Who knows these are important stages in the development of Kabaddi
Who knows these are important stages in the development of Kabaddi 
कोल्हापूर

माहित आहे काय, कबड्डीच्या विकासातील हे महत्वाचे टप्पे

युवराज पाटील - सकाळ वृत्तसेवा

कबड्.डीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र झटला. कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला, तो महाराष्ट्रामुळेच. आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेल्या कबड्डीला प्रो- कबड्डीने पैसा व प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, या झगमगाटात पारंपरिक कबड्डी हरवली जात आहे. कबड्डीच्या वाटचालीचा घेतलेला मागोवा.
कबड्डी हा भारतातील प्राचीन खेळ. या खेळाची नेमकी सुरवात कशी व केव्हा झाली, याविषयी निश्‍चित असे काही सांगता येत नाही; परंतु देशातील प्रत्येक राज्यात थोड्या फार फरकाने हा खेळ खेळला जात असे. महाराष्ट्रात व इतर राज्यातही पैलवान रग जिरवण्यासाठी हा खेळ खेळत असत. काही जण एकत्र जमत. मैदानाची लांबी-रुंदी ठरलेली नसे. फक्त एक मध्यरेषा तेवढी असे. काही न उच्चारता प्रतिस्पर्ध्याच्या हद्दीत जाऊन निसटून यायचे. गडी पकडला गेल्यावर त्याच्या छातीवर तो चीत म्हणेपर्यंत इतर खेळाडू बसत. 
महाराष्ट्रात होळी, शिमगा अशा सणांच्या वेळी हा खेळ खेळला जाई. प्रामुख्याने आखाड्यात व तालमीत हा खेळ खेळला जाई. मुका असलेला हा खेळ हळूहळू बोलका होऊ लागला. सू सू, सूर सूर, राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमानकी, हुतूतू अशा वेगवेगळ्या शब्दोच्चारांनी हा खेळ बोलका झाला. जसजसा काळ लोटत गेला तसतसा हा खेळ लोकप्रिय होत गेला. महाराष्ट्रात या खेळाला नंतर हुतूतू म्हणून ओळखले जाऊ लागले. संपूर्ण देशात या खेळाला काही प्रमाणात समान स्वरूप प्राप्त झाले होते. असे असले तरी देशातील विविध राज्यांत या खेळाला वेगवेगळ्या नावाने संबोधले जात असे. 
महाराष्ट्रात हुतूतू, केरळात वंडीवडी, चेन्नईमध्ये चेडूयुडू, पंजाबात झाबर गंगा, सौची पक्की, बंगालमध्ये हुडूडू, उत्तर भारतात कोनवरा, साबरगण्णा अशा नावांनी हा खेळ ओळखला जात असे. या प्रादेशिक सुरांचं एकात्मीकरण करण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. प्रादेशिकता बाजूला जाऊन संपूर्ण भारतात हा खेळ कबड्डी नावाने ओळखला जाऊ लागला. तो महाराष्ट्राच्या, मराठी माणसांच्या प्रयत्नांमुळे. या खेळातील विविधतेतून महाराष्ट्राने एकता निर्माण केली. पूर्वी हुतूतू हा खेळ काही ठरावीक नियमांनीच खेळला जात असे, नियमांच्याअभावी पूर्वी गोंधळ होत असे. म्हणूनच हुतूतू हा शब्द गोंधळ, धांगडधिंगा या अर्थी वापरला जात असे. 
1931 साली अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचे चौथे अधिवेशन अकोला येथे झाले. त्या अधिवेशनात भारतीय देशी खेळांचे नियम तयार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली. या समितीने भारतीय देशी खेळांचे नियम तयार केले. या नियमांना नाशिक येथे 1937 साली झालेल्या अधिवेशनात मान्यता देण्यात आली. त्यात हुतूतू (कबड्डी) खेळाचा समावेश होता. 1938 साली नियमात काही दुरुस्त्या करण्यात आल्या. याच सालात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कबड्डी खेळाचा समावेश करण्यास मान्यता दिली. महाराष्ट्रात तयार केलेल्या नियमांनुसार हा खेळ संपूर्ण भारतात खेळला जाऊ लागला. 
1944 साली भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने महाराष्ट्रात तयार केलेल्या हुतूतूच्या नियमांना मान्यता दिली. विविध नावाने व दमाने खेळल्या जाणाऱ्या या खेळाच्या एकात्मतेसाठी 1945 सालापासून प्रयत्न होऊ लागले. खुद्द महाराष्ट्रातही त्यामुळे वादळ उठले. हुतूतू-कबड्डी हा वाद शिगेला पोहोचला होता. 
1952 साली सदुभाऊ गोडबोले समितीने कबड्डी शब्दोच्चाराचा नियम केला व शिफारस केली. 1953 साली कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाने दम (श्‍वास) घेण्यासाठी कबड्डी या शब्दोच्चाराचाच वापर करण्याचा ठराव मंजूर केला. तेव्हापासून हा खेळ कबड्डी म्हणून ओळखला जाऊ लागला. 
महाराष्ट्राने कबड्डीला एका सुरात बांधले. नियमबद्ध केले, असे असले तरी कबड्डीचा प्रसार मात्र संपूर्ण देशात ज्या वेगाने व्हायला पाहिजे. त्या वेगाने होत नव्हता. त्यानंतर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया या कबड्डीच्या राष्ट्रीय संघटनेचे नाव बदलून भारतीय हौशी कबड्डी महासंघ असे करण्यात आले. 1972 साली नव्या महासंघाने पहिली राष्ट्रीय स्पर्धा जयपूर येथे घेतली. कबड्डीविषयी आत्मीयता असलेल्या कबड्डीवर प्रेम करणाऱ्या मराठी माणसाच्या हाती देशाच्या कबड्डीची सूत्रे येताच कबड्डीचा प्रसार वेगाने झाला. 1973 साली महासंघाने कबड्डीच्या नियमांत काही बदल घडवून हा खेळ गतिमान करण्याचा प्रयत्न केला. कबड्डीला नियमात बांधतानाच या खेळाचा प्रसार होणेही तितकेच महत्त्वाचे होते. त्यासाठी संघटनेकडे पैसा हवा होता. महासंघाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्याची जबाबदारी वास्तविक संपूर्ण देशाची होती; परंतु ते कामही महाराष्ट्रानेच केले. महासंघासाठी पैसे देण्यासाठी मराठी माणूसच पुढे आला. 
आणीबाणीच्या काळात महासंघाचे अध्यक्षपद ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे आले. सरचिटणीस शंकर ऊर्फ बुवा साळवी आणि शरद पवार यांनी कबड्डीच्या प्रसारासाठी अपार मेहनत घेतली. कबड्डीला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविले. कबड्डीने देशाच्या सीमा ओलांडल्या. 
शरद पवार व बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त करून दिले. 1982 साली एशियन कबड्डी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्याचे पहिले अध्यक्ष शरद पवार झाले. 1982 हे कबड्डीचे भाग्याचे वर्ष. नवी दिल्ली येथे झालेल्या नवव्या एशियाड स्पर्धेत प्रदर्शनीय खेळ म्हणून कबड्डीचा समावेश करण्यात आला. 1990 साली बीजिंग येथे झालेल्या एशियाडपासून कबड्डीचा एशियामध्ये समावेश करण्यात आला. शरद पवार व बुवा साळवी यांच्या प्रयत्नांमुळे कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कबड्डीने आशिया खंडाची वेसही ओलांडली. गेल्या पन्नास वर्षांत संपूर्ण देशात कबड्डीचा विकास झाला व प्रचार झाला. कबड्डी आंतरराष्ट्रीय झाली. याचे श्रेय महाराष्ट्राला आहे. 

पारंपरिक कबड्डी जगली पहिजे 

मागील काही वर्षांत देशात प्रो कबड्डी स्पर्धेने हंगामा केला आहे. या स्पर्धेमुळे कबड्डी खेळाडूंना पैसे मिळू लागले. प्रसिद्धी मिळाली. लोक कबड्डी पाहू लागलेत. हे सारे ठीक आहे; परंतु या स्पर्धेमुळे पारंपरिक पद्धतीने खेळल्या जाण्याऱ्या देशातील अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा धोक्‍यात आल्या आहेत. प्रो कबड्डीत खेळणारे खेळाडू या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धांमध्ये खेळण्याचे टाळतात. चांगले खेळाडू या स्पर्धांमध्ये खेळणार नाहीत, म्हणून स्पर्धा घेण्याचे टाळले जाते. ज्या अखिल भारतीय व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा वर्षानुवर्षे खेळल्या जात आहेत, त्या स्पर्धा धोक्‍यात आल्या आहेत. याचा परिणाम पारंपरिक कबड्डीवर होणार आहे. 
पूर्वी आपली निवड जिल्ह्याच्या, राज्याच्या नंतर भारताच्या संघात व्हावी, यासाठी खेळाडू जीवाचे रान करत होते. आता खेळाडूंचे लक्ष असते ते प्रो कबड्डी. खेळाडूंची ओळख देखील त्यांच्या प्रो कबड्डीतील संघामुळे होऊ लागलीय. ज्या व्यावसायिक संघातून या खेळाडूंची निवड झाली आहे. त्या आपल्या व्यावसायिक संघातून देखील हे खेळाडू खेळण्याचे टाळत आहेत. याचा परिणाम आता दिसला नाही तर भविष्यात दिसेल. मॅटवरील कबड्डीमुळे खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण वाढले आहे. 
आपल्याच देशात वेगवेगळ्या नावाने खेळल्या जाणाऱ्या या खेळाला महाराष्ट्राने कबड्डी हे नाव दिले. अखिल भारतीय कबड्डी संघटना उभी केली. या खेळाचा प्रसार व प्रचार केला. कबड्डीला आंतरराष्ट्रीय केले. ती पारंपरिक कबड्डी प्रो कबड्डीमुळे धोक्‍यात येऊ लागलीय. टी-20 मुळे आयपीएल म्हणजेच क्रिकेट असे लोकांना वाटू लागलंय. कसोटी क्रिकेट कुणी पाहत नाही. कसोटी पाहण्यासाठी कुणी स्टेडियमवर जात नाही. तसेच भविष्यात प्रो कबड्डी म्हणजेच खरी कबड्डी असे लोक म्हणतील. मातीतील परंपरिक कबड्डीला लोक विसरतील. काळाची पावले ओळखून वेळीच उपाययोजना केली पाहिजे. पारंपरिक कबड्डीला वाचविण्यासाठी आता महाराष्ट्रालाच पुढाकार घ्यावा लागेल. 

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT