rajthackeray
rajthackeray 
महाराष्ट्र

ईव्हीएमच्या चक्रव्यूहात ‘मनसे’

प्रशांत बारसिंग

विधानसभा निवडणुकीत यश मिळवूनही कार्यकर्त्यांना कार्यक्रम न मिळाल्याने नेत्यांपासून कार्यकर्तेही पांगल्याने मनसेची कोंडी झाली आहे. राज ठाकरे यांनी भाजपवरच साधलेला निशाणा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी केलेली सलगी यातून त्यांच्या धोरणांची दिशा काय, हे अद्याप स्पष्ट होत नाही. आता ते ईव्हीएमच्या मुद्द्यावर भांडत आहेत.

ईव्हीएम मशिनला विरोध असल्यामुळे ‘मॅच फिक्‍स असेल तर नेट प्रॅक्‍टिसचा काय उपयोग’ असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले विधान आणि आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढायच्या की काँग्रेस आघाडीसोबत जायचे, याबाबत पक्षनेतृत्वाची भूमिका स्पष्ट नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) संभ्रमावस्था असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यापासून पक्षाची वाटचाल पाहता राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला राष्ट्रीय स्तरावर कोणताही इंटरेस्ट नसून प्रादेशिक पक्ष म्हणूनच दबदबा निर्माण करायचा आहे. म्हणनूच राज यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुका लढविल्या नाहीत. त्यांचा फोकस फक्‍त विधानसभेवर आहे. त्यामुळे पक्षाची स्थापना झाल्यापासून राज्यभरातील आक्रमक आंदोलनांवर मनसेने भर दिला होता. राज्यातील टोल वसुली, मराठी पाट्यांचे आंदोलन असो किंवा केंद्र सरकारच्या आस्थापनावर स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी केलेली आंदोलने गाजली होती. स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्‍कासाठी परप्रांतीयांच्या विरोधातील आंदोलनामुळे राज आणि त्यांच्या पक्षाची ओळख देशपातळीवर झाली होती. त्याचा फायदा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत झाला होता. पक्षस्थापनेनंतर पहिल्याच प्रयत्नात मनसेचे १३ आमदार विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर मात्र पक्ष कार्यकर्त्यांना कोणताही नवीन कार्यक्रम दिला गेला नाही आणि पाच वर्षात पक्षाची वाताहत झाली.

२०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत केंद्र आणि राज्यात सत्तांतर झाल्यापासून सर्व विरोधक गारद झाले. मनसेची अवस्था वेगळी नव्हती. गेल्या पाच वर्षांत मनसेने कोणतेही ठळक आंदोलन केले नाही किंवा पक्ष नेतृत्वाने कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला नाही. पूर्वीच्या आक्रमक आंदोलनांच्या माध्यमातून पक्ष वाढवायला हवा होता, ते झालं नाही. त्याचबरोबर विधानसभा आणि मुंबई, ठाणे, नाशिक महापालिका वगळता राज्यातील स्थानिक निवडणुका मनसेने गांभीर्याने लढल्या नाहीत, परिणामी पक्षाची वाढ खुंटली. २०१४ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागली. प्रवीण दरेकर, वसंत गिते, राम कदम, शिशिर शिंदे, मंगेश सांगळे असे शिलेदार राज ठाकरेंना सोडून गेले. दुसऱ्या फळीतील नेते गेल्यामुळे त्यांच्या अवतीभोवती फिरणारे कार्यकर्तेही गेले. यावर राज ठाकरे यांनी याची कारणे शोधली नाहीत. शिशिर शिंदेंसारखा मोहरा का गेला, ते कार्यकर्त्यांना अजूनही कळाले नाही. मुंबईतील सातपैकी सहा नगरसेवक एका फटक्‍यात शिवसेनेते गेले. दिलीप लांडेंसारखा विश्‍वासू नेता का जातो, याचे कारणही अजून समजले नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपासून राज यांचे शरद पवारांच्या कलाने राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी पवारांच्या घेतलेल्या भेटीगाठी आणि निवडणुका न लढवता घेतलेल्या सभांमुळे याला दुजोरा मिळतो. लोकसभेच्या प्रचारात राज ठाकरे यांनी मोदी-शहांना थेट अंगावर घेतल्याने संपूर्ण देशभरात चमकले. मात्र त्याचे रूपांतर मतांमध्ये झाले नसल्याचे निकालावरून दिसून आले.

सध्या राज ठाकरे यांनी ईव्हीएम मशिनला विरोध करण्याची भूमिका स्वीकारली आहे. काल, शुक्रवारी मुंबईत झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात राज ठाकरे यांचे भाषण ईव्हीएमभोवती फिरत होते. परंतू यासाठी लोकसभेत कायदा बनवावा लागणार असल्याने, बॅलेटवरील निवडणुकांची शक्‍यता नाही. दुसरीकडे राज यांचा फोकस शिवसेना विरोधावरून भाजप विरोधाच्या दिशेने सरकला आहे. त्यामुळे  विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीसोबत जायचे की एकट्याने लढायचे याची दिशा स्पष्ट नाही. स्वबळ, काँग्रेस आघाडी आणि ईव्हीएमचे चक्रव्यूह राज ठाकरे 
कसे भेदतात, यावर पक्षाचे भवितव्य ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT