नववर्षाच्या स्वागतासाठी फार्महाउसला पसंती
एकांत, सात्विक भोजन, स्विमिंगपूलमुळे पर्यटक आकर्षक
पाली, ता. २९ (वार्ताहर) : नववर्षाच्या स्वागतासाठी साजऱ्या होणाऱ्या थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी रायगड जिल्हा सज्ज झाला असून, जिल्ह्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विशेषतः समुद्रकिनारे आणि ग्रामीण भागातील निसर्गरम्य फार्महाउस, कॉटेज व ॲग्रो टुरिझम केंद्रे पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील गार वारा, समुद्राच्या पाण्यातील मज्जा तसेच हिरवाईने नटलेले परिसरात वसलेले सुसज्ज फार्महाउस आणि त्या ठिकाणचे स्विमिंगपूल यामुळे पर्यटक आकर्षित झाले आहेत.
मुंबई-पुणे तसेच राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागांतून आलेल्या पर्यटकांनी थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे मोर्चा वळवला आहे. परिणामी पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल व्यावसायिक, खानावळी, छोटे-मोठे दुकानदार, वाहतूकदार, विविध राइड्स आणि साहसी खेळ चालवणाऱ्यांची सध्या चांगलीच चलती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यांतील अनेक नागरिकांचे रायगड जिल्ह्यात खासगी फार्महाउस आहेत. अनेक जण थर्टी फर्स्टसाठी सहकुटुंब व मित्रपरिवारासह आपल्या फार्महाउसवर दाखल झाले आहेत. तसेच व्यावसायिक उद्देशाने उभारण्यात आलेल्या फार्महाऊस आणि कॉटेजची बुकिंग जवळपास पूर्ण क्षमतेने भरली असून, अनेक ठिकाणी ‘हाउसफुल’ची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व ठिकाणी नववर्षाच्या स्वागतासाठी उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. ग्रामीण भागातील शांतता, प्रदूषणमुक्त वातावरण, घरगुती व सात्विक भोजन, स्विमिंगपूल, कॅम्पफायर, टेंट स्टे, ट्रेकिंग आणि निसर्गसफर यांचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक फार्महाउसकडे वळत आहेत. शहरातील गोंगाट, गर्दी आणि धावपळीपासून दूर काही काळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवण्याची संधी मिळत असल्याने फार्महाउस हे थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत.
..................
स्थानिकांना रोजगार व उत्पन्नाचे साधन
शहरातील नागरिकांना ग्रामीण भागातील फार्महाउस व ॲग्रो टुरिझमचे विशेष आकर्षण आहे. निसर्गरम्य वातावरण, शुद्ध हवा, घरगुती व सात्विक जेवण याचा ते मनसोक्त आनंद घेतात. काही काळ मोबाईल नेटवर्कपासून दूर राहिल्याने मानसिक ताजेपणाही मिळतो. स्विमिंगपूल असलेल्या फार्महाउसना विशेष मागणी असून, मित्रमंडळी आणि बच्चेकंपनी येथे थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करतात. चुलीवरचे जेवण, टेंट, कॅम्पफायर, ट्रेकिंग आणि स्विमिंगपूलमध्ये डुंबण्याची मज्जा घेतली जाते. थर्टी फर्स्टसाठी बहुतांश फार्महाऊस फुल्ल झाले असून, यामुळे स्थानिकांना रोजगार व उत्पन्नाचे साधनही उपलब्ध झाले आहे.
..........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.