सुरणाच्या फुलासह शेवळा बाजारात दाखल
भरपूर लोह असल्याने खवय्यांकडून पसंती
विरार, ता. २७ (बातमीदार) ः पावसाळ्याच्या तोंडावर सुरणाच्या फुलासह शेवळा ही रानभाजी बाजारात दाखल झाली आहे. या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याने खवय्यांकडून सर्वाधिक पसंती देण्यात येत आहे. शेवळा ही डोंगरात मिळत असून सुरणाची फुले पश्चिम किनारपट्टीत असलेल्या वाड्यांमध्ये मिळतात. शेवळाच्या भाजीमुळे आदिवासी समाजातील महिलांना चांगला रोजगार मिळत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात येथील डोंगरकपारीत विविध रानभाज्या उगवतात. यामध्ये शेवाळा रानभाजी सर्वाधिक मिळते. शिवाय ही भाजी पौष्टिक असून चवीला रुचकर असते. या रानभाज्या औषधीसुद्धा असतात. मे महिन्यातील अंशतः ढगाळ वातावरणात शेवळा भाजी उगवते. शेवळा उगवली की लवकरच पावसाला सुरुवात होणार असल्याचे भाकीत गावकरी करतात. या वर्षी शेवळा भाजी लवकर बाजारात दाखल झाली आहे. सध्या या भाजीच्या छोट्या चार जुडीला ४० रुपये मोजावे लागत आहेत. सुरणाच्या फुलांचा भावही चांगलाच वधारला आहे. बाजारात लहान सुरणाच्या फुलाला ४० ते ५० रुपये घेतले जात आहेत. खासकरून पावसाआधी पाण्याशिवाय उगवणारी शेवळा ही विशेष गुणधर्मयुक्त भाजी आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांकडून शेवळा भाजी जास्त प्रमाणात खरेदी करून ती उन्हात सुकवून जमा केली जाते. त्यानंतर ती वर्षभर खाण्यासाठी वापरली जाते. या शेवळ्याबरोबर आवळ्यासारखी दिसणारी काकडे घेेणेही जरुरीचे असते. त्याशिवाय ही भाजी करता येत नाही. शिवाय ही भाजी कढईत चांगली परतून घ्यावी लागते अन्यथा घशाला खाज सुटते. त्यामुळे काकड्यांसह ही भाजी चांगली शिजवून खाणे गरजेचे असते. या भाजीमध्ये सर्वाधिक लोह असल्याने तिला पसंती मिळत आहे.
===============================
भाजी करण्याची पद्धत
शेवळ भाजी चिरताना खास काळजी घ्यावी लागते. मध्यभागी असणाऱ्या बोंडाला खाज खुजली असते. यामुळे ते काढून टाकावे लागते. भाजी चिरताना राहून गेलेली खाज, काकडे, आंबडी पाला यांचे आंबट घालणे गरजेचे असते; जेणेकरून यातील बोंड विरघळून जाते आणि भाजी खाण्यायोग्य होते. त्याचबरोबर सुरणाची फुले घरी आणल्यानंतर त्याची ताबडतोब भाजी करावी लागते. सुरण कापताना देट काढून आळूच्या भाजीसारखी केली जाते. सुरणाची फुले जास्त दिवस ठेवल्यास त्याला वास येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.