मुंबई - मुंबईतून एलिफंटा लेणीपर्यंत पोहचण्यासाठी रोप वे तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर पर्यटकांच्या सोयीसाठी जेटीची क्षमताही वाढविण्यात येणार आहे. सर्व विकासकामांचा पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आढावा घेतला.
एलिफंटा लेणी जागतिक वारसा स्थळाला रोज भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता पर्यटकांच्या सोयीसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच पर्यटनस्थळाचा विकास करण्यासाठी आवश्यक उपाययोजना जलदगतीने कराव्यात, अशा सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून एलिफंटा विकास आराखडाबाबत माहिती दिली. जेटीच्या विस्तारीकरणाबाबत पुरातत्व विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या घेऊन जेटीचे विस्तारीकरण केले जाईल, असेही रावल यांनी सांगितले.
आधुनिक मिनी ट्रेन येणार
प्राचीन एलिफंटा लेणीबाबत माहिती देणारे फलक लावण्यात येणार असून, मिनी ट्रेनचे रूपही आगामी काळात बदलणार आहे. जुन्या ट्रेनची जागा नवी आधुनिक मिनी ट्रेन घेणार आहे. लेण्याची माहिती देणारे प्रशिक्षित गाईड तयार करणे, शौचालय बांधकाम, स्वच्छतेबाबत उपाययोजना करणे आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचनाही जयकुमार रावल यांनी दिल्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.