परिचारिकांच्या आंदोलनाला गट ड कर्मचारी महासंघाचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने शुक्रवारपासून (ता. १८) आझाद मैदानात बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांच्याकडून पाठिंबा देण्यात आला आहे. आंदोलक परिचारिकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष लक्षात घेता, राज्यभरातील परिचारिकांनी बेमुदत काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या मागण्यांमध्ये कामांबाबत अन्यायकारक वेळापत्रक, सुधारित वेतनश्रेणी, सुरक्षित कार्यस्थिती आणि निवृत्तीनंतरच्या लाभांमधील अडथळे यांचा समावेश आहे. महासंघाच्या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, की जर शासनाने लवकरात लवकर समाधानकारक तोडगा काढला नाही, तर सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागातील गट ड कर्मचारीही या बेमुदत संपात सक्रिय सहभाग घेतील. परिचारिकांच्या समस्या आणि त्यामागील वेदना शासनाने समजून घेत संवाद, समज आणि समाधानाच्या मार्गाने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा उद्भवणारी असंतोषाची लाट संपूर्ण आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान उभी करू शकते, असा इशारा महासंघाने दिला आहे.