विद्यार्थ्यांनी घेतले आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे
शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील उपक्रम
प्रभादेवी, ता. ११ (बातमीदार) : आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा, संकटसमयी काय करावे, अपघात झाल्यानंतर प्रथमोपचार कसा करावा, याबाबतचे धडे शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या वतीने दादर येथील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनपर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते, याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी महेंद्र खंबाळकर यांनी विविध आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांकांची माहिती दिली. तसेच संकटसमयी योग्य प्रकारे वागण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रवीण ब्रह्मदंडे यांनी प्रथमोपचाराचे प्रात्यक्षिक सादर केले. तर भायखळा अग्निशामक केंद्रातील अधिकारी गणेश डहाके यांनी ‘अग्निसुरक्षितता’ या विषयावर मार्गदर्शन करताना आग कशी लागते, ती विझविण्याच्या पद्धती, एलपीजी गॅस लिकेज झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, तसेच अग्निशमन यंत्राचा वापर प्रत्यक्ष दाखवून दिला.
शाळांमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटचे महत्त्व खूप मोठे आहे, कारण शाळा ही केवळ शिक्षणाचीच जागा नसून अनेक विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि कर्मचारीवर्गाचे सुरक्षिततेशी निगडित केंद्रस्थान आहे. आपत्ती कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही प्रकारे भूकंप, पूर, आगीची दुर्घटना, इमारत कोसळणे, गॅस लिकेज, अपघात आदी उद्भवू शकते, अशा वेळी शाळा अलर्ट असणे अत्यावश्यक आहे. या उद्देशाने या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन खरात यांनी केले होते. शाळेचे कार्यवाह गजेंद्र शेट्टी आणि शालेय समितीचे अध्यक्ष संभाजी मंडले, मॉरिस पिंटो यांनी कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले.
याप्रसंगी राजेंद्र घाडगे, गौरी अहिरराव, योगेश सुपलकर यांच्यासह मराठी प्राथमिक, माध्यमिक विद्यालय ज्यु. कॉलेज व एस् व्ही. एम् इंग्रजी इंटरनॅशनल स्कूल, तांत्रिक विद्यालय माध्यमातील विद्यार्थी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.