Oscar 2024 esakal
editorial-articles

अग्रलेख : ग्रहमंडल दिव्यसभा...

यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते महिला कलावंतांचा सहभाग. त्यामुळे चित्रनिर्मितीच्या या उद्योगात आता स्त्रीवर्गाचा वाटा वाढू लागला आहे, याचे प्रत्यंतर आले.

सकाळ वृत्तसेवा

यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते महिला कलावंतांचा सहभाग. त्यामुळे चित्रनिर्मितीच्या या उद्योगात आता स्त्रीवर्गाचा वाटा वाढू लागला आहे, याचे प्रत्यंतर आले.

‘दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता..’ क्षितिजरेखेवर सहस्त्र सूर्य एकाच वेळी उगवल्यावर निर्माण होणाऱ्या प्रखर तेजाचे वर्णन करणारा भगवद्गीतेतला हा श्लोक जे. रॉबर्ट ओपनहायमर या प्रख्यात सिद्धांतवादी शास्त्रज्ञाला१६ जुलै १९४५ रोजी आठवला होता.

भारतीय तत्त्वज्ञानाने भारावलेल्या या अणुवैज्ञानिकाने या दिवशी विध्वंसकारी अणुबॉम्बची पहिल्यांदा चाचणी केली होती. हा प्रज्ञावंत शास्त्रवेत्ता मनाने भारताशी जोडला गेला होता. त्या प्रज्ञेच्या जोरावर त्याने अणुगर्भातील अपरिमित ताकद मुक्त करुन दाखवली. पण या शोधामुळेच मानवजातीला विध्वंसाचे एक नवे अस्त्र मिळाले.

दुसरे महायुद्ध ज्याच्या कर्तृत्वामुळे संपले, त्या ओपनहायमर यांना पुढे मानहानिकारक चौकशांना सामोरे जावे लागले. त्यानंतर तब्बल पाऊणशे वर्षांनंतर त्यांच्या पडद्यावरील चरित्रपटाने कलाविश्वात ‘स्फोट’ घडवले. यंदाच्या ९६व्या ऑस्कर सोहळ्यात या चित्रपटाला तब्बल सात पुरस्कार मिळाले.

विख्यात दिग्दर्शक ख्रिस नोलान यांची ही आणखी एक बेजोड चित्रकृती. त्यांना दिसलेले ओपनहायमर जगभरातील चित्ररसिकांनी डोक्यावर घेतले. यंदाचे गोल्डन ग्लोब, बाफ्टा आदी बरेच मानाचे पुरस्कार या चित्रपटाने आधीच गाठीला बांधले आहेत. ऑस्करमध्ये वेगळे काही घडण्याची शक्यता नव्हतीच.

लॉस एंजलिसच्या विशाल डॉल्बी सभागृहात सालाबादप्रमाणे रविवारी (भारतात सोमवारी पहाटे) ऑस्कर सोहळा नेहमीच्या थाटात पार पडला. सोहळ्यावर ओपनहायमरची छाप सुरवातीपासूनच होती. व्यावसायिक यशासोबत कलात्मकतेतही शिखर गाठणारे चित्रपट फार दुर्मिळ असतात. ‘ओपनहायमर’ हा त्यापैकी एक.

काय बर्ड आणि शेरमन या लेखकद्वयीने ‘अमेरिकन प्रोमिथिअस’ (ग्रीक पुराणकथेनुसार प्रोमिथिअसने स्वर्गातून अग्नि भूलोकी आणला, आपल्याकडे भगीरथाने गंगा आणली तशी-) हे ओपनहायमर यांचे चरित्र अनेक वर्षांपूर्वी लिहिले होते. दिग्दर्शक नोलान यांनी त्यातील बारकावे शोधत पटकथा सिद्ध करुन घेतली आणि हा नितांतसुंदर चित्रपट तयार झाला. ‘ओपनहायमर’शी स्पर्धा करायला मैदानात उतरली होती ती बार्बी!

गेल्या वर्षी ‘ओपनहायमर’ प्रदर्शित झाला, तेव्हाच ‘बार्बी’ने त्याच्याबरोबरीने रसिकांना भुरळ घातली होती. हे दोन्ही वेगळ्या प्रकृतीचे चित्रपट बघून टाकलेले बरे, अशीच शिफारस बव्हंशी सिनेनियतकालिकांनी आवर्जून केली होती. परंतु, ‘बार्बी’सारख्या बाहुलीकथेला ऑस्करची फक्त एक बाहुली मिळाली! तीही अस्सल मूळ गाण्यासाठी असलेली.

‘पूअर थिंग्ज’ या चित्रपटातील अद्भुत भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एम्मा स्टोन हिला मिळाला. एका युवतीवर गर्भातील अर्भकाच्या मेंदूचे आरोपण करण्यात येते, आणि तिला वेगळीच नजर मिळून जाते, असे काहीसे कथानक असलेल्या या चित्रपटात एम्मा स्टोनने अभिनयाची कमाल केली आहे. यंदाच्या ऑस्कर सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले ते महिला कलावंतांचा सहभाग.

चित्रनिर्मितीच्या या उद्योगात आता स्त्रीवर्गाचा वाटा वाढू लागला आहे, याचे प्रत्यंतर आले. एरवी सिनेमाचा व्यवसाय हा पूर्णत: पुरुषप्रधान असतो. स्त्री दिग्दर्शकांची संख्या तशी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी. १९८६ मध्ये ‘चिल्ड्रेन ऑफ लेसर गॉड्स’ या चित्रपटाने चार ऑस्कर पुरस्कार पटकावले होते. रँडा हाइन्स यांनी दिग्दर्शिलेला हा चित्रपट दीर्घकाळ स्मरणात राहणारा होता.

तथापि, अशी कामगिरी करणाऱ्या स्त्रीनिर्मात्या नंतर क्वचितच नावाजल्या गेल्या. यंदा ऑस्कर नामांकने मिळालेल्या दिग्दर्शकांमध्ये तीन महिला होत्या. ‘बार्बी’ च्या ग्रेटा गेरविग, ‘पास्ट लाइव्ज’च्या सेलिन साँग आणि ‘अनाटॉमी ऑफ ए फॉल’चे दिग्दर्शन करणाऱ्या जस्टिन ट्रेइट. अर्थात, हे चित्र नक्कीच आशादायक म्हणावे लागेल.

विख्यात दिग्दर्शक मार्टिन स्कोर्सिसी यांच्या ‘किलर्स ऑफ फ्लावर मून’ चित्रपटाला चांगले यश मिळेल असे जे वाटत होते, ते मात्र फलद्रुप झाले नाही. ‘टु किल अ टायगर’ हा कॅनडास्थित संस्थेने निर्माण केलेला एक लघुपट. झारखंडमधील एका कुग्रामातील बलात्कारित अल्पवयीन मुलीसाठी अशिक्षित बापाने दिलेला जबरदस्त लढा हा लघुपट दाखवतो. या चित्रपटाला ऑस्कर नाही मिळाले, त्याऐवजी युक्रेनच्या ’२० डेज ऑफ मारियुपोल’ला मिळाले.

युद्धाच्या झळा लागलेल्या युक्रेनियन गावाची गाथा या लघुपटात आहे. युक्रेनियन दिग्दर्शक मिस्तीस्लाव चेर्नोव याने भाषणात काढलेले उद्गार मात्र बोलके होते. तो म्हणाला : ‘खरे तर हा लघुपट करायची संधीच मला मिळायला नको होती. आमची शहरे बेचिराख न करण्याचे मान्य असेल तर हा लघुपट मी रशियाला तसाच देऊन टाकीन!’

ऑस्कर सोहळ्यात बाकीचा दिमाख नेहमीसारखाच होता. भारतीय कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना श्रद्धांजली वाहायलाही ऑस्कर समिती विसरली नाही. एकंदरित चित्रपटांचा प्रवाह बदलताना दिसतो आहे, आणि त्यात स्त्री दिग्दर्शकांची प्रभावशाली लगबग दिसू लागली आहे. काही तारे मावळतात. काही नवे उगवतात. यावेळी तारकांचा वावर अधिक दिसला. तारांगण तसेच झगमगत राहिले आणि राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : दोन मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, नकार मिळताच उचललं धक्कादायक पाऊल, नेमकं काय घडलं? वाचा...

flight caught fire mid-air VIDEO : उडत्या विमानात अचानक भडकली आग; प्रवाशांची आरडाओरड अन् पळापळ...

Western Railway: तिकीट काउंटरवरील लांबच लांब रांगा टळणार, मुंबई रेल्वेची नवी सुविधा, आता लोकलही राबवणार 'एसटी पॅटर्न'

PAK vs SA: बाबर आझमला फॉर्म सापडेना! टोनी डी झोर्झीने एका हाताने अफलातून कॅच घेत धाडलं माघारी, पाहा Video

Lakshmi Pujan 2025 Story: आपण लक्ष्मीपूजन का करतो? ही आहे त्यामागची आख्यायिका; शुभ मुहूर्तही जाणून घ्या

SCROLL FOR NEXT