संपादकीय

ढिंग टांग : दिवाळी दुपार!

ब्रिटिश नंदी

गेली कित्येक वर्षे आम्ही पत्रकारितेचे असिधाराव्रत पाळत आलो असून, किमान दोन विसा पाच दिवाळ्या आम्ही पाहिल्या आहेत. (खुलासा : बुजुर्गे पावसाळे पाहतात, आम्ही पत्रकार दिवाळ्या पाहतो.) दिवाळी आली की आमच्यातील पत्रकारितेला विशेष धार येते. दिवाळीपूर्वी अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तींकडे उगीच चक्‍कर टाकून यावी, जमल्यास (आणि छापले असल्यास) व्हिजिटिंग कार्ड मंत्र्यांच्या पीएकडे सोडून यावे, पुढाऱ्याबिढाऱ्यांकडे थोडी वर्दळ ठेवावी, असा आमचा वर्षानुवर्षांचा परिपाठ आहे. हाडाच्या पत्रकाराला असे करावे लागते. दिवाळीच्या पोस्तासाठी आमचा हा दुर्दैवी खटाटोप आहे, असे कुणी कुत्सितपणे म्हणेल. पण नाही! पत्रकारितेच्या असिधाराव्रताचाच हा एक कठोर भाग आहे. दिवाळीच्या सुमारास दयाळूवृत्तीच्या मंत्रिमहोदयांकडून काहीएक भेटवस्तू येत्ये हे मान्य. नामचीन पुढाऱ्यांकडून फराळाचे पावते, हेदेखील मान्य...पण त्यासाठी का आमचे मन चळते? छे, नाव नको! सत्तावर्तुळाच्या निकट राहून बातमीदाराला आपले विहितकार्य पार पाडावे लागते, म्हणून हे सारे!!

औंदा दिवाळीपूर्वीच इलेक्‍शन येऊन गेल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली. ऐन दिवाळीत पोलिटिकल पार्ट्यांनाच कडकी लागल्याने सगळा खेळखंडोबा जाहला. (खुलासा : कोण म्हणतो बाजारात मंदी नाही म्हणून?) ऐन सुगीत कडकी आली!! पण ते जाऊ दे. अशा प्रतिकूल परिस्थितीत, भाऊबिजेच्या दिवशी माध्यान्ह भोजनासाठी यावे, असे निमंत्रण थेट ‘वर्षा’ बंगल्यावरोन आले आणि आम्हाला भरोन पावले! निमंत्रणानुसार आम्ही तेथे पोचलो...

स्थळ : ‘वर्षा’ बंगला. औचित्य : दिवाळी दुपार. (खुलासा : दिवाळीला फक्‍त ‘दिवाळी पहाट’ असते, असा काही लोकांचा गैरसमज आहे. पण ‘दिवाळी दुपार’देखील असते.) याच मलबार हिल्लस्थित ‘वर्षा’ बंगल्याच्या हिर्वळीवर महाराष्ट्राचे (सध्या) हंगामी, (पण) भावी कारभारी असे जे आमचे परममित्र मा. श्री. नानासाहेब फडणवीस यांनी पत्रकारबांधवांस भोजन दिले. वेळेच्या बरोब्बर अर्धा कलाक आधीच आम्ही तेथे पोचलो. आमच्याही आधी पोचलेले पाच-पंचवीस पत्रकारबांधव तेथे होतेच. त्यांच्याकडे आम्ही खुणेनेच चौकशी केली. एका पत्रकार बांधवाने चौकोनी खोक्‍यासारखा आकार हाताने दाखवला आणि खांदे उडवले. तेवढ्यात एका बातमीदाराने ‘आतली’ खबर आणली. सूटपीस, साडी, बर्फी, आणि दोनशे ग्रॅम काजू-बदाम पाकीट असा खोक्‍यातील ऐवज असल्याची ‘ब्रेकिंग न्यूज’ त्याने देताच बरेचजण तेथे धावले. (खुलासा : आम्ही सावकाश पावले टाकीत गेलो!)

बंगल्याचे हिर्वळीवर साग्रसंगीत बुफे भोजन लावलेले पाहोन आमची तबियत बहलून गेली. आर्ट ग्यालरीत फिरावे, तसे टेहलत टेहलत आम्ही सारा मेनू पाहून घेतला. सारे काही यथासांग होते. दिवाळीच्या फराळाचा वेगळा कौंटर होता. चाटचा कौंटर पाहून तं मझा येऊन गेला. बसल्या बैठकीले चार प्लेट भेळ आणि ओळीने साठ पाणीपुऱ्या खाऊन नंतर मेन कोर्सकडे वळणारे आम्ही!! (खुलासा : आम्हीही नागपूरसाइडचे आहो! त्यामुळे हिर्वळीवर घरच्यासारखे हिंडलो! असोच!!) मग काही एक हिशेब करोन च्याट कौंटरकडे वळलो. पाहतो तो काय! खुद्द कारभारी मा. नानासाहेब सहकुटुंब च्याटवाल्यासमोर हाती द्रोण धरोन उभे होते. (खुलासा : दाती तृण धरितात ते विरोधक, हाती द्रोण धरतात ते नानासाहेब! असो असो!) आम्हीही एक द्रोण घेऊन च्याटवाल्यासमोरील कोंडाळ्यात उभे राहिलो.

‘‘काय म्हंटा नानासाहेब, काय म्हंटे युती?,’’ असे आम्ही अघळपघळ नागपुरी पद्धतीने सुरवातीलाच विचारून टाकले. त्याच वेळी नेमकी एक पाणीपुरी मा. नानासाहेबांनी स्वमुखात सोडली होती. भलतेच घडले. जे घडले ते पाणीपुरीमुळे की महायुतीच्या कंठात अडकलेल्या बटाट्यामुळे, हा सवाल अनुत्तरित आहे. इति...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT