Kolhapur pollution
Kolhapur pollution sakal
कोल्हापूर

प्रदूषणमुक्तीसाठी एकवटणार कोल्हापूरकर

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली पंचगंगा आपली माता आहे आणि तिचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तमाम कोल्हापूरकर आणि ‘सकाळ’च्या पुढाकाराने होणाऱ्या ‘पुन्हा साथ देऊया, चला, पंचगंगा वाचवूया’ मोहिमेतून तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी असून ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीतून व्यक्त झाला. मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज शहरातील विविध तालीम संस्था, सामाजिक व सेवाभावी संस्था पदाधिकाऱ्यांची ही बैठक ‘सकाळ’च्या शिवाजी उद्यमनगर येथील कार्यालयात झाली.

‘सकाळ’चे निवासी संपादक निखिल पंडितराव यांनी मोहिमेबाबतची भूमिका स्पष्ट केली. २०११ ला राबवलेल्या मोहिमेनंतर नदीत रक्षेबरोबरच पर्यावरणपूरक विसर्जनाचा आदर्श कोल्हापूरकरांनी दिला. शहरात दोन ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारली; पण सद्यस्थितीचा विचार करता भविष्याचा वेध घेऊन विविध कृती कार्यक्रमांवर भर देणे आवश्यक आहे. त्याचसाठी ही मोहीम असल्याचे त्यांनी सांगितले.

कसबा बावडा येथील बलभीम तालमीचे प्रशांत पाटील म्हणाले, ‘‘प्रदूषण नियंत्रणाची सुरुवात स्वतःपासून होणे गरजेचे आहे. सर्व्हिसिंग सेंटर चालवणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. गाडी धुतल्याने ऑइल आणि केमिकल मिश्रित पाणी नाल्यातून नदीत मिसळते हे घातक आहे.’’ 

वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशनचे अमोल बुड्ढे यांनी नदीत मिसळणाऱ्या नाल्यावर प्रत्येक एक किलोमीटरवर अडथळे उभारण्याची गरज असून यामुळे प्लास्टिक नदीत जाणार नाही, असे सांगितले. ‘अर्थ वॉरियर्स’चे आशिष भोंगळेकर यांनी शून्य कचरा ही संकल्पना मांडली. याबाबतच्या प्रयोगाला सुरुवात झाली असून, हे शक्य आल्याचे त्यांनी सांगितले. घरी निर्माण होणारा सर्व प्रकारच्या कचऱ्याची विल्हेवाट घराच्या परिसरातच लावता येणारी ‘पंचतारांकित घर’ ही संकल्पना सर्वत्र राबवणार असल्याचे ते म्हणाले.

जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी नदीवरील पुलाच्या बाजूने जाळी लावावी, अशी मागणी केली. अनेकजण गाडीतून जाताना नदीत काही ना काही भिरकावतात. त्याला आळा घालण्याची गरज आहे. राष्ट्रीय सेवा योजनेसारखे उपक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांनी पुढाकार घेऊन काम करण्याची गरज व्यक्त केली. 

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप देसाई म्हणाले, ‘‘पंचगंगा घाटावर होणारी गर्दी लक्षात घेऊन तेथे स्वच्छतागृह असावीत. येणाऱ्या यात्रेकरूंना स्वच्छ व सुंदर नदी अनुभवता येईल. त्यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.’

आखरी रास्ता कृती समितीचे किशोर घाटगे यांनी कारखाने, मोठ्या सोसायटी, अपार्टमेंट यातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याकडे लक्ष वेधले. या ठिकाणाहून निर्माण होणारे सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेशिवाय नाल्यातून नदीत जाते, याकडे गांभीर्याने बघण्याची गरज असल्याचे नमूद केले. 

कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदुलकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ निष्क्रिय असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मुळात निर्माण होणारे सांडपाणी व शुद्धीकरण होणारे सांडपाणी याची खरी आकडेवारी व कागदावरची आकडेवारी वेगवेगळी असल्याचे त्यांनी सांगितले. नदीच्या स्वच्छतेसाठी उच्चवर्गीयांचेही प्रबोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

‘अर्थ वॉरियर’च्या वर्षा वायचळ यांनी प्लास्टिकच्या समस्येवर उपाय शोधण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यासाठी बंदी असणाऱ्या प्लास्टिक वापरावर दंडाची कारवाई व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थांचे दिलीप देसाई यांनी प्रदूषणाचे स्रोत हे घरापासून मोठमोठ्या कारखान्यांपर्यंत असल्याचे सांगितले. त्यासाठी प्रत्येक पातळीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. केवळ प्रशासनावर अवलंबून राहिलो, तर नदी होती असे सांगावे लागेल. एकत्रित येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

परीख पूल नूतनीकरण समितीचे फिरोज शेख म्हणाले, ‘‘प्रदूषणाबाबत न ऐकणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही झाली पाहिजे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कारवाई होत नाही. त्यामुळे काहीजण अगदी जाहीरपणे प्रदूषण होईल, अशी कृत्ये करतात.’’श्री महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी समाजातील सर्व घटकांनी मिळून पंचगंगा प्रदूषणमुक्त करूया, असे आवाहन केले.

वृक्षप्रेमी संस्थेचे पारितोष उरकुडे, प्रवीण पाटील, सुहास बट्टेवार, संतोष आयरे, धीरज मुळे, रमेश दिवेकर यांनीही सूचना मांडल्या.

पर्याय आहेत; पण महापालिका उदासीन

पंचगंगा घाटावर परीट घाट आहे. येथे परीट समाजबांधव अनेक वर्षे कपडे धुण्यासाठी येतात. त्याशिवाय जनावरे धुण्यासाठीही याच ठिकाणी मोठी गर्दी असते. या दोन्ही गोष्टींसाठी दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. परीट समाजाबरोबरच गवळी व म्हैस मालकांचीही या ठिकाणी सोय झाल्यास कोणतीच हरकत नाही; पण महापालिकेच्या पातळीवर योग्य ती कार्यवाही होत नसल्याचे माजी नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी सांगितले.

पिरळवासीय जलदिंडीत होणार सहभागी

बैठकीत निर्धार; पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी लावणार हातभार

कसबा तारळे : ‘चला पंचगंगा वाचवूया’ या ‘सकाळ’ने हाती घेतलेल्या राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीत सर्व गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा निर्धार पिरळ (ता. राधानगरी) येथे आज झालेल्या बैठकीत करण्यात आला. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीच्या नदी परिक्रमेचा गुरुवारी (ता. २१) रोजी सकाळी आठ वाजता लोकप्रतिनिधी, विविध पदाधिकारी, शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिरळ येथील भोगावती नदीतून प्रारंभ होणार आहे. याच्या पूर्वतयारीसाठी आज पिरळ येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सरपंच मारुती चौगले अध्यक्षस्थानी होते.

अमरेंद्र मिसाळ म्हणाले, ‘नदीत दहा-बारा फुटांवरून तळ दिसावा इतके स्वच्छ पाणी आहे. ‘सकाळ’च्या सामाजिक उपक्रमात आम्ही सर्वजण सहभागी होऊ, ‘डी. जी. चौगले म्हणाले, ‘नदी स्वच्छ ठेवण्याला ग्रामस्थ प्राधान्य देतात, परंतु कारखाने व अन्य घटकांमुळे होणारे प्रदूषण रोखावे.

संदीप पाटील म्हणाले, ‘आम्ही नदी प्रदूषित होणार नाही, याबाबत दक्ष असतो. पिरळसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने विशेष निधी मिळावा. आर. डी. चौगले म्हणाले, ओढ्यातून नदीत मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी शासनाने छोटे बंधारे बांधून दिल्यास व तेथे पाणी अडवल्यास या पाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करणे शक्य आहे.’

दिलीप कांबळे म्हणाले, ‘सांडपाणी नदीत मिसळू नये, यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समितींद्वारे काही प्रकल्प राबविता येणे शक्य आहे.

ग्रामसेवक युवराज पाटील यांनी शोषखड्डे कार्यान्वित करण्याला ग्रामस्थांनी प्रतिसाद देण्याचे आवाहन केले. यावेळी विशाल पाटील, उपसरपंच संतोष लोहार, संतोष पाटील, अशोक पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी रेडेकर, गंगाराम पाटील, बातमीदार मोहन नेवडे, एस. के. पाटील आदींनीही मुद्दे मांडले. बातमीदार सुरेश साबळे यांनी स्वागत केले. राजू पाटील यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला आर. डी. चौगले, गंगाराम पाटील, राम एकावडे, के. पी. पाटील,आर. के. पाटील, राजेंद्र पाटील, एकनाथ व्हरकट, भाऊसाहेब पाटील, प्रकाश पोवार, दत्तात्रय लोहार, सदाशिव कांबळे, सलीम महात, मुख्याध्यापक सूर्यकांत पाटील, एम. पी. शिंदे, शैलजा कानकेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. समीर आसणेकर यांनी आभार मानले.

ग्रामस्वच्छता होणार

उपक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाआधी एक-दोन दिवस पिरळमध्ये तसेच कार्यक्रमस्थळ परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबविण्याचे नियोजन ग्रामपंचायत पदाधिकारी,शिक्षक व स्थानिक नेतेमंडळींनी केले.

पंचगंगा वाचवा मोहिमेत मॉंटॅक लाईफस्टाईल, श्री महालक्ष्मी भक्त मंडळ, बलभीम तालीम (कसबा बावडा), जुना बुधवार तालीम मंडळ, पंचगंगा विहार मंडळ, परिख पूल नूतनीकरण समिती, सोल्जर्स ग्रुप, आखरी रास्ता कृती समिती, प्रजासत्ताक सामाजिक संस्था, कॉमन मॅन संघटना, पंचगंगा तालीम मंडळ, सायबर महाविद्यालय एमबीए विभाग, मैत्रेय प्रतिष्ठान, कोल्हापूर जिल्हा माउंटेनिअरिंग असोसिएशन, प्रायव्हेट क्लासेस टीचर्स असोसिएशन, जैन सोशल ग्रुप, देवराई (डेव्हलपमेंट रिसर्च अवेअरनेस ॲण्ड ॲक्शन इन्स्टिट्यूट), गार्डन्स क्लब, पंख फाउंडेशन, व्हाईट आर्मी, निसर्गमित्र, विज्ञान प्रबोधिनी, हिंदू युवा प्रतिष्ठान, रंकाळा वॉकर्स, अरिहंत जैन फाउंडेशन, दळवीज् आर्टस् इन्स्टिट्यूट, वृक्षप्रेमी ऑर्गनायझेशन, अर्थ वॉरियर्स, कलासाधना मंच, सार्थक क्रिएशन्स, डॉ. आझाद नायकवडी लोककला, सामाजिक व सांस्कृतिक फाउंडेशन, पोलिसमित्र रेस्क्यू फोर्स, राजारामपुरी युवक मित्रमंडळ आदी संस्था सहभागी होणार आहेत. ‘पंचगंगेला वाचविण्यासाठी आम्ही सहभागी होतोय, तुम्हीही व्हा’ असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

Pune Crime : सहा महिन्यांच्या बालकाची तीन लाखांत विक्री; बालकाचे अपहरण करणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक

RTE Admission : आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

SCROLL FOR NEXT