पिंपरी, ता.२८ : शहरात मोठ्या थाटामाटात बुधवारी गणरायाचे स्वागत करण्यात आले. घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या दीड दिवसाच्या गणरायाला गुरुवारी भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘सर्वांना सुखी ठेवा आणि पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या जयघोषात लहानांसह मोठ्या व्यक्तींनी गणरायाला निरोप दिला. गणपती विसर्जनासाठी विविध घाटांवर विसर्जन हौदाची सोय करण्यात आली होती. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थांकडून मूर्ती संकलनही करण्यात आले. शहरातील २६ विसर्जन घाटांवर पालिकेच्या वतीने तयारी करण्यात आली आहे.
दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते, तोच त्यांना निरोप देण्याची वेळ आली. त्यामुळे गणेशभक्तांना रुखरुख लागली. गुरुवारी सकाळपासूनच घरोघरी विराजमान झालेल्या दीड दिवसाच्या गणपतीला मोदक, पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून विसर्जन केले. निगडी, प्राधिकरण, चिंचवडगाव, रावेत, पिंपरीगाव पिंपरी कॅम्प, अजमेरा कॉलनी, भोसरी, यमुनानगर, मोरवाडी, आकुर्डी, मोशी प्राधिकरण, चऱ्होली, डुडुळगाव, नेहरूनगर, कासारवाडी, दापोडी, जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड, पुनावळे, ताथवडे, हिंजवडी या भागात घरगुती गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. स्वयंसेवी संस्था तसेच गृहनिर्माण संस्थांनी कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे. ठिकठिकाणी पालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा तसेच गणेश मूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करू नये, असे आवाहन केले आहे. त्यानुसार, शहरातील क्षेत्रीय कार्यालयनिहाय गणेशमूर्ती विघटन केंद्रांची स्थापना करण्यात आली.
नोकरदार वर्गाने दिला गणरायाला निरोप
नोकरदार वर्गामध्ये दीड दिवसासाठी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचे प्रमाण अधिक आहे. गुरुवारी दुपारपासून पवना, मुळा आणि इंद्रायणी घाटावर विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सायंकाळी विसर्जनासाठी भाविक येताना दिसत होते. तर अधून-मधून पावसाच्या सरी पडत होत्या. पावसापासून वाचण्यासाठी गणरायावर धरलेल्या छत्र्या सावरत, गणेशमूर्तीवर प्लॅस्टिकचे आच्छादन घालून गणेशभक्त विसर्जनासाठी आले होते. गणेश तलाव, रावेत जाधव घाट, चिंचवड थेरगाव घाट, मोरया घाट, काळेवाडी घाट, पिंपरी घाट येथे विसर्जनाची सोय पालिकेच्या वतीने केली आहे. तसेच वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पथक, नदी प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम हौदही तयार केले आहेत. घाटावर अग्निशामक दलाचे आणि सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्तही तैनात होता. गणरायाला निरोप देताना भाविकांना गलबलून आले होते.