माळेगाव, ता. २८ : ‘‘माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नजीकच्या काळात जाहीर होईल. या निवडणुकीत दोन अथवा तीन पॅनेल होतात, हे आत्ताच सांगता येणार नाही. सभासदांनो, मागील निवडणुकीत जेवढ्या विश्वासाने तुम्ही माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून दिले, त्याच विश्वासाने माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी राज्यात विक्रमी ऊस दर दिला. केंद्र व राज्य सरकार आपल्या विचाराचे आहे. यापुढेही ‘माळेगाव’चा सर्वांगिण विकास करण्यात मी कमी पडणार नाही. कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीला लागावे,’’ असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
माळेगाव (ता. बारामती) कारखाना कार्यस्थळावर नूतनीकरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, संचालक तानाजी देवकाते, अनिल तावरे, मदनराव देवकाते, योगेश जगताप, तानाजी देवकाते, नितीन सातव, दत्तात्रेय येळे, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, बन्शीलाल आटोळे, सागर जाधव, संजय काटे, प्रताप आटोळे, गुलाबराव गावडे, संगीता कोकरे, पंकज भोसले, निशिगंध निकम, कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी उपस्थित होते. प्रा. अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. मदनराव देवकाते यांनी आभार मानले.
अजित पवार म्हणाले, ‘‘नीरा नदीच्या प्रदूषणाचा विषय अनेक वर्षांचा प्रलंबित आहे. त्या समस्येला मीच जबाबदार आहे, हे म्हणणे कितपत योग्य आहे. मी जर प्रदूषण नियंत्रण मंडळाला कठोर कारवाईचे आदेश दिले तर नीरा नदी काठाचे माळेगाव, सोमेश्वरसह सर्वच कारखाने बंद पडतील. त्यात पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होईल. वास्तविक कारखान्यांमधून निघणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेतीला सोडण्याच्या सूचना मी दिल्यात.’’
‘अरेरावीने वागू नका’
माझ्या स्वभावात मी बदल केला, तसा तुम्ही संचालकांनीही सभासदांशी अरेरावीने वागू नये. माळेगाव हा नेहमीच एफआरपीपेक्षा विक्रमी ऊस दर देणारा कारखाना म्हणून राज्यात ओळखला जातो. गतवर्षी राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३६३६, तर यंदा ३१३२ रुपये अॅडव्हान्स दर दिला आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत सभासदांनी पुन्हा माझ्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निवडून देण्याचा विचार करावा.
ज्येष्ठांवर उमेदवारीची जबाबदारी
माळेगाव कारखान्याची निवडणूक तोंडावर आली आहे. बाळासाहेब तावरे, मदनराव देवकाते, अॅड. केशवराव जगताप या ज्येष्ठांनी एकत्र बसून सहा गटात कोणाला आगामी निवडणुकीत उमेदवारी द्यायची, हे ठरवावे. शेवटी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याबरोबरच जुन्या संचालक मंडळात कोणाला पुन्हा संधी द्यायची, हे ठरविणे सोपे जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले...
- बारामतीच्या जिरायती भागात उसाचे क्षेत्र दिसण्यासाठी कऱ्हा व नीरा जोड प्रकल्प कोणत्याही स्थितीत यशस्वी करणार.
- माळेगाव जुलैमध्ये खोडकी पेमेंट २०० रुपये देणार.
- माळेगावच्या साखर कामगारांना त्रिपक्षीय समिती सुचवेल तेवढी वेतन वाढ देणार.
- जून-जुलैपर्यंत नीरा डावा कालवा बंद करणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.