इचलकरंजी - रंगपंचमीनंतर रुई (ता. हातकणंगले) येथे पंचगंगा नदीत पोहावयास गेलेले इचलकरंजीचे दोन तरुण आज बुडाले. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता. शुभम महाजन (वय २१) व प्रथमेश सुभेदार (१८, दोघे रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत हातकणंगले पोलिसांनी सांगितले, की ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. रंगपंचमीनंतर पंचगंगा नदीपात्रात सुमारे २०० ते ३०० तरुण अंघोळ करीत होते. शुभम मित्र राकेश महाजन, सचिन कोरवी, ऋषीकेश मरळी, प्रथमेश यांच्यासह पोहायला आला होता.
नदीपात्रात गर्दी असल्याने ते बुडत असल्याचे कोणाच्या फारसे लक्षात आलेच नाही. काही जणांनी आरडाओरड केली; मात्र तोपर्यंत पाण्याच्या प्रवाहात ते दिसेनासे झाले, अशी माहिती तेथे पोहणाऱ्या काही जणांनी दिली.
याबाबतची माहिती हातकणंगले पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर शोधमोहीम सुरू झाली. रुईचे पोलिसपाटील नितीन तराळ, मंडल अधिकारी आर. डी. पुजारी, तलाठी गणेश आवळे शोधमोहिमेत होते. अंधारात तपासात अडथळा येत असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.
शुभम हा शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इलेक्ट्रॉनिक इंजिनियरिंगच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याचे वडील यंत्रमाग कामगार आहेत. प्रथमेश हा कबनूर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात बारावीला आहे. त्याचे वडील हार विक्रीचा व्यवसाय करतात. कॉन्स्टेबल शंकर चव्हाण तपास करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.