सुपे, ता. १३ : ‘‘ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली पाहिजे. शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार ही विकासाची त्रिसूत्री आहे. यामुळे आजचा विद्यार्थी नोकरी निर्माण करणारा उद्याचा उद्योजक बनू शकतो,’’ असे मत विद्या प्रतिष्ठानच्या सुपे (ता. बारामती) येथील महाविद्यालयातील पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांनी परिसंवादात व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत सुपे कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी माझा परिसर, माझे गाव या विषयावरील परिसंवाद कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय काळे तर परीक्षक म्हणून दीपक थोरात उपस्थित होते. रोपट्याला पाणी घालून परिसंवादास सुरुवात झाली. सहा विद्यार्थी-विद्यार्थिनींचे एकूण १६ गट कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आजच्या स्थितीत ग्रामीण भागात सुद्धा कचरा व्यवस्थापनाची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. सामाजिक स्वच्छता, अद्ययावत शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा, रोजगारासाठी बाजारपेठांची गरज सहभागी विद्यार्थ्यांनी मांडली. शेतीसाठी लागणारी अवजारे, बी-बियाणे, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, शेती सिंचनासाठी आवश्यक उपाययोजना, शुद्ध पाणी पुरवठा आदी मुद्यांवर विद्यार्थ्यांनी मत व्यक्त केले.
शिक्षणा बरोबरच सामाजिक जबाबदारी, ग्रामिण विकास, शिस्त, परिश्रम व सकारात्मक विचारसरणी याविषयी विद्यार्थ्यांना थोरात यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या परिसरातील समस्या ओळखून त्यावर उपाय सुचवावेत, असे आवाहन त्यांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून भविष्यासाठी नवी दिशा मिळते, अशी माहिती दिली. प्रास्ताविक प्रा.सारिका खेत्रे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रियंका दाभाडे यांनी केले. प्रा.सिद्धार्थ लोंढे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.