‘टीडीआर’ व्यवहारांसाठी ई-प्रणाली
खरेदी-विक्री होणार पारदर्शक; नोडल बँकेची नियुक्ती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : मुंबई शहराच्या विकास आराखड्याची (डीपी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि टीडीआर (हस्तांतरणीय विकास हक्क) व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मुंबई महापालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या ‘टीडीआर’च्या खरेदी-विक्रीसाठी आता अद्ययावत ‘ई- टीडीआर प्रणाली’ विकसित केली जात असून, यामुळे जमीन मालकांना सुस्पष्ट माहिती मिळण्यासोबतच व्यवहार अधिक सुलभ होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने नुकतीच दिली.
‘टीडीआरच्या नवीन प्रणालीमुळे हे व्यवहार इलेक्ट्रॉनिक स्वरूपात होणार आहे. विशेष म्हणजे, यामधील सर्व आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्यासाठी एका नोडल बँकेची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रणाली केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे मंजूर केलेल्या मानकांनुसार तयार केली जात असल्याने, ती अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह असेल. यामुळे टीडीआरच्या मागणीत वाढ होऊन महापालिकेच्या महसुलातही मोठी भर पडेल,’ असा प्रशासनाला विश्वास आहे. या प्रणालीमुळे प्रमुख खात्यांशी ‘डिजिटल’ सुसूत्रीकरण होणार आहे. प्रशासकीय कामात गती आणण्यासाठी ही प्रणाली पालिकेच्या इतर महत्त्वाच्या यंत्रणांशी जोडली जाणार आहे. भांडवली मूल्याधारित प्रणालीशी ही यंत्रणा जोडल्यामुळे मालमत्ता कराचे संकलन अधिक अचूक आणि कार्यक्षम होईल. ‘ॲक्वा’ प्रणालीशी सुसूत्रीकरण केल्यामुळे नागरिकांना नळजोडणीच्या मंजुरीसाठी आता स्वतंत्र अर्ज करण्याची गरज भासणार नसून, ही प्रक्रिया पूर्णपणे स्वयंचलित असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या नव्या प्रणालीच्या माध्यमातून सर्व व्यवहारांवर ‘रिअल-टाइम मॉनिटरिंग’ करण्यात येणार आहे. सोबतच शहरातील अनधिकृत बांधकामांवर पूर्वलक्षी देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. प्रत्यक्ष जागेच्या परिस्थितीची पडताळणी या प्रणालीद्वारे कार्यालयात बसून करता येणार असल्याने प्रशासनाच्या वेळेत बचत होणार असल्याचे सांगण्यात आले.
विकास नियोजनाची गती
सर्व संलग्नित प्रणालींद्वारे माहितीचे नियमित आदान-प्रदान होणार असल्याने मंजुरी प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढेल. याचा थेट परिणाम महापालिकेचा महसूल वाढण्यावर होणार असून, विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला गती मिळणार असल्याचे विकास नियोजन खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.