पवई ओलीसनाट्य
माजी मंत्री दीपक केसरकर यांचीही चौकशी
वाटाघाटीदरम्यान आरोपी रोहित आर्याशी बोलण्यास नकार
मुंबई, ता. ३ : पवई ओलीसनाट्याच्या तपासात माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि मृत आरोपी रोहित आर्यासोबत वाटाघाटी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे जबाब गुन्हे शाखा नोंदवणार आहे. वाटाघाटींदरम्यान केसरकर यांनी आर्यासोबत बोलणे टाळले होते, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे.
आर्याने हे ओलीसनाट्य का आणि कसे घडवले याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. त्यासाठी सर्व संबंधितांकडे चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले जातील. गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाल्याने आता संबंधितांच्या जबाबांद्वारेच या गुन्ह्यामागील हेतू स्पष्ट होऊ शकेल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ओलीसनाट्यामागील हेतू स्पष्ट करण्यासाठी भूतकाळात घडलेल्या काही घडामोडी अर्थात स्वच्छता मॉनिटर, माझी शाळा सुंदर शाळा योजनेचे श्रेय व मोबदला न मिळाल्याने आर्याने केलेली आंदोलने, तक्रारी, पाठपुराव्यासह कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समविचारी सहकाऱ्यांकडे आर्याने वेळोवेळी व्यक्त केलेल्या भावना नोंदवून घेतल्या जातील, त्यांची शहानिशा केली जाईल, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
ओलीसनाट्य घडले तेव्हा मुलांच्या सुटकेसाठी मुंबई पोलिस दलाचे उपआयुक्त दत्ता नलावडे, वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांनी आर्यासोबत वाटाघाटी सुरू केल्या. त्यात आर्याने एकदाच केसरकर यांच्याशी बोलायचे आहे, अशी मागणी पुढे केली. त्यानुसार पोलिसांनी केसरकर यांना फोन लावला; मात्र केसरकर आणि आर्या यांचे बोलणे होऊ शकले नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या दोघांचे बोलणे का होऊ शकले नाही, यावरूनही संभ्रमित करणारी माहिती प्राथमिक तपासातून गुन्हे शाखेला मिळाली आहे. केसरकर यांना फोन लागलाच नाही की फोन लागला मात्र त्यांनी आर्यासोबत बोलण्यास स्पष्ट नकार दिला, यातील नेमके काय घडले, हे गुन्हे शाखा शोधणार आहे. त्यासाठी वाटाघाटीत सहभागी अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात झाली आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
----
त्या मराठी कलाकारांकडे चौकशी
आरोपी आर्याच्या निमंत्रणावरून पवईच्या आरए स्टुडिओत सुरू असलेल्या आभासी ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या, लहान मुलांसोबत संवाद साधणाऱ्या, सेल्फी काढणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मंगळवारी चौकशीस बोलावल्याचे सांगण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी माध्यमांशी बोलताना आरए स्टुडिओला भेट दिल्याचे कबूल केले. ही भेट आगामी चित्रपटाबाबत चर्चेसाठी होती, असे त्यांनी म्हटले हाेते.
-------
आर्याच्या गुगलवरील हालचालींचा आढावा
पवईच ओलीसनाट्य ‘अ थर्सडे’ या हिंदी चित्रपटावर आधारित होते का, यासह एअर गन, अद्ययावत सीसीटीव्ही, मोशन सेन्सर या उपकरणांची खरेदी, स्टुडिओचे आरक्षण इत्यादी मुद्दे स्पष्ट करण्यासाठी आर्याच्या मोबाईल फोनची गुगल हिस्ट्री तपासण्यात येत आहे. त्याने गोळीबार केलेला नाही. फक्त आत शिरलेल्या पोलिस पथकावर बंदूक रोखली, असे आतापर्यंतच्या तपासातून पुढे येत आहे. खातरजमा करण्यासाठी एअर गन न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
------
मानसिक आराेग्याबाबत चाैकशी
आर्याची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि मानसिक स्वास्थ्याबाबत गुन्हा घडल्यापासून चौकशी सुरू आहे. तो मानसिक रुग्ण होता, अशी माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेली नाही, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.