dhing tang
dhing tang  
संपादकीय

एक मोहीम...न घडलेली! (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी

मुंबईतील वातावरणात असह्य उकाड्यामुळे इतिहासास अंमळ डुलकी लागली आणि तो प्रसंग घडला. इतिहासास जाग आली, तोवर वेळ निघोन गेलेली होती. त्याचे जाहले असे की...

ऐन वैशाखाचा महिना. उन्हे मी म्हणत होती. अशा तलखीत शिवाजी पार्कावर कोण टेहलटपुरी करील? सबब सडक तुरळक गर्दीची. काही चहाटळ कबुतरांचे नसते उद्योग वळचणीला चालले होते, पण ते तेवढेच. राजगडावर मात्र अचानक उत्साहाचे उधाण आले. बालेकिल्ल्यावरील महालातून हुकूम सुटला : गाड्या काढा! भराभरा हालचाली झाल्या. राजे निघाले! मोहिमेवर निघाले!! कुठे निघाले?

राजियांना अचानक ग्वाल्हेरचे बोलावणे आले होते. राजे, पायधूळ झाडा. पुनित करा म्हणोन ग्वाल्हेरीची आर्जवे सुरू होती. अखेर राजियांनी रुकार दिला.

...घाईघाईने राजे गड उतरले. दरवाज्याशी उभ्या असलेल्या जेम्स बॉंडकडे बघून मायेने हांसले. जेम्स आणि बॉंडदेखील त्यांच्याकडे बघून हांसले!! त्यांचा प्रत्येकी एक गालगुच्चा घेवोन राजे मोटारीत बसले. गाड्यांचा ताफा वेगाने विमानतळाकडे निघाला. गिर्रेबाज वळण घेवोन गाडीने क्‍याडल रोडचा रस्ता पकडला. ओहो! दादरबाहेरदेखील जग आहे तर!!...रस्त्यावरील वाहतूक बघत राजियांची स्वारी विमानतळावर आली.

टर्मिनल गजबजलेले. हा एस्टी स्टॅंड की विमानतळ? राजियांनी लागलीच रुमाल नाकांस लाविला.

""राजे, सील करा अंगाला!'' कुणीतरी सावधगिरीची सूचना केली. राजे हांसले. म्हंजे असावेत! नाकास रुमाल लावोन हांसताना कळावे कसे? असो.
""चिंता करो नये...ग्वाल्हेरी जातो आहे. तेथ कोठला दगाफटका? मध्य प्रदेश हा तो शांत प्रदेश. तेथ पुंडाईची गुंजाईश नाही. सील करण्याची आवश्‍यकता नाही...'' राजियांनी स्वत: दिलासा दिला आणि ते विचारात बुडाले. इतिहासाने विचार नोंदले ते असे : च्यामारी, येथे मरणाचे उकडत्ये आहे. अशा उकाड्यात सील कोण करील अंगाला? वेड लागलंय काय? त्या ग्वाल्हेरात पंचेचाळीस टेंपरेचर आहे म्हणे! म्हंजे माणूस दगाफटक्‍याने नव्हे, अंगाला सील केल्यामुळेच गहाळ होणार!! सीलबिल कुछ नहीं, आहे ते अंगावरले तलम सीलसुद्धा काढून फेंकावेसे वाटत्ये आहे...वगैरे.
""राजं काळजीचं काम न्हाई. हा मनमावळा छातीचा कोट करून तुमच्यासंगट सावलीगत हुबा ऱ्हाईल. येऊ दे कुनी बी मोंगल सरदार, बघतूच त्याला!!'' एका मनमावळ्याने गुडघ्यावर बसोन राजियांसमोर आण घेतली. परत आल्यावर ह्यास सुवर्णाचे कडे देऊ, असे राजियांनी मनोमन ठरविले.
...अलायंसचे छोटेखानी विमान समोर उभे होते. राजियांनी पाऊल पुढे टाकले तोच-
""साहेब, गन घेऊन विमानात जाणेची परमिशन नाही! चुक...,'' डूटीवरल्या रखवालदाराने रोखले.
""अस्सं?'' राजे किंचित उखडले.
""चुक!! गन जमा करा..., '' रखवालदार.
""पण आमच्याकडे कुठाय? बॉडीगार्डकडे आहे...'' राजियांनी प्रतिप्रश्‍न केला.
""मग तुचा बौडीगार्ड जमा करा! चुक...,'' रखवालदार म्हणाला. तंबाकूविरोधी दिनाचा त्याला पत्त्यामुद्या नव्हता. सतत आपली चुक, चुक!! जाऊ दे.
""बिना बॉडीगार्ड आम्ही कसे ग्वाल्हेरला जाणार?'' राजे.
""नका जाऊ! पन गन नेणेची,'' रखवालदाराने नियमांवर बोट ठेवले. आम्हाला लायनीपरमाने जाने भाग पडते. तुम्ही व्हीआयपी लोक, तुमच्यासारकेच लोक असं वागायले, तर कसं होनार? वगैरे नेहमीची कुठल्याही सिग्नलवर ऐकू येते, ती टेपही त्याने वीस मिनिटे वाजवली. त्या वीस मिनिटात राजियांचा हात पंचवीस वेळा पायताणाकडे गेला. पण...
""राजं, तुमी फकस्त आर्डर द्या..!'' मनमावळ्यानं खांद्यावरची बंदूक सरसावत पुकारा केला.
""बस, बस, बस!! ऱ्हायलं..!!'' असे म्हणून राजे अबौट टर्न वळले आणि ताडताड चालत विमानतळाच्या बाहेर पडले. भराभरा गाडीत बसून राजगडावर परतले. जेम्स बॉंडला पुन्हा कुर्वाळून बालेकिल्ल्यात अदृश्‍य झाले. अशा रीतीने एक मोठी मोहीम संपली.
....टळटळीत उन्हात ग्वाल्हेर शहर त्यांची वाट पाहत दिवसभर बसले. इतकेच. ह्या घटनेची इतिहासाने नोंद केलेली नाही, ह्याची वाचकांनी नोंद घेतलेली बरी. इत्यलम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT