Hous of Bambbo
Hous of Bambbo Sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : भाकरी, भाषा आणि अभिमानगीत!

कु. सरोज चंदनवाले

‘नअस्कार! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मी प्राणांची कुर्वंडी करण्यास तयार आहे, आणि तळहातावर निखारा ठेवून तशी शपथ घ्यायचीही माझी तयारी आहे.

‘नअस्कार! मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मी प्राणांची कुर्वंडी करण्यास तयार आहे, आणि तळहातावर निखारा ठेवून तशी शपथ घ्यायचीही माझी तयारी आहे. तलवार असती तर तिच्या पातीवर सर्रकन आंगठा फिरवून भांगात लाल रेघ ओढली असती. मराठी ही माझी माय भाषा असून अभिजात दर्जा हा तिचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच...’’

सुभाषामंत्री मा. सुभाषाजी देसाईसाहेबांना मी पाठवलेल्या पत्रातील ओळी वर दिल्या आहेत. (पत्रात आणखी बराच मजकूर आहे. सांगणार नाही!) देसाईसाहेबांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा म्हणून जनअभियान छेडलं आहे, त्या जनअभियानाला प्रतिसाद म्हणून मी हे पत्र लिहिलं. पण भलताच घोळ झाला! पत्राच्या पाकिटात मी (सवयीनं) गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्या, आणि चुकून ते पत्र नेमकं १४ फेब्रुवारीला त्यांच्या हाती पडलं. माझ्या पत्राचा सगळा सीरिअसनेसच गेला ना!!

मराठीसाठी लढणाऱ्यांचं आजवर अस्संच होत आलं आहे. युद्धासाठी जावं आणि जेवायलाच बसावं, असं दरवेळी होतं. आमची मराठी भाषा खरंतर अभिजात आहेच. तिला पुराव्यांची गरज नाही. पण केंद्र सरकार सारखं पुरावे मागतं. तामीळनाडूत करुणानिधींचं गॉगलवालं सरकार होतं, तेव्हा पाठिंब्याच्या बदल्यात त्यांनी ‘आमच्या भाषेला अभिजात दर्जा देत असाल तर देतो पाठिंबा’ असं ठणकावून सांगितलं. ते तात्काळ मान्य झालं.

पाठोपाठ कन्नड, ओडिया वगैरे भाषांनीही पदर खोचून दर्जा तरातरा ओढून नेलान! आपल्या मराठीनंही असाच इंगा दाखवल्याशिवाय आता तरणोपाय नाही. सुभाषामंत्री देसाईसाहेबांनी तर आता युद्धाचं रणशिंगच फुंकलं आहे. मी त्यांच्या सैन्यात महिला तुकडीत सामील झाल्ये आहे. तुम्हीही होणार्ना?

माननीय सुभाषा-मंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायला मराठी कलावंत पुढे सरसावले आहेत. या कलावंतांनी मुलुंडच्या कालिदास सभागृहात एक जबरदस्त, रंगारंग कार्यक्रम आयोजित केला. आमचे परममित्र रा. कौशलकुमार इनामदार यांनी त्यासाठी (आणखी) एक ‘अभिमान मराठी’ गाणं तयार केलं. हा मजकूर तुम्ही वाचाल तेव्हा कदाचित त्यांनी केलेलं गाणं तुम्ही गुणगुणत असाल. (मी गुणगुणणार नाही, कारण आमच्या कोथरुडच्या सोसायटीतल्या लोकांना माझ्या गाण्याची भारी दहशत वाटते. अरसिक मेले!)

कौशलकुमारांचं संगीत हा माझा अतिशय आवडीचा विषय आहे. अगदी ‘गर्द निळा गगनझुला’पासून त्यांची गाणी मी ऐकतीये. ‘वासाचा पह्यला, पावस आयेलाऽऽ...’ हे कविवर्य अशोक बागवेगुर्जींचं मातीच्या वासाचं मस्त गीत ऐकूनच मी भविष्य वर्तवलं होतं : ‘‘अरे, हा तर अभिमानगीततज्ञ!! (‘अरे, हा तर बालगंधर्व’च्या चालीवर!) हा संगीतकार पुढे अर्धा डझन तरी मराठी अभिमानगीतं करणार!!’’

माझं भाकित खरं ठरतंय! ‘मराठी’ आणि ‘अभिमान’ हे दोन शब्द एकत्र आले रे आले की, आमचे कौशलकुमार पेटी पुढ्यात ओढून सरसावूनच बसतात. कविवर्य सुरेश भटांच्या ‘लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी’ या गीताला त्यांनी किती सुंदर चाल लावली होती, आठवतंय ना? परवा परवापर्यंत माझा रिंगटोन होता तो!! खुद्द अमिताभ बच्चन यांना पुण्यात येऊन ती गुणगुणावीशी वाटली, यातच सारं आलं. ‘सवाई’त ही चीज म्हणून दाखवू का? अशीही इच्छा त्यांनी व्यक्त केली होती म्हणे.

हे नवं कोरं अभिमानगीत (क्र. २) पुन्हा एकदा बच्चनसाहेबांकडून गाऊन घ्यावं, आणि दिल्लीश्वरांच्या बोडख्यावर घालावं. म्हणावं, ‘‘आता तरी (मेल्यांनो) आमच्या मराठीला अभिजात दर्जा द्याल्का?’...ही युद्धाची सुरवात म्हणून वाईट नाही!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT