सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १८ : गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरूळ आणि जुईनगर नोडमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. जुईनगर येथील महापालिकेच्या धारण तलावावर (होल्डिंग पाँड) झालेल्या अतिक्रमण, मातीच्या भरावामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नव्हता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही परिस्थिती बदलली नसल्याने या वर्षीसुद्धा जुईनगर आणि नेरूळ या नोडमध्ये पाणी भरण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
जुईनगर सेक्टर २१ येथे सिडकोतर्फे धारण तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. काही वर्षांपूर्वी सिडकोने हा तलाव देखभाल- दुरुस्तीकरिता महापालिकेकडे हस्तांतरित केला आहे; मात्र या तलावावर मोठ्या प्रमाणात मातीचा भराव करून बेकायदा गोदामे, भंगार सामानाची दुकाने, मोबाईल टॉवर आणि क्रिकेटचे मैदान तयार करण्यात आले होते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नेरूळ आणि जुईनगर भागातील नागरी वसाहतींमध्ये जलमय परिस्थिती झाली. अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानामध्ये पाणी घुसले. जनजीवन विस्कळित झाले होते. धारण तलावात पावसाचे पाणी जाण्यास वाट नसल्याने आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी साठल्याची बाब निदर्शनास आली. याबाबत याचिकाकर्ते मल्हार देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणल्यानंतर महापालिकेने अखेर या तलावावरील अतिक्रमणे हटवली; परंतु मातीचा भराव काढला नाही. त्याकरिता देशमुख यांना पुन्हा न्यायालयात जावे लागले. त्यानुसार ७ एप्रिलला उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला येत्या तीन महिन्यांत मातीचा गाळ काढण्याच्या सूचना दिल्या. महापालिकेतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलांनी तीन महिन्यांमध्ये गाळ उपसणार, असे कबूल केले. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता एक महिना उलटून गेला आहे. अद्याप महापालिकेने गाळ काढण्यास सुरुवात केलेली नाही. जून महिना तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत महापालिकेतर्फे गाळ काढण्यासाठी कोणत्याही प्रकारे तयारी केलेली नाही. हे पाहता किमान पावसाळ्यापूर्वी तरी काम सुरू होणे अपेक्षित होते; मात्र गाळ उपसण्याचे काम सुरू न झाल्यामुळे यंदा पुन्हा मुसळधार पाऊस पडल्यास नेरूळ आणि जुईनगरमधील रस्ते पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------------------
दर कमी करण्यासाठी वाटाघाटी
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार जुईनगर धारण तलावात कांदळवने असल्यामुळे त्यांना धक्का न लागता गाळ काढण्यासाठी मुंबई आयआयटीकडून अहवाल मागवला होता. त्या अहवालानुसार शास्त्रोक्त पद्धतीने धारण तलावाची स्वच्छता केली जाणार होती. त्या अहवालाच्या आधारावर महापालिकेने तीन वेळा निविदा प्रक्रिया राबवली आहे; परंतु सहभागी झालेल्या कंत्राटदारांनी वाढीव दर सादर केल्यामुळे महापालिकेतर्फे अद्याप कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आलेला नाही. तिसऱ्या निविदा प्रक्रियेत यशस्वी ठरलेल्या कंत्राटदाराला प्रशासनातर्फे दर कमी करण्याची विनंती केली जात आहे.
----------------
जुईनगर धारण तलावातील गाळ काढण्यासाठी महापालिका आग्रही आहे; परंतु तीन वेळा निविदा राबवूनही वाढीव दराची निविदा महापालिका प्रशासनाकडे आली आहे. वाढीव दराने कोणतेही काम सुरू करू शकत नाही. पात्र ठरलेल्या कंत्राटदाराने दर कमी केल्यास पावसाआधी कामाला सुरुवात करू शकतो. तोपर्यंत अभ्यास करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
-----------------
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तीन महिन्यांच्या कालावधीत जुईनगर धारण तलावातील मातीचा गाळ काढणे अपेक्षित आहे. ७ एप्रिलला न्यायालयाने मुदत दिली आहे. ही मुदत ७ जुलैला संपणार आहे. त्याआधी महापालिकेने काम सुरू न केल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल. तसेच या पावसाळ्यात होणाऱ्या जलमय परिस्थितीला सर्वस्वी महापालिका जबाबदार राहणार आहे.
- मल्हार देशमुख, याचिकाकर्ते, नवी मुंबई
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.