Nitish Kumar
Nitish Kumar Sakal
editorial-articles

अग्रलेख : ठग्गू के लड्डू!

सकाळ वृत्तसेवा

बिहारातील सत्तांतरनाट्याने भाजप पुन्हा सत्तेत आला यापेक्षा नितीशकुमारांना ‘इंडिया’ आघाडीतून दूर करून तिला खिळखिळे केले, हे अधिक वास्तव आहे. त्यामुळे ‘इंडिया’च्या भवितव्याबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये सहा दशकांहून अधिक काळ केवळ आपल्या नावामुळे गर्दी खेचणाऱ्या दुकानाचे नाव आहे ‘ठग्गू के लड्डू’. मात्र, तिथल्या लाडवांपेक्षाही त्याच्या पाटीवरील ओळ भल्याभल्यांना भुरळ घालते. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी त्या ओळींचाच वापर करून ‘बंटी और बबली’ या चित्रपटासाठी गीत लिहिले होते.

या दुकानाच्या पुढे कानपुरात शाखा निघाल्या; पण आपली पाटण्यातही शाखा आहे, हे या दुकानाच्या मालकालाही ठाऊक नसणार! ही आता देशभरात गाजत असलेली ओळ आहे : ‘ऐसा कोई सगा नही; जिसको हमने ठगा नहीं!’ बिहारचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी नवव्यांदा शपथ घेऊन विक्रम नोंदवणाऱ्या नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना दगा दिला, तेव्हा चटपटीत वाक्‍प्रचारांबद्दल प्रसिद्ध असलेल्या लालूप्रसादांचे उद्‍गार होते : ऐसा कोई सगा नही; जिसको नितीशने ठगा नही!

तर गतवर्षी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी स्थापन करण्यात पुढाकार घेणाऱ्या नितीशकुमार यांनी गेल्या चार दिवसांत पाटण्यात केलेल्या आपल्या राजकीय ‘खेला’मुळे त्यांनी या आघाडीलाच ठगवले आहे. त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या प्रतिमेला आणखी कितव्यांदा तरी तडा गेला असला, तरी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य पुरते काळवंडून गेले आहे.

अर्थात, २०१३ मध्ये भाजप नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची चिन्हे दिसू लागली, तेव्हा नितीशकुमार यांनी ज्या भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) सोडचिठ्ठी दिली होती, त्याच ‘एनडीए’मध्ये ते पुनश्च एकवार दाखल झाले आहेत. खरे तर गेल्या विधानसभा निवडणुकीत ७९ जागा मिळवणाऱ्या लालूप्रसादांच्या ‘राष्ट्रीय जनता दला’च्या खालोखाल, म्हणजे ७८ जागा मिळाल्या होत्या भाजपला आणि तेव्हा नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल केवळ ४५ जागा जिंकू शकला होता.

त्यानंतरच्या दोन वर्षांत भाजपने जाती-पातींची गणिते यशस्वीरीत्या सोडवून, राज्यभरात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. तरीही नितीशकुमार यांना ‘एनडीए’मध्ये आणण्याचा डाव भाजपने रचला. त्याचे एकमेव कारण हे आपल्याला सत्तेचा वाटा मिळावा हे नसून, ‘इंडिया’ आघाडी खिळखिळी करणे, हेच आहे ही बाब लपून राहिलेली नाही.

नितीशकुमार चार महिन्यांपूर्वीपर्यंत या विरोधी आघाडीचे आधारस्तंभ समजले जात होते. तरीही त्यांनी बिहारमध्ये नवे नेपथ्य उभारण्याचा निर्णय घेतला, त्यास अनेक कारणे आहेत. भाजपने मागास तसेच अतिमागास समाजात मोठ्या प्रमाणात जाळे उभारले आहे. त्यामुळे नितीशकुमार यांचे ‘पिछडा राजकारणा’चे गणितच विस्कळीत होऊ लागले होते, हे त्यांच्या या नव्या खेळीमागील प्रमुख कारण आहे.

मात्र, उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन मोठ्या हिंदी भाषक राज्यांत काँग्रेस गेल्या दोन-अडीच दशकात नावापुरतीच उरलेली आहे. त्यामुळे काँग्रेसचा आगामी लोकसभा निवडणुकीत सारा भरवसा हा समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तसेच नितीशकुमार याच दोन बड्या नेत्यांवर होता.

त्यास मोठा धक्का देण्याचे काम नितीशकुमार यांना आपल्या गोटात आणून नव्हे तर काँग्रेसपासून दूर करून भाजपने केले आहे. भाजपचे हे यश मोठे आहे. त्यामागे त्यांची कुशल रणनीती आहे. भाजपचे यादृष्टीने सुरू असलेले प्रयत्न कधीच लपून राहिलेले नव्हते. मात्र, एकूणातच गोंधळलेल्या अवस्थेत गेलेल्या काँग्रेसने त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.

राहुल यांच्या ‘भारत छोडो’ यात्रेनंतरही काँग्रेसच्या हातून राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये गेली आणि मध्य प्रदेश देखील जिंकता आले नाही. त्यामुळे विरोधकांच्या आघाडीतील वरचष्मा काँग्रेसने पूर्णपणे गमावला आहे. त्यातच या आघाडीचे प्रमुख म्हणून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव सुचवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनीच काँग्रेसला आपल्या घराबाहेर काढले. त्यामुळे तर काँग्रेसची अवस्था आता अगदीच दयनीय झाली आहे. भाजपला नेमके हेच हवे होते.

अर्थात, यामुळे नितीशकुमार यांचा फायदा नक्कीच होणार आहे; कारण त्यांची आघाडी भाजपबरोबर असते, तेव्हा त्यांचे बळ वाढते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. नितीशकुमारांनी विरोधी आघाडीच्या हातात हा असा ‘ठग्गू का लड्डू’ देऊन काँग्रेसविरोधी आघाडी मजबूत करण्याचे मोठी कामगिरी बजावली आहे.

त्यामुळे आपल्या तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी प्रतिमेचे काय होणार, याची त्यांना बिलकूलच फिकीर नाही, हे त्यांनी यापूर्वी अनेकदा दाखवून दिले आहे. मात्र, बिहारमधील या नव्या नेपथ्याला शह देण्याचे काम आता काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव एकत्र येऊन करतील काय, एवढीच कुतुहलाची बाब आहे!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT