राजेगाव, ता. १ : काळेवाडी (ता. दौंड) गावाच्या इतिहासात फारच क्वचित घडले असेल की, मे महिन्यातच संपूर्ण गाव पाण्याने समृद्ध झाले आहे. यंदा निसर्गाने गावावर कृपा केली आहे. अवघ्या आठवड्याभराच्या पावसाने गावात जलसाठ्यांची स्थिती सुधारली आहे. ओढे खळखळून वाहू लागले आहेत. यामुळे दीर्घकाळ भेडसावणारी पाण्याची टंचाई दूर झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून काळेवाडी गावात दर उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत होती. मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात गावातील विहिरींचे पाणी आटायला सुरुवात होते. शेती पाण्याअभावी रखरखीत पडत होती. हातातोंडाशी आलेली सोन्यासारखी पिके डोळ्यासमोर जळताना पाहून हृदय कालवून जात होते.पण यावर्षी या सर्व अडचणींना सुरुवातीलाच पूर्णविराम मिळाल्याने गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक स्पष्ट दिसत आहे.
मे महिन्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अवघ्या चार ते पाच दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे गावाच्या परिसरातील सर्वच जलसाठे भरून वाहू लागले आहेत. गावातील संत ज्ञानराज बंधारा अंतर्गत सर्व मातीचे तलाव, ओढ्यावरील गायकवाड वस्ती बंधारा, शेख वस्ती बंधारा, काळे गांगुर्डे बंधारा, बरडे बंधरा, भोसले वस्तीवरील बंधारा हे सर्व सहा ओढ्यावरील साखळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरले गेले असून त्यांच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. हे दृश्य पाहून अक्षरशः ग्रामस्थ भारावून गेले आहेत. .
शेतीसाठी पाऊस ठरला वरदान
पावसामुळे गावाच्या जलसंवर्धन प्रयत्नांना बळ मिळाले आहे. मागील काही वर्षांपूर्वी गावात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली होती. नाम फाउंडेशनच्या सौजन्याने बंधारे, पाझर तलाव यांचे खोलीकरण व दुरुस्ती केली जात आहे. त्या कामांना यावर्षी पावसाच्या रूपाने मोठे यश मिळाले आहे. तलाव आणि बंधाऱ्यांची क्षमता वाढल्याने कमी पावसातही जलसाठा मोठ्या प्रमाणात होऊ शकला. शेतीसाठी हा पाऊस वरदान ठरला आहे.
भविष्यातील गरज ओळखून बोरीबेल काळेवाडी ओढ्यावर आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून जलसंधारण विभागातून आणखी सहा साखळी बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. नक्कीच परिसरात पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे.
- गणेश गायकवाड,
माजी ग्रामपंचायत सदस्य हिंगणीबेर्डी काळेवाडी
माझे वय ७० वर्ष आहे. मला कळायला लागल्यापासून आजतागायत एवढा मोठा पाऊस कधीच झाला नाही. यापूर्वी आषाढापूर्वी कधीच विहिरी ओसंडून वाहत नव्हत्या. मात्र, यंदा पहिल्यांदाच हे घडल्याने आता शेतकऱ्यांना नवीन पिके घेण्यास अडचणी येणार नाहीत.
- शंकरराव वाळके, शेतकरी काळेवाडी
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने जमिनीतील पाण्याची पातळी याचा फायदा विहिरींना झालाय. विहिरी सुरुवातीलाच भरून वाहू लागल्या आहेत. परिणामी आडसाली ऊस लागवड करणे शेतकऱ्यांना सोपे झाले आहे.
- गौतम बरडे, शेतकरी काळेवाडी
01209
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.