share market up
share market up Esakal
साप्ताहिक

Election 2024 : शेअर मार्केटमध्ये निवडणूकपूर्व तेजी आली का?

साप्ताहिक टीम

भूषण महाजन

निफ्टीने २२६५०चा व सेन्सेक्सने ७५०००चा अडथळा ओलांडला आहे. विशेष म्हणजे मिड कॅप निर्देशांकाने ५००००चा टप्पा पार करत ‘पिक्चर अभी बाकी है’ची जाणीव करून दिली. म्हणजेच येणार येणार म्हणतात ती प्री-इलेक्शन रॅली (निवडणूकपूर्व तेजी) आली की काय!!!

एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात तेजी-मंदीचे घनघोर युद्ध चालू होते. निफ्टी २२५०० अंशाला अडखळून सतत खाली येत होती. मात्र गेल्या आठवड्यातल्या शुक्रवारी (ता. ५ एप्रिल) धीर करून निफ्टीने २२५००चा उंबरठा ओलांडला.

त्यादिवशी खरेतर निफ्टी २२५३७ अंशाचा उच्चांक करून १०० अंश खाली आली होती. पण दिवसअखेरीस नवी कुमक मिळून २२५०० अंशावर सप्ताहाचा बंद मिळाला. सोमवारी (ता. ८) मात्र बेधडक तेजी होत शेअर बाजाराने सार्वकालीन उच्चांक केला.

मंगळवारी गुढीपाडव्याच्या दिवशी सेन्सेक्सने सकाळी सकाळी ७५०००चे शिखर सर केले, नवी तेजी आली हे खरे.

गेले तीन महिने तज्ज्ञ शेअर बाजार घसरायची वाट पाहत होते. त्यांना फार ताटकळत न ठेवता बाजाराने त्यांचे लाड पुरवले. मार्च महिन्यात निफ्टी २२५००वरून २१८००पर्यंत खाली आली. स्मॉल कॅप निर्देशांकांचा जोर फेब्रुवारी २४मध्येच संपला होता.

निर्देशांक १६५००वरून घसरत १४७००ला थांबला. मिड कॅप निर्देशांकदेखील स्मॉल कॅपचे बोट धरून फेब्रुवारीमधील ४९७७६वरून ४५३९५पर्यंत खाली आला.

जसे तेजीवाल्यांचे तेजीत समाधान होत नाही तसेच मंदीवाल्यांचेही मंदीत होत नाही. आता त्यांच्या डोळ्यासमोर निफ्टी १९००० आणि स्माॅल कॅप १००००चे आकडे फेर धरून नाचू लागले. पण तसे व्हायचे नव्हते.

झाले ते पुरे असे म्हणत पुन्हा शेअर बाजार जोशात आला. तुम्ही हा लेख वाचत असताना निफ्टीने २२६५०चा व सेन्सेक्सने ७५०००चा अडथळा ओलांडला आहे. विशेष म्हणजे मिड कॅप निर्देशांकाने ५००००चा टप्पा पार करत ‘पिक्चर अभी बाकी है’ची जाणीव करून दिली. स्मॉल कॅप निर्देशांकदेखील पाठोपाठ तेच करणार आहे.

म्हणजेच येणार येणार म्हणतात ती प्रीइलेक्शन रॅली (निवडणूकपूर्व तेजी) आली की काय!!!

कितीही ‘शुभ बोल रे नाऱ्या’ म्हटले तरी मोठ्या घसरणीची मनापासून वाट पाहणारे शेअर बाजारातील काही वाटसरू आहेत. अर्थात, मोठी घसरण झाल्यास ते गुंतवणूक करतीलच याचा कुठलाच भरवसा नाही.

त्यांना बाजाराची गाडी पकडायला मार्च महिन्यात संधी होती. ती जर गमावली असेल तर निवडणुकीच्या निकालात काही अघटीत घडण्याची वाट पाहावी लागेल. तसे झाले नाही तर निदान अर्थसंकल्पात तरी काही तात्पुरत्या वेदनादायक तरतुदी यायची ‘आशा’ धरावी लागेल.

उदाहरणार्थ, इक्विटीच्या नफ्यावरील करात वाढ करणे (१० टक्क्यांवरून १५ टक्के) किंवा मुदतीत वाढ करणे (१ वर्षावरून २ वर्षे). असे काही झाले तर काही आठवडे किंवा महिने सेंटीमेंट बदलेल, पण जर कंपनी कामकाज समाधानकारक झाले व देशी आणि परदेशी भांडवलाचा ओघ कायम राहिला तर हा स्पीड ब्रेकर ओलांडून पुन्हा तेजी होणारच.

तात्पर्य काय? ठरलं तर मग!! तेजी आहे हे गृहीत धरायचे. आपण खरेदी केलेले शेअर खाली आले तरी खजील व्हायचे नाही, (नेमके तेव्हाच ते विकावेसे वाटतात), थोडे भांडवल बाजूला ठेवून स्टॉप लॉस ठेवून पुन्हा खरेदी करायचे. तसेच शेअर बाजार वर गेल्यावर काही प्रमाणात तरी विक्री केल्याशिवाय राहायचे नाही. ह्या पद्धतीने भांडवल खेळते राहील. पैसाही मिळेल व समाधानही!

यावेळी प्रथमच शेअर बाजार, सोने-चांदी, ठेव बाजार आणि रियल इस्टेट सर्व प्रकारच्या मालमत्ता जोरात आहेत. सोने व चांदीकडे आम्ही वारंवार वाचकांचे लक्ष वेधले होते. पण त्यात फक्त माफक प्रमाणात वाढ होत होती. पुष्टीकरणाच्या प्रवृत्तीमुळे (Confirmation Bias) त्यात कोणी खरेदी केली असेलच असे नाही, पण आता सोने ₹ ७० हजारांवर व चांदी ₹ ८० हजारांवर गेल्यावर विकत घ्यायचे राहिले ही हुरहूर त्रास देत असेल.

अजूनही वेळ गेली नाही, असे आमचे म्हणणे. येथे चोखंदळपणे सुरुवात करून, हा बाजार खाली आल्यास त्यात वाढ करता येईल. सोने खरेदीसाठी सरकार देत असलेले सॉव्हरीन गोल्ड बॉण्ड अत्युत्तम. त्या खालोखाल गोल्ड बीजसारखे ईटीएफ तसेच सिल्व्हर बीजदेखील शेअर बाजारात विकत मिळतात.

डॉलर निर्देशांक खाली आल्यास तो सोन्याला तेजी देऊन जातो, हा आमचा विश्वास. पण यावेळी डॉलर पुन्हा मजबुतीकडे जात असतानादेखील सोने वाढते आहे. हा चमत्कार घडतोय तो चीनमुळे. गेले पंधरा महिने चीन सतत सोनेखरेदी करीत आहे. त्यापाठोपाठ रशिया व तुर्कस्तान आहेत. आपलीही रिझर्व्ह बँक अधूनमधून या बाजारात फेरी मारत तुरळक खरेदी करते.

सोने चांदी व त्याबरोबर संपूर्ण लोह व अलोह धातू क्षेत्रातील मागणी वाढताना दिसत आहे. ठेव बाजार तर आकर्षक आहेच. व्याजदर खाली आल्यास किंवा येण्याच्या शक्यतेमुळे कुठलीही जोखीम नको असलेल्या गुंतवणूकदाराला कोर्पोरेट बॉण्ड फंड आणि गिल्ट फंड खुणावत आहेत.

मिळणाऱ्या व्याजाला मात्र कुठलीही सवलत नाही. ते तुमच्या उत्पन्नात मिळवले जाते. सात लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींना अथवा १० टक्के ते २० टक्केच करदायित्व असल्यास हा विचार करता येईल. मुख्य फायदा असा, की बँक एफडीपेक्षा परतावा अधिक मिळू शकेल व पाहिजे तेवढी रक्कम गरजेप्रमाणे केव्हाही काढता येईल.

निर्देशांकांना चिकटून राहणारे पॅसिव्ह फंड पाश्चात्य देशात लोकप्रिय आहेत. आपल्याकडे अजूनही फंड व्यवस्थापक स्वत:चे कौशल्य वापरून निर्देशांकांवरचढ नफा मिळवतात. सहसा लार्ज कॅप फंडात हे चटकन जमत नाही. पण लार्ज व मिडकॅप, स्मॉल कॅप किंवा मल्टी कॅप फंडात बऱ्याच योजनांना शक्य झाले आहे.

महिंद्र, क्वांट आणि बंधन स्मॉल कॅप फंडांनी गेल्या वर्षी ७३ टक्क्यांवर परतावा दिला (त्या तुलनेत स्मॉल कॅप निर्देशांक ६९ टक्के वाढला). अर्थात गेल्या वर्षी जवळजवळ ७० टक्के वाढल्यामुळे ‘मेंढी कळप’ प्रमेयाप्रमाणे छोटे मोठे गुंतवणूकदार यावर्षीही तेथे शिरण्याची शक्यता आहे. सर्वांना सावधगिरीची सूचना म्हणजे पुन्हा तसे उखळ पांढरे होण्याची शक्यता धूसर आहे.

कदाचित नवी खरेदी न करता टप्प्याटप्प्याने (SWP पद्धतीने) बाहेर पडणे चांगले ठरेल. पर्याय म्हणून पॅसिव्ह पद्धतीचा असाच एक एक्स्चेंज ट्रेडेड फंड सुचवीत आहे. त्याचे नाव आहे निफ्टी २०० अल्फा ३० ईटीएफ.

निफ्टी २०० निर्देशांकातील ३० निवडक शेअर या फंडात घेण्यात येतात. निर्देशांकाच्या तुलनेत सरस कामगिरी करणारे हे शेअर असतात. त्यात रोजची किंमत पाहून वर जाणारे शेअर निवडले जातात.

स्मार्ट मनी पद्धतीने बाजारात जसा क्षेत्रबदल होईल तसा ह्यातील ३० शेअरमध्ये बदल केला जातो. गेल्या वर्षी या फंडाने ४२ टक्के (३ वर्षे १८.५ टक्के) उतारा दिला. पोर्टफोलिओत वैविध्य आणण्यासाठी हा एक वेगळा पर्याय आहे. निफ्टीच्या वरचढ कामगिरी करतो.

कित्येकदा अतिमहाग असलेला शेअर कधी घ्यावा हे कळत नाही. तो कितीही खाली आला तरी मूल्यांकन अवाजवी वाटते. अशा वेळी थोडा अभ्यास केल्यास खरेदी व विक्री करण्याचे टायमिंग साधता येते. डीमार्ट हा शेअर असाच आहे. या शेअरने ऑक्टोबर २२मध्ये ५,९०० रुपयांचा उच्चांक नोंदवला. गुणवत्तेचे कितीही गुण गायले तरी हा शेअर त्यावेळी २५०च्या किंमत/ मिळकत गुणोत्तरात मिळत होता.

मेंढी कळप वृत्ती सोडून टेबलावर उभे राहून विकावा, असे त्याचे त्यावेळी मूल्यांकन होते. ज्यांनी ते धैर्य दाखवले त्यांना तो पुढील सात महिन्यांतच ₹ ३,३००ला विकत घेता आला. पुढे मार्च-२३मध्ये हा शेअर पुन्हा ९०च्या पी/ई ला ३,३०० रुपयांच्या भावाला मिळत होता.

आज ₹ ४,६७२ भाव आहे. मार्च तिमाहीचे निकाल हाती आल्यानंतर खरेदी अथवा विक्रीचा निर्णय घेता येईल. मुद्दा असा, की ९०चा पी/ई महागच आहे, पण हा शेअर त्या भावाला तुलनेत स्वस्त आहे. तसेच १३० ते १४० च्या पी/ई ला मिळत असल्यास त्यास महाग समजून साफ दुर्लक्ष करावे. असो.

(महत्त्वाचे : या लेखात सुचवलेले शेअर अभ्यासपूर्वक गुंतवणुकीसाठी आहेत. शेअर बाजाराच्या जोखमीचे आकलन करून आपापल्या सल्लागाराचे मत व सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. शेवटी स्टॉपलॉसला पर्याय नाही, हे लक्षात ठेवावे. तसेच लेखकाने व त्यांच्या गुंतवणूकदारांनी येथे गुंतवणूक केलेली आहे हेही ध्यानात घ्यावे.)

-------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT