प्रभागरचनेवरून नाराजीचा सूर
प्रशासनाने २८२ सूचना, हरकती फेटाळल्या
पनवेल, ता. ११ (बातमीदार) ः पालिकेच्या प्रभागरचनेवर २८२ हरकती आणि सूचना नोंदवण्यात आल्या होत्या; पण जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी त्या फेटाळून लावल्याने कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाविरोधात नाराजीचा सूर आहे.
२०१७च्या प्रभागरचनेत नव्या प्रारूपामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानुसार पनवेल नाट्यगृहामध्ये जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुनावणी घेतली; पण भौगोलिक परिस्थिती तसेच नियमांचे अवलोकन करून प्रभाग प्रारूप जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खारघर कॉलनी फोरमच्या अध्यक्ष लीना अर्जुन गरड, समन्वयक मधू पाटील, बालेश भोजने यांनी खारघरमधील प्रभागासंदर्भात तोडफोड केल्याबाबतच्या हरकती घेतल्या होत्या. पनवेल महापालिकेचा ७०-८० टक्के भाग हा सिडको वसाहतींचा आहे; पण सेक्टर तयार करत असताना भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन नैसर्गिक हद्द ठरवण्यात आली. महापालिकेत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठीही सेक्टरचे सीमारेखन महत्त्वाचे समजले जाते; परंतु नव्या रचनेमध्ये सेक्टरचा एक भाग एकीकडे आणि दुसरा भाग दुसरीकडे जोडण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक पाचमधील सेक्टर १२ याची नैसर्गिक हद्द डावलल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
--------------------------
नोंदवलेले आक्षेप
- कामोठे वसाहतीतील प्रभाग ११ आणि १२ मध्ये परस्परांना सेक्टर जोडण्यात आले आहेत. त्यासंदर्भातही एकापेक्षा अधिक जणांनी आक्षेप नोंदवला होता. अनुसूचित जाती-जमाती घटकांचा विचार करून त्यांना प्रतिनिधित्व देण्याबाबत सूचना ॲड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली होती.
- दीपक पाटील यांनी कळंबोलीमधील सात, आठ आणि नऊ प्रभागांमध्ये झालेल्या बदलाबाबत सूचना केल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष शहबाज पटेल यांनीसुद्धा प्रभाग तीनमध्ये इतर भाग जोडल्यामुळे आक्षेप नोंदवला होता; परंतु हरकती फेटाळण्यात आल्या.
-----------------------------
हरकती, सूचनांबाबत सुनावणी घेण्यात आली. त्यासंदर्भात एक स्वतंत्र माहिती तयार करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा अहवाल सादर केला. लोकसंख्या, रस्ते याचा आधार घेऊन निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करत ही प्रभागरचना तयार करण्यात आली.
- गणेश शेटे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महापालिका
-----------------------------
पनवेल महापालिकेची प्रभागरचना सत्ताधाऱ्यांसाठी अनुकूल करण्यात आली आहे. सिडकोने भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करूनच सेक्टरची निर्मिती केली; परंतु खारघरमध्ये त्याचा आधार प्रारूप करताना घेण्यात आला नाही. याबाबत हरकती नोंदवल्या होत्या; परंतु त्या विचारात घेतल्या नाहीत.
- लिना गरड, माजी नगरसेविका, खारघर
-----------------------------
निवडणूक विभागाने सर्व निकषांच्या आधारे प्रभाग प्रारूप तयार केले. जिल्हाधिकाऱ्यांनी तटस्थ पद्धतीने सुनावणी घेण्यात आली. त्याचे सादरीकरण निवडणूक आयोगासमोर करण्यात आले. सर्व बाबींचे अवलोकन करूनच अंतिम प्रभागरचना जाहीर केली आहे. आता प्रभाग निश्चित झालेले आहेत.
- तुकाराम सरक, कळंबोली शहरप्रमुख, शिवसेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.