतील, यांची आम्ही लिस्ट बनवत होतो आणि त्यातही आमची मस्ती चालू होती. सांगण्याचा उद्देश हा, की माझ्यासोबत सायली असते, तेव्हा कितीही बिकट परिस्थिती असो, तिच्या साथीनं ती परिस्थिती अलगदरित्या मी पार करते.

आम्ही घर सोडल्याचं मी तिला सांगितलं, तर तिची रिॲक्शन, ‘असं झालं का?, बरं ठीक आहे. मस्त.’ मग मला जाणवलं, की झालं ते एवढंही काही वाईट नाहीये, मी यातून सर्व्हाइव करू शकते. जी व्यक्ती अशी सोबत देते, तिलाच तर ‘मैत्रीण’ म्हणतात.’

सायली म्हणाली, ‘आता कामांमुळे आम्ही व्यग्र आहोत; तसंच दोघींचीही लग्नं झाली आहेत, त्यामुळे संसार, घरच्या जबाबदाऱ्या यामुळे आमचं भेटणं होत नाही. आम्ही गेली कित्येक वर्षं भेटायचं प्लॅन करत होतो; पण ते काही न काही कारणामुळे होतच नव्हतं; पण गेल्या मार्च महिन्यात तो योग आला. यावेळी आम्ही दोघीच तीन दिवसांसाठी गोव्याला गेलो होतो आणि तेव्हा आम्ही इतक्या गप्पा मारल्या, की विचारू नका.

आम्ही तासन्‌तास एक ठिकाणी बसून इतक्या काळातल्या सगळ्या गोष्टी एकमेकींसोबत शेअर केल्या. एक गोष्ट मात्र कमाल होती ती म्हणजे आम्ही इतक्या वर्षांनंतर एकमेकींना भेटलो; पण तरीही ते जाणवलं नाही. आम्ही गप्पांना सुरुवात तिथूनच केली, जिथे आमच बोलण थांबल होतं.’

(शब्दांकन : मयूरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT