ठाणे रेल्वे स्थानकात महागडा मोबाईल लंपास
ठाणे लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल
ठाणे, ता. १४ : नेरूळहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलमध्ये एका प्रवाशाला लागलेली अवघ्या पाच मिनिटांची झोप तब्बल एक लाख ३१ हजार रुपयांना पडली आहे. धावत्या लोकलमध्ये चोरट्याने संधी साधत तरुणाचा महागडा मोबाईल फोन लंपास केला असून, याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण येथे राहणारे आशीष यादव (वय २५) हे गुरुवारी (ता. १२) कामानिमित्त नेरूळला गेले होते. रात्री काम आटोपून साधारण ११.३०च्या सुमारास त्यांनी नेरूळ रेल्वे स्थानकावरून ठाण्याकडे जाणारी धीमी लोकल पकडली. आशीष हे पुरुषांच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होते. प्रवास सुरू असताना शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्री १२.०५च्या सुमारास लोकल दिघा गाव स्थानकात पोहोचली. या वेळी आशीष यांनी आपला मोबाईल पॅन्टच्या खिशात सुरक्षित ठेवला; मात्र त्यानंतर त्यांना काही क्षणातच झोप लागली.
अवघ्या पाच मिनिटांनी, म्हणजे १२.१० वाजता लोकल ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १० वर पोहोचली. गाडी स्थानकात लागताच आशीष यांना जाग आली. त्यांनी सवयीप्रमाणे खिशात हात घातला असता, त्यांना आपला मोबाईल गायब असल्याचे लक्षात आले. झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने अत्यंत शिताफीने एक लाख ३१ हजार १९९ रुपये किमतीचा हा फोन चोरला होता. गर्दी नसलेल्या वेळेत आणि प्रथम श्रेणीच्या डब्यात ही चोरी झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आशीष यादव यांच्या तक्रारीवरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलिस आता स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्याचा शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.