पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019 : बालेकिल्ला राष्ट्रवादीचा...चर्चा भाजपची! 

प्रवीण जाधव

सातारा - लोकसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्यातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. खासदार व आमदार दोघांचे समर्थक पक्षावर नाराजी व्यक्त करत पक्ष बदलाची मागणी करत आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचीच चर्चा रंगत आहे. कार्यकर्त्यांच्या या नाराजी नाट्यावर नेते खरेच काही भूमिका घेणार, की या चर्चा आळवावरचे पाणी ठरणार, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघातील अन्य आमदारांनी आपली भूमिका पक्षाध्यक्षांच्या कानावर घालून वेट ऍण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. मात्र, सातारा मतदारसंघ या मुद्यावर धुमसत आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपचे नरेंद्र पाटील यांच्याबरोबरच्या "मिसळ पार्टी'तून भाजपला मदत करण्याचा किंवा जवळीक साधण्याचा "मेसज' देण्याचा प्रयत्न केला. तिकडे जावळीत त्यांचेच समर्थक वसंतराव मानकुमरेंनीही विरोधाचा संदेश दिला. या सर्व घडामोडीनंतर उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनाही राहवले नाही. त्यांनी बैठक घेत पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याचा आरोप केला. उमेदवारी तातडीने जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली; परंतु त्याचबरोबर भाजपमध्ये जावू, अशी आवईही उठवली. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांच्या तोंडूनही असे यावे, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे नव्हते. 

मात्र, दुसऱ्याच दिवशी आमदार समर्थकांनीही बैठक घेत पक्षाने उदयनराजेंना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका मांडली. लोकशाही राज्य व्यवस्थेत पक्षीय पातळीवरही कार्यकर्त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाकडे एखाद्याची तक्रार करणे आणि त्यावर अपेक्षित भूमिका घेतली जात नसेल, तर त्रागाही काही पातळीवर गृहित धरला जातो. परंतु, ज्या पक्षामुळे आजपर्यंत सत्तेची फळे चाखली, मान-मरातब मिळाला, तोच पक्ष सोडण्याचा आग्रह धरणे राष्ट्रवादीच्या मतदाराला रूचताना दिसत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या या मागण्यांवर नेत्यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. 

अशा धमक्‍यांचा पक्षीय पातळीवरील राजकारणात किती प्रभाव पडतो, याची दोन्ही नेत्यांना चांगलीच जाणीव आहे. त्यामुळे दोघांनीही थेट अशा पद्धतीची भूमिका घेणे टाळले आहे; परंतु ऐन निवडणुकांच्या वातावरणात आपल्यापेक्षा दुसऱ्याच पक्षाची चर्चा व्हावी, हे राष्ट्रवादीच्या मतदाराला अपेक्षित नाही. सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तो जितका नेत्यांमुळे आहे, तितकाच पक्षाध्यक्ष शरद पवार यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेही आहे. सध्याचे वातावरण पाहता खासदार असो वा आमदार पक्ष सोडण्याची भूमिका घेऊच शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. दोघांच्या मतदारसंघाच्या चाव्या पक्षाकडे आहेत. त्यामुळे विरोधाची धार वाढूनही उदयनराजे पक्षाध्यक्षांच्या सल्ल्यानुसार डोके थंड ठेवून आहेत, तर कार्यकर्त्यांच्या भूमिकेबद्दल मला काही माहीत नाही, असे शिवेंद्रसिंहराजे वारंवार म्हणत आहेत. तरीही कार्यकर्त्यांतून होणारे आक्रंदन हे केवळ कार्यकर्त्यांच्याच मनाने चालले आहे, हे मतदाराला पटत नाही. कारण ते थांबलेही जात नाही. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. याचा पक्षाच्या प्रतिमेवर नक्कीच परिणाम होतो आहे. विरोधकांचे आयतेच मनोरंजन होत आहे. त्यामुळे दोन्ही नेते कार्यकर्त्यांच्या या भूमिकेबाबत ठोस निर्णय घेणार, की पक्षाचाच निर्णय शेवटचा असणार हे वाक्‍य ऐकायला मिळणार, याची उत्सुकता सातारकरांमध्ये आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT