द ट्विटर डायरी ऑफ बाना
द ट्विटर डायरी ऑफ बाना 
संपादकीय

द ट्विटर डायरी ऑफ बाना (वुई द सोशल)

श्रीमंत माने shrimant.mane@esakal.com

ऍन फ्रॅंक आठवतेय? तीच ती, सत्तर वर्षांपूर्वी "द डायरी ऑफ यंग गर्ल' लिहून गेलेली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी सैन्याच्या भीतीने नेदरलॅंडची राजधानी ऍमस्टरडॅममध्ये आईवडील व बहिणीसह एका पुस्तकाच्या फडताळामागे दोन वर्षे लपून राहिलेली. त्या अवस्थेत आजूबाजूचे अनुभव आणि बालसुलभ भावना शब्दांकित करणारी अन्‌ गेस्टापोंच्या तावडीत सापडल्यानंतर थोरली बहीण मर्गोटसोबत "कॉन्सट्रेशन कॅम्प' नावाची छळछावणी अनुभवलेली. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी जग सोडून गेलेली. महायुद्धानंतर घरी परतलेल्या ऍनच्या वडिलांना तिची डायरी सापडली. त्यांनी ती प्रकाशित केली. 60 भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. त्यारूपाने युद्धकाळातील बालकांच्या दु:खांसोबत तिचं नाव अजरामर झालं.
आता ऍन आठवायचं कारण युद्धाचंच आहे. बाना अल-आबेद नावाची सात वर्षांची चिमुकली हा जणू ऍनचा अवतार आहे. आयलान किंवा अलान कुर्दीचा समुद्रकिनाऱ्यावर पालथा पडलेला मृतदेह, रक्‍तबंबाळ चेहऱ्याचा ओमरान दानिश यांची नावे ज्या सीरियाच्या यादवीशी जोडली गेली आहेत; त्यात होरपळणाऱ्या लाखो बालकांचं प्रतिनिधित्व गेल्या काही दिवसांत ही गोड छोकरी करतेय. इसिस व सरकारी फौजांच्या लढाईत उद्‌ध्वस्त झालेल्या अलेप्पो शहरात कुठेतरी आई फातेमा व दोन भावांसह ती जीव मुठीत घेऊन लपलीय. तिचं "ट्विटर हॅंडल' आई सांभाळते. शिक्षिका असल्यानं फातेमांचं इंग्रजी चांगलं आहे. "सोलर चार्जर'च्या मदतीनं स्मार्टफोन हाताळणाऱ्या मायलेकींनी निष्पाप बालकांचं रक्‍तरंजित नष्टचर्य जगापुढं आणलंय. गेल्या आठवड्यात बानाच्या "हॅंडल'वरून अवतीभवतीच्या युद्धग्रस्त व भयग्रस्त वातावरणाचे, रक्‍तरंजित युद्धाचे, मनात दाटलेल्या प्रचंड भीतीचे "ट्विट' पडले. ""वुई सो स्केअर्ड, प्रे फॉर अस'', अशा टविटस्‌नी अख्खं जग हादरलं.
अलेप्पो शहराच्या ज्या भागात बाना राहते, तिथले उद्‌ध्वस्त बगीचे, उखडलेले रस्ते, ढासळलेल्या इमारतींची छायाचित्रंही तिनं "सोशल मीडिया'वर टाकली. ""शाळा शिकायची आहे, पण घराबाहेर पडता येत नाही''. ""शिकून आईसारखं शिक्षिका व्हायचंय''. ""पुस्तक लिहून लेखिका व्हायचंय'', असं अस्वस्थ वर्तमान व सुंदर स्वप्नांची सांगड घालणारं बरंच काही बानानं जगापुढं आणलं. पारंपरिक माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. त्या वाचून लोक हळहळले. तिच्या "फॉलाअर्स'ची संख्या 2 लाख 35 हजारांवर पोचली. बानांचं "ट्‌विटर अकाउंट' गेल्या रविवारी अचानक अदृष्य झालं अन्‌ जगाच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या जीविताची चिंता वाटणाऱ्यांमध्ये "हॅरी पॉटर' लिहिणारे जे. के. रौलिंगही होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिचे "ट्विट' पडू लागले. सगळ्यांच्या जिवात जीव आला. रौलिंग यांनी "हॅरी पॉटर'च्या "ई-बुक्‍स'चा संपूर्ण सेट तिला पाठवून दिला.
बाना अल्लड आहे. तिचे काही ट्विट अगदीच बालसुलभ आहेत. सात वर्षांचीच असल्यानं दुधाचे दात पडू लागलेत. असाच एक दात पडला. तेव्हा तिनं म्हटलं, ""बॉंबवर्षावाच्या भीतीनं चिमुकला दातही खोबणीतून निखळून पडला. आता युद्ध बंद झाले की तो पुन्हा येईल''. बानाच्या मैत्रिणीच्या घरावर बॉंब पडला, ती त्यात मरण पावली. बालसखीच्या आठवणीनं ती व्याकूळ झाली. सीरियातल्या यादवीत पाच लाखांच्या आसपास बळी गेल्याचं मानलं जातं. त्यात दहा हजारांहून अधिक बालकांचा समावेश आहे. स्वप्नं पाहणाऱ्या बानाच्या नशिबी त्यातून सुटका आहे, की ऍनचंच प्राक्‍तन तिच्या वाट्याला येणारंय? सध्या तरी काहीच सांगणं शक्‍य नाही.

जगाची प्रेरणामूर्ती
जग अगदीच भौतिक, व्यवहारी व दीनदुबळ्यांबाबत निर्दयी झालंय, असं समजणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. अंजा लोवेन नावाची डेन्मार्कची कार्यकर्ती जगभरातील सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्‍ती ठरलीय. जर्मनीतल्या "ऊम' मासिकानं निश्‍चित केलेल्या तशा शंभर जणांच्या यादीत बराक ओबामा, पोप फ्रान्सिस व दलाई लामा दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या स्थानी आहेत. चेटूक समजून कुटुंबानं रस्त्यावर टाकून दिलेल्या नायजेरियातल्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला ही गोरी मेम बिसलेरीच्या बाटलीतले पाणी पाजत असल्याचं "सोशल मीडिया'वर प्रचंड "व्हायरल' झालेलं छायाचित्र आठवत असेल. तो मरणासन्न मुलगा अंजानं दत्तक घेतला. त्याचं नाव "होप' ठेवलं. आता त्यानं बाळसं धरलंय. त्या कामासाठी अंजा जगाची प्रेरणामूर्ती ठरलीय.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Loksabha: नाशिक मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी शिवसेनेकडून दाखल केली उमेदवारी, पण...

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Latest Marathi News Live Update: काँग्रेसने 'कलम 370'ला आपल्या अवैध मुलाप्रमाणे सांभाळलं; अमित शाहांची बोचरी टीका

Google layoffs: सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण 'पायथन' टीमला दाखवला बाहेरचा रस्ता, काय आहे कारण?

Team India squad T20 WC24 : विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन बनला निवडकर्त्यांची पहिली पसंती; कोणाचा पत्ता झाला कट?

SCROLL FOR NEXT