आधीचे ठाणे आनंद देणारे, आताचे ठेकेदारांचे
उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ११ : ‘चित्रफीत पाहिल्यानंतर पूर्वीच्या ठाणे शहराची आठवण झाली. पूर्वीचे ठाणे शहर आनंद देणारे होते, पण आताचे ठाणे कंत्राटदारांचे झाले आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. तसेच ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्ट कारभार यांनीच ठाण्याचा श्वास रोखल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला. राम गणेश गडकरी रंगायतन येथे शनिवारी (ता. ११) अनंत तरे यांच्यावरील ‘अनंक आकाश’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
ठाण्यातील वाहतूक कोंडी आणि भ्रष्ट कारभार यांनीच शहराचा श्वास रोखला आहे. माझा वेग मंदावणारा अजून जन्माला यायचा आहे, अशा शब्दांत त्यांनी ठाण्यातील कोंडीवर नाराजी व्यक्त केली. आनंद दिघे आणि अनंत तरे यांच्यासारखे ‘राजहंस’ शिवसेनेत असते तर आज ‘कावळे’ फडफडले नसते, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरांवर निशाणा साधला. २०१४च्या निवडणुकीत तरे यांनी शिंदेबद्दल ‘हा भविष्यात दगा देईल’ असे भाकीत केले होते, ते आज खरे ठरले, असेही ते म्हणाले. ठाणे-मुंबई महापालिका लुटून खाल्ली असून ठाण्याच्या विकासाचा पैसा कुठे गेला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत सोमवारी (ता. १४) होणाऱ्या मोर्चात महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील (मनसे) सहभागी असल्याचे पुन्हा नमूद केले.
दरम्यान, सध्या सर्व आयुधे काढून घेतली असली तरी येत्या दिवाळीत ‘म्हैसासुराचा वध’ करून ज्यांनी शिवसेना आईचा घात केला त्यांनाही तसेच फळ मिळेल. सत्ता मिळवल्यानंतर आई एकवीरा देवीच्या दर्शनाला येण्याचे आश्वासन त्यांनी ठाणेकरांना दिले.
...तर आज पश्चाताप झाला नसता!
तेव्हा काही जण प्रामाणिक निष्ठेने सांगत होते, परंतु आपल्याभोवती निष्ठेचे मुखवटे लावलेल्यांनी इतका वेढा घातला होता की त्यात निष्ठावान दिसले नाहीत. माझे चुकलेच; तेव्हाच अनंत तरे यांचे ऐकले असते तर आज पश्चाताप झाला नसता, अशी कबुली उद्धव ठाकरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.