हत्या करून पतीचा
मृतदेह घरात पुरला
प्रियकरासह पत्नी फरारी
नालासोपारा, ता. २१ (बातमीदार) ः नालासोपाऱ्यात प्रियकराच्या मदतीने महिलेने पतीची हत्या करून त्याचा मृतदेह घरातच खड्डा खोदून त्यात पुरला, त्यावर लाद्या बसवल्या. त्यानंतर ती या घरात आठ वर्षांच्या मुलासह राहत होती. दोन दिवसांपासून ही महिला प्रियकरासह फरार झाल्यानंतर नातेवाइकांना संशय आला आणि सोमवारी (ता. २१) ही हादरवणारी घटना उघडकीस आली. पेल्हार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुडिया चमन चौहान आणि मोनू विश्वकर्मा अशी आरोपींची नावे आहेत. गुडिया ही पती विजय चौहान याच्यासोबत नालासोपाऱ्यात गांगडीपाडा येथील चाळीत राहत होती. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या परिसरातच मोनू हा राहतो. मोनू आणि गुडिया यांच्यात प्रेमसंबंध जुळल्यानंतर विजय हा त्यांच्या नात्यात अडथळा ठरू लागला होता. त्यामुळे दोघांनी संगनमत करून त्याचा खून केला. मृतदेह घरातच पुरला. त्यानंतर मृताच्या मोठ्या भावाला हजार रुपये देऊन खोदलेल्या खड्ड्यावर पांढऱ्या रंगांची लादी बसवून घेतली होती. मोठ्या भावाने वहिनीने आपल्याकडूनच काही दिवसांपूर्वी ही लादी बसवून घेतल्याचे सांगितले. नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी लादीच्या खाली खोदकाम केले असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
.....
कसा झाला उलगडा?
- विजय चौहान याला त्याच्या लहान भावाने १० जुलैला कामानिमित्त फोन केला होता. त्यानंतर शनिवारी (ता. १९) पुन्हा फोन लावला; मात्र विजय आणि त्याच्या पत्नीचा फोन लागला नाही.
- अखेर त्याचा भाऊ शनिवारी नालासोपाऱ्यात आला. त्याआधीच आरोपी महिला प्रियकर आणि आपल्या मुलासह फरार झाली होती.
- भाऊ बेपत्ता, भावाजय घरात नाही, घरात वेगळी लादी बसवलेली, यामुळे संशय आल्याने त्याने इतरांच्या साहाय्याने नवीन लादी बसवलेल्या ठिकाणी खोदकाम केले असता दुर्गंधी येऊ लागली आणि हात दिसला.