panchayat 2 movie
panchayat 2 movie sakal
मनोरंजन

ऑन स्क्रीन : पंचायत २ : भारतीय खेड्याचं ‘अस्सल’ दर्शन

महेश बर्दापूरकर

‘पंचायत २’मध्ये पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) आता उत्तर प्रदेशातील फुलेरा या ग्रामपंचायतीमध्ये स्थिरावला आहे.

‘पंचायत’ या दीपक कुमार मिश्रा दिग्दर्शित व जितेंद्र कुमारची प्रमुख भूमिका असलेल्या वेब सिरीजचा दुसरा भाग, ‘पंचायत २’ पहिल्या इतकाच मनोरंजक, पात्रांची बॉण्डिंग अधिक घट्टपणे सादर करणारा व केवळ गावातील समस्यांव्यतिरिक्त गावकऱ्यांच्या मानसिकतेवर अधिक भर देणार झाला आहे. अभिनय, संवाद, विनोद या सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करणारी ॲमेझॉन प्राईमवरील सिरीज ‘मस्ट वॉच’ अशीच आहे.

‘पंचायत २’मध्ये पंचायत सचिव अभिषेक त्रिपाठी (जितेंद्र कुमार) आता उत्तर प्रदेशातील फुलेरा या ग्रामपंचायतीमध्ये स्थिरावला आहे. गावातील राजकारण सांभाळताना त्याच्यावर गावाचा कार्यवाह प्रधान ब्रिजभूषण (रघुवीर यादव) याला झुकते माप देण्यावरून आरोप होऊ लागतात. उपप्रधान प्रल्हाद (फैजल मलिक) आणि ऑफिस असिस्टंट विकास (चंदन रॉय) यांना मात्र हा आरोप मान्य नाही व ते अभिषेकला पाठिंबा देतात. प्रधान मंजू देवी (नीना गुप्ता) या भागात आपलं अस्तित्व अधिक ठळकपणे जाणवून देते. त्यातून गावाच्या राजकारणात रस्त्याच्या कामावरून राजकारण रंगतं व परिसरातील आमदार विरुद्ध प्रधान आणि सचिव असा संघर्ष रंगतो. या सर्व प्रकरणांत अभिषेक अधिकाधिक अंतर्मुख होत जातो. गावात ‘स्वदेश’चा मोहन भार्गव व्हायचं म्हणून आलेला हा तरुण आता करिअरचा अधिक गांभीर्यानं विचार करू लागतो. पैसा की करिअर या विवंचनेत अधिक अडकत जातो. प्रधानांची मुलगी रिंकी (सान्विका) या सर्व संघर्षात त्याला काही प्रमाणात साथ देते. अभिषेक व त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या आयुष्यातील एका अत्यंत हृदयद्रावक प्रसंगाच्या पार्श्‍वभूमीवर दुसरा सीझन संपतो.

‘यह जो है जिंदगी’, ‘वागले की दुनिया’ किंवा ‘ऑफिस ऑफिस’ या मागील शतकातील मालिकांची आठवण करून देणारी ही मालिका हसवत हसवत अंतर्मुख करीत राहते. शहर आणि गावाच्या आकारात फरक असला, तरी माणसं सर्वत्र सारखीच असतात हे अधोरेखित करते. सिरीजमधील दाखवलेल्या गावाचा उपयोग केवळ विनोदनिर्मितीसाठी करण्याची चूक न करता हे देशातील कुठलंही खरं खेडं वाटंल याची काळजी घेतली गेली आहे. गावातील प्रत्येक समस्या मांडताना विनोद येतो, मात्र तो ओढून-ताणून नाही. महत्त्वाचं म्हणजे, ती समस्या सोडवण्याचा मार्गही अगदी सहज सांगितला जातो. यातील ‘औकात’ या भागात आमदार आणि सचिवातील संघर्ष आणि त्यातून सचिव आणि प्रधान यांच्यातील ताणलेले संबंध हा भाग छान झाला आहे. रिंकीच्या विवाहाची फिसकटलेली बोलणी आणि अभिषेकचा मित्र शहरातून गावात आल्यानंतर झालेली धमाल हे भाग जमून आले आहेत. शेवटचा भाग इतर भागांना छेद देणारा आणि अत्यंत हळवा झाला आहे. या मालिकेच्या पुढच्या भागाची प्रेक्षक अगदी मनापासून वाट पाहतील, अशी व्यवस्था करण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

जितेंद्र कुमार या भागात अभिनेता म्हणून अधिक स्थिरावला आहे. सर्वच प्रसंगांतील त्याची देहबोली, शहर आणि खेड्यातील मानसिकतेमुळं होणारी ओढाताण, चांगलं काम करीत असूनही होत असलेल्या टीकेमुळं खट्टू झालेलं मन, रिंकीमध्ये प्रेम शोधण्याचा प्रयत्न हे सर्वच त्यानं अत्यंत छान साकारलं आहे. रघुवीर यादव नेहमीच्या सफाईनं काम करीत हसे वसूल करतात. चंदन रॉय हा अभिनेताही मागील भागाप्रमाणंच सहज अभिनयाचं दर्शन घडवतो. नीना गुप्ता भाव खाऊन जातात. त्यांना तुलनेनं खूपच कमी प्रसंग मिळाले आहेत, ही त्रुटी. या सर्वांत सरप्राईज पॅकेज आहे फैजल मलिक हा अभिनेता. संथपणे बोलत विनोद करणाऱ्या या कलाकारानं शेवटच्या ‘परिवार’ या भागात केलेल्या गंभीर अभिनयाला तोडच नाही. इतर सर्वच कलाकार या सर्वांना तोलामोलाची साथ देतात. एकंदरीतच, भारतीय खेड्याचं हे अस्सल दर्शन प्रेक्षकांना हसवत तेथील समस्यांबद्दल गंभीरपणे विचार करायला भाग पाडतं आणि हेच सिरीजचं वैशिष्ट्य ठरतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Gharoghari Matichya Chuli: ऐश्वर्याने केलं सौमित्रला किडनॅप; 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत नवा ट्विस्ट

Kalsubai Peak : आनंद महिंद्रांना देखील भावतोय महाराष्ट्राचा माऊंट एव्हरेस्ट, 'या' शिखराला कशी भेट द्यायची ?

T20 WC 24 Team India : भारतासाठी T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूचा संघातून पत्ता कट?, जाणून घ्या कारण

Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

SCROLL FOR NEXT