

Housing Cooperative Society
Sakal
तात्या लांडगे
सोलापूर : इमारतीच्या डीम्ड कन्व्हेयन्स (मानिव अभिहस्तांतरण) संदर्भात उच्च न्यायालयाने गृहनिर्माण संस्थांसाठी दिलासादायक निकाल दिला आहे. त्यानुसार इमारतीचे कन्व्हेयन्स केवळ बांधकामापुरते मर्यादित नसून गृहनिर्माण प्रकल्पातील मोकळी जागा, पार्किंग तसेच संपूर्ण ले-आउटमधील रिक्रिएशनल ग्राउंडवरही सोसायटीचा कायदेशीर हक्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शहरांमध्ये प्लॉट आणि फ्लॅटचे दर गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत बिल्डर जागा मालकांना सहभागी करून त्या जागेवर उंच इमारती उभारतात. ले-आउटमधील मोकळ्या जागांवर बांधकाम करणे, पार्किंग, व्यावसायिक गाळे, गार्डन, खेळाची जागा व अंतर्गत रस्ते स्वतःकडे ठेवणे, अशा प्रकारे अतिरिक्त आर्थिक फायदा मिळविण्याचा प्रयत्न काही बिल्डरांकडून केला जातो.
अनेकदा इमारतीचे फ्लॅट खरेदीदारांच्या नावे करून दिले जातात; मात्र मोकळ्या जागा सोसायटीकडे हस्तांतरित केल्या जात नाहीत. प्रत्यक्षात, गृहनिर्माण सोसायटीतील सर्व मोकळ्या जागेवर सभासदांचाच हक्क असतो. अनेक बिल्डरांना ही बाब माहिती असूनही ते जागा सोसायटीकडे देण्यास टाळाटाळ करतात. मात्र, उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा प्रवृत्तीला आळा बसणार आहे.
न्यायालयाचा निकाल नेमका काय?
भाईंदर येथील एका सहकारी गृहनिर्माण सोसायटीने जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उपनिबंधकांनी केवळ इमारतीखालील जागेपुरते कन्व्हेयन्स मंजूर करून मोकळी जागा व इतर हक्क नाकारले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकलपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना ‘मोफा’ कायद्याचा उद्देश घरखरेदीदारांचे हित जपणे हा असल्याचे स्पष्ट केले. बिल्डर केवळ इमारतीचे बांधकाम हस्तांतरित करून मोकळी जागा स्वतःकडे ठेवू शकत नाहीत. इमारतीच्या वापरासाठी आवश्यक असलेली मोकळी जागा, पार्किंग, अग्निशमन वाहनांसाठीचे रस्ते हे सर्व घटक इमारतीचा अविभाज्य भाग आहेत. तसेच संपूर्ण ले-आउटमधील रिक्रिएशनल ग्राउंड किंवा मोकळ्या मैदानावर त्या ले-आउटमधील सर्व सोसायट्यांचा प्रमाणानुसार हक्क राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
बिल्डरच्या परवानगीशिवाय सोसायटीला मिळते जागा
सहकारी गृहनिर्माण सोसायटीची मोकळी जागा त्या सोसायटीच्याच हक्काची असते. बिल्डरने इमारत दिली, पण उर्वरित मोकळी जागा स्वतःकडे ठेवली असल्यास सभासदांना शहर उपनिबंधकांकडे दाद मागता येते. बिल्डरच्या परवानगीशिवायही ती जागा सोसायटीच्या नावे करण्याचे अधिकार आम्हाला आहेत.
- डॉ. प्रगती बागल, शहर उपनिबंधक, सोलापूर
सोलापूर शहरातील सोसायट्या
एकूण गृहनिर्माण सोसायट्या
४३२
अंदाजे एकूण सभासद
१०,६००
सोसायटीसाठी सभासद मर्यादा
५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.