चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून
नऊ वर्षांच्या मुलासमोरच हत्येचा थरार
सकाळ वृत्तसेवा
कल्याण, ता. १४ ः कल्याणमधील उंबर्डे परिसरात पत्नीची हत्या करून नाशिक पोलिसांसमोर हजर झालेल्या पतीच्या कबुलीजबाबामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अर्चना ऊर्फ बाली विशाल भुतकर (२५) असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती विशाल साहेबराव भुतकर (३०) याने हा खून केल्याचा आरोप आहे. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नऊ वर्षांचा मुलगा असल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादामुळे भुतकर दाम्पत्य गेल्या दीड वर्षापासून वेगवेगळे राहत होते. विशाल हा मोठ्या मुलासह नाशिक येथे तर अर्चना कल्याणमधील उंबर्डे गावात पाच वर्षांच्या मुलाचे संगोपन करीत होती. बुधवारी (ता. ११) विशाल नाशिकहून कल्याणमध्ये पत्नीला भेटण्यासाठी आला होता. पुन्हा एकत्र राहून संसार सुरू करण्यासाठी त्याने अर्चनाला विनंती केली. मात्र अर्चनाने नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये वाद झाला. या वादातून शनिवारी (ता. १४) पहाटे दोनच्या सुमारास संतप्त झालेल्या विशालने पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केल्याचे तपासात समोर आले.
हत्या केल्यानंतर विशाल नाशिकला पळून गेला. त्याने भावासोबत नाशिक येथील पोलिस ठाण्यात जाऊन ‘मी माझ्या बायकोला मारून आलो आहे,’ अशी कबुली दिली. नाशिक पोलिसांनी संपर्क केल्यानंतर कल्याणमधील खडकपाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असता अर्चना भुतकर हिचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला. नातेवाइकांच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलिस ठाण्यात अर्चना हिच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपआयुक्त अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार तपास पथकाने नाशिक येथून विशाल याला ताब्यात घेऊन कल्याण येथे अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटारसायकल व मोबाईल जप्त करण्यात आला आहे. शनिवारी (ता. १४) आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने आरोपीला सोमवारपर्यंत (ता. १६) पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विशाल चव्हाण यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.