Indian Institute of Sugarcane Research esakal
साप्ताहिक

Sugarcane Research : अर्थकारण फिरवण्याची ताकद असणाऱ्या ऊसाचं संशोधन कुठे होतंय माहिती आहे ?

ऊस पिकावर पायाभूत आणि उपयोजित विषयांवर स्वतंत्रपणे संशोधन करण्यासाठी १९५२ मध्ये लखनौमध्ये भारतीय ऊस संशोधन संस्था (Indian Institute of Sugarcane Research) स्थापन करण्यात आली

साप्ताहिक टीम

कृषी-विज्ञान शाखांमधील पदवी-पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी ऊस पिकांसंदर्भात जैवतंत्रज्ञान, उती संवर्धन, जैवरसायन, बियाणे निर्मिती, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच अभियांत्रिकी तंत्रज्ञान इत्यादी विषयांचे दीड ते सहा महिने कालावधी असलेले विशेष अभ्यासक्रम राबवले जातात.

सुधीर फाकटकर

ऊस हे अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी न्यू गिनी बेटांमधून भारतात दाखल झालेले गवतवर्गीय पीक आहे. या पिकात उच्च प्रमाणात शर्करा असल्यामुळे साखर तयार करण्यासाठी हे पीक प्रसिद्ध झाले.

उसाच्या लागवडीत दुसरा क्रमांक असलेल्या भारताचा आणि प्रथम स्थानावरील ब्राझीलचा ऊस उत्पादनातील वाटा जगाच्या तुलनेत साठ टक्के आहे. भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, पंजाब, हरियाना अशी अनेक राज्ये ऊस उत्पादनात आघाडीवर आहेत.

साखरेखेरीज उसापासून इथेनॉल हे इंधनासंदर्भातील महत्त्वाचे रासायनिक संयुग, अल्कोहोल तसेच कागदासाठी कच्चा पदार्थ, खत अशी उपउत्पादने मिळतात. देशाच्या अर्थकारणात ऊस पीक आणि संबंधित उत्पादने महत्त्वाचा वाटा उचलतात.

म्हणूनच ऊस पिकावर पायाभूत आणि उपयोजित विषयांवर स्वतंत्रपणे संशोधन करण्यासाठी १९५२मध्ये लखनौजवळील आलमबाग परिसरात भारतीय ऊस संशोधन संस्था (Indian Institute of Sugarcane Research) स्थापन करण्यात आली.

लखनौखेरीज मोतीपूर (बिहार) आणि प्रवरानगर (महाराष्ट्र) येथे या संस्थेची प्रादेशिक संशोधन केंद्रे उभारण्यात आली आहेत. तर मुक्तेश्वर (उत्तराखंड) येथील प्रादेशिक केंद्रात उसाबरोबरच शर्करा कंद (शुगर बीट) या साखर निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या नवीन पिकांवर संशोधन प्रगतिपथावर आहे.

संस्थेत पीक सुधारणा, उत्पादन, पीक संरक्षण, पिकविज्ञान-जीवरसायनशास्त्र आणि कृषीअभियांत्रिकी असे स्वतंत्र विभाग असून या विभागांना हवामान, व्यवस्थापन आणि माहिती अशा तीन दालनांची जोड आहे.

पीक अवलोकन व परीक्षणासाठी स्वतंत्र संशोधन प्रकल्प राबवले जातात. पीक सुधारणा विभागात वनस्पती विज्ञानाच्या माध्यमातून उसाचे संशोधन होते. उत्पादन विभाग मृदाशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र या अभिनव विज्ञान शाखांद्वारे संशोधन करतो.

पीक संरक्षणाच्या अनुषंगाने कीटकविज्ञान आणि वनस्पतीविषयक रोगविज्ञान शाखांद्वारे संशोधन केले जाते.

पिकविज्ञान विभागात ऊस पिकाचा रेण्वीय पातळीवरील अभ्यास होतो, तर ऊस पिकाच्या लागवडीपासून मशागत तसेच उत्पादनपश्‍चात प्रक्रियांसाठी विविध साधने आणि अवजारांचा विकास कृषीअभियांत्रिकीत होतो.

भारतातील विविध प्रकारच्या शेतजमिनींमध्ये तसेच वेगवेगळे हवामान असलेल्या वातावरणात प्रति एकर शंभर टनांपर्यंत उत्पादन तसेच प्रति टन शंभर किलोंपेक्षाही जास्त साखर निर्माण होऊ शकेल असे उसाचे ५४ वाण संस्थेत विकसित करण्यात आले आहेत.

तर किडींच्या व्यवस्थापनासंदर्भात आधुनिक दिव्यांच्या वापरातील तीन प्रणाली इथे विकसित केल्या गेल्या आहेत.

याखेरीज ‘बड चीप’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने ऊस पीक रोपांची निर्मिती, लागवडीचे तंत्र आणि ऊस पिकाची वाढ होताना आवश्यक असलेल्या मशागती इत्यादींसाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञान या संस्थेने तयार केले आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांचा अनुभव देण्यासाठी संस्थेच्या सुमारे सव्वाशे हेक्टर क्षेत्रामध्ये उसाच्या विविध वाणांची लागवड केली जाते. इथे सल्ला-मार्गदर्शन तसेच प्रशिक्षणाची सुविधा आहे.

याशिवाय ऊस बियाणे व रोपांचीही उपलब्धता केली जाते. अलीकडेच ऊस पीक संशोधनाची माहिती देणारे इक्षु हे खास मोबाईल अ‍ॅपही तयार करण्यात आले आहे.

कृषी-विज्ञान शाखांमधील पदवी-पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी ऊस पिकांसंदर्भात जैवतंत्रज्ञान, उती संवर्धन, जैवरसायन, बियाणे निर्मिती, सूक्ष्मजीवशास्त्र तसेच अभियांत्रिकी तंत्रज्ञान इत्यादी विषयांचे दीड ते सहा महिने कालावधी असलेले विशेष अभ्यासक्रम राबवले जातात. याखेरीज ‘ऊस पीक विकास आणि व्यवस्थापन’ हे विशेष प्रशिक्षण दरवर्षी १ ते १५ जुलै दरम्यान घेतले जाते.

भारतीय ऊस संशोधन संस्था

रायबरेली मार्ग, दिलकुशा, लखनौ, 226002. उत्तर प्रदेश.

संकेतस्थळः https://iisr.icar.gov.in

---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

R. Madhvan Parenting Tips: "मुलांना मोकळा वेळ देऊ नका!" आर. माधवनने दिल्या यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलं घडवण्याच्या टिप्स

IND vs WI 1st Test Live: लोकेश राहुलचे शतक! भारताची मजबूत आघाडीच्या दिशेने वाटचाल, घरच्या मैदानावर ३२११ दिवसांनी सेंच्युरी

Irregular Sleep Schedules: ८ तास झोपल्यानंतरही बिघडू शकतं का आरोग्य? जाणून घ्या झोपेचं योग्य वेळापत्रक का गरजेचं

Sanjay Raut PC : रामदास कदमांचा धक्कादायक दावा, ठाकरे गटाने दिलं प्रत्युत्तर; नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

SCROLL FOR NEXT