तलासरीत गांजाची साठवणूक; दोघांना अटक
तलासरी : पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत तलासरी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजे संभा येथील इराणी फार्म वाडीमध्ये गांजाची साठवणूक केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून सुमारे २.९६५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या सूचनेनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक अजय गोरड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने छापा टाकून ही कारवाई केली. जप्त मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेण्यात आला आहे.
......................
वादातून तरुणावर चाकू हल्ला
ठाणे : वर्तकनगर येथील भीमनगर परिसरात जुन्या वादातून एका २८ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर येथे राहणारे तथा तक्रारदार रोहन रामाश्रय गिरी (२८) या दिलेल्या तक्रारीत रविवारी (ता. १) रोहन गिरी हे त्यांचा मित्र हेमंत मौर्या याच्या वाढदिवसानिमित्त येऊर येथे गेले होते. या वेळी त्यांचे ओळखीचे प्रथमेश मोरे, आकाश भारतीय व अमित चौहान यांनी दारू पिऊन रोहन गिरी यांना शिवीगाळ केली. त्या वेळी वाद झाला असून, त्यानंतर संबंधित व्यक्तींनी रोहन गिरी यांना मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
......................
हॉर्न वाजवला म्हणून व्यावसायिकाला मारहाण
ठाणे : संथ गतीने जाणाऱ्या गाडीला हॉर्न वाजवला म्हणून व्यावसायिकाला एका कारचालकासह त्याच्या साथीदारांनी मिळून लाथा-बुक्क्यांनी व दगडाने हल्ला केल्याची गंभीर घटना घोडबंदर रोडवरील वाघबीळ ते हिरानंदाणी इस्टेट येथे घडली. या मारहाणीत व्यावसायिक नौसाद अहमद अब्दुल लतिफ खान यांच्या डाव्या कानाला व पाठीवर दुखापत झाली असून, त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
......................
गॅस सिलिंडरचा भडका; घराचे नुकसान
ठाणे : दिवा (पूर्व) येथील खर्डी गाव परिसरात बुधवारी दुपारी भारत गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याची घटना घडली. गणेश भोईर यांच्या मालकीच्या ओम बंगल्यातील किचनमध्ये अचानक सिलिंडरला आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि काही मिनिटांत आग आटोक्यात आणली. या आगीत किचनमधील साहित्य, फ्रिज, इलेक्ट्रिक वायरिंग आणि गॅस सिलिंडरचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.