निखिल मेस्त्री, पालघर
आदिवासी समाज हा निसर्गपूजक आहे. या समाजाची संस्कृती आणि त्याच्या छटा वारली चित्रशैलीद्वारे जगप्रसिद्ध आहेत. ही वारली चित्रशैली, चित्रकला जगासमोर आणण्यासाठी आणि त्याला सांस्कृतिक ओळख मिळण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वानगाव येथील तरुण धडपड करीत आहेत. वारली चित्रसंस्कृती जगाच्या पाठीवर ओळखली जावी, यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना चांगली ओळख मिळत आहे. या चित्रशैलीद्वारे आदिवासी समाजाची संस्कृती जगासमोर आणताना तब्बल १६ देशांतील चित्रप्रेमींनी ही संस्कृती कलेतून अनुभवली आहे.
वारली चित्रसंस्कृती केवळ सीमेपूर्ती मर्यादित न ठेवता ती अटकेपार नेण्याचे प्रयत्न संजय बाळकृष्ण पऱ्हाड यांनी केले आहेत. वाणगाव येथील खंबाळा या छोट्याशा गावातून त्यांनी ही चित्रसंस्कृती जगाच्या पाठीवर नेण्याचे काम केले आहे. निसर्गाच्या समरसतेशी आणि त्याची आदिवासी संस्कृतीची असलेली नाळ याचे दर्शन वारली चित्रशैलीतून समोर येते. लग्नकार्य, सुख कार्य, दुःख कार्य आणि निसर्ग यांची सांगड गेरू आणि तांदळाच्या पिठाच्या मिश्रणाने जगासमोर आणण्याची किमया त्यांनी साधली आहे. त्यांच्याकडे अनेक परदेशी नागरिक ही वारली चित्रकला समजून घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी येत आहेत. जगभरात आदिवासी संस्कृती, लोककला, परंपरा यांबाबत जागरूकता व्हावी, या दृष्टीने त्यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत.
संजय यांची आजी तुळशी या आदिवासी समाजात सवाशीण म्हणून सुपरिचित आहेत. लग्नकार्यात दगड-मातीच्या भिंतीसह कारवीच्या कुडावर गेरू आणि तांदळाच्या पिठाने काडीच्या साह्याने त्या लग्नाचा चौक (वारली संस्कृती चित्र) काढत असत आणि या चौकाचे पूजन त्यांचे आजोबा करीत असत. त्यावेळी संजय या दोघांसोबत लग्नकार्यात चांगले गोडधोड खायला मिळेल म्हणून जात होते. हे पाहता पाहता त्यांना या संस्कृतीचे महत्त्व पटायला लागले आणि त्यातूनच त्यांनी समाजासाठी जागरूकता निर्माण करणारा कौटुंबिक वारसा पुढे नेला.
निसर्गाचे अद्भुत मिश्रण
आतापर्यंत सुमारे १६ देशांतील नागरिक त्यांच्या अद्वितीय कलाकृतीचे जवळून निरीक्षण करण्यासाठी आणि शिकण्यासाठी वाणगाव येथे आले आहेत, ज्यात अनेक शिक्षणतज्ज्ञ आणि कलाप्रेमींचा समावेश आहे. १० ते १५ हजार वर्षांपासून आदिवासी वारली चित्रकलेची संस्कृती आजही जिवंत दस्तऐवज आहे. संजय आजही राख, कोळशाची भुकटी, लाल माती, तांदळाचे पीठ अशा पारंपरिक वस्तूंनी कॅनव्हासवर चित्र रेखाटतात. ब्रशऐवजी ते बांबूची काठी किंवा खजुराच्या पातीचा काटा याचा वापर करतात. ते रेखाटत असलेल्या कलाकृतींमध्ये आदिवासी जीवन, विवाह, सण, लोककथा आणि निसर्गाचे अद्भुत मिश्रण दिसून येते. म्हणूनच त्यांची वारली चित्रे मलेशिया, फ्रान्स, अमेरिका, इंग्लड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान आणि स्वीडन यासारख्या देशांमधील लोकांपर्यंत पोहोचली आहेत.
पावित्र्य जपण्याचा प्रयत्न!
आजवर त्यांच्याकडे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी वारली चित्रकलेची गुंतागुंत आणि संस्कृती शिकली आहे. संजय यांनी देशभरातील मेळावे, प्रदर्शने आणि स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. वारली चित्रसंस्कृती ही खूप पवित्र आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व लक्षात घेऊन चुकीच्या ठिकाणी ही चित्रे मी काढत नाही. त्याचे पावित्र्य आजही जपत आहे, असे संजय यांचे म्हणणे आहे.
संस्कृतीच्या संवर्धनासाठी योगदान
वारली चित्रसंस्कृती, लोककला, परंपरा आणि संस्कृती यांचे जतन, संवर्धन करण्यासाठी स्थापन केलेल्या आयुष या संस्थेमध्ये संजय पराड हे मुख्य प्रशिक्षकाचे काम पाहतात. चित्रकला रेखाटण्याची आवड असलेल्या समाजातील तसेच स्थानिक कलाकारांना ते मोफत चित्रकलेचे शिक्षण देत आहेत. आजवर या चित्रसंस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांनी शेकडो कार्यशाळा घेतलेला आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.