मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिध्द अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही नेहमीच आपल्या नृत्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकते. पिंजरा या मराठी मालिकेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. भय, शॉर्ट कट, निवडुंग, सर्व लाईन व्यस्त आहेत या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. आता संस्कृती लवकरच '8 दोन 75' या चित्रपटात दिसणार आहे.
आगळ्यावेगळ्या नावामुळे हा चित्रपट चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुश्रुत भागवत यांनी केले आहे. या चित्रपटात तब्बल १४ नव्या कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली आहे. या चित्रपटाची निर्मिती 'उदाहरणार्थ निर्मित' या संस्थेतील विकास हांडे लोकेश मांडके आणि सुधीर कोलते यांनी केली आहे. शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, शर्वरी पिल्लाई, आनंद ईंगळे, अश्विनी कुलकर्णी , विजय पटवर्धन, चिन्मय संत, संजय मोने असे प्रसिध्द कलाकार या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द कलाकार पुष्कर श्रोत्री हा पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. संस्कृती बालगुडे ही या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारणार आहे. प्रसिध्द संगीतकार अवधुत गुप्ते आणि वैभव जोशी यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. संजय मोने यांनी या संवाद लेखन केले आहे. या चित्रपटाची पटकथा शर्वरी पिल्लाई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे.
या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले असून त्याचे पोस्टर संस्कृतीने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. 8 दोन 75..म्हणजे नक्की काय असेल, असं कॅप्शन तिने या पोस्टरला दिले आहे. या आगळ्यावेगळ्या चित्रपटामधून दिग्दर्शकाला नक्की काय सांगायचे आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.