Israel Attack
Israel Attack sakal
संपादकीय

भाष्य : ‘द्विराष्ट्र’ तोडग्याला सुरूंग

सकाळ वृत्तसेवा

- के. व्ही. प्रसाद

‘हमास’ने इस्राईलवर केलेल्या हल्ल्याने जगाला चकित केले आहे. तथापि या घटनेने त्या भागात शांतता प्रक्रिया राबवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. शिवाय, अरब देश आणि इस्राईल यांच्यातील संबंध सुधारण्याची गतीही मंदावू शकते.

‘हमास’ने ज्या पद्धतीने अत्यंत वेगवान हालचाली करत आणि कमालीची गुप्तता बाळगत गाझापट्टीजवळील इस्राईलच्या भागात सात ऑक्टोबर रोजी प्रचंड हल्ला केला त्याने जगाला मोठा धक्का बसला. त्याचप्रमाणे ‘हमास’ने ज्या चपळाईने इस्राईलच्या संरक्षण दलाची सुरक्षा यंत्रणा मोडत जमीन, समुद्र आणि हवाई मार्गे इस्राईलमध्ये घुसखोरी केली त्यावरून असा स्पष्ट निष्कर्ष निघतो की, इस्राईलच्या गुप्तचर यंत्रणांना या हल्ल्याची पूर्वकल्पना येण्यात मोठे अपयश आले आहे.

‘हमास’ने इस्राईलवर केलेल्या हल्ल्याला ‘अल अक्सा फ्लड’ मोहीम असे नाव देत, शनिवारी इस्राईलच्या सीमावर्ती भागावर हल्ला केला. ‘हमास’ने हल्ल्यासाठी निवडलेला दिवस हा ऐतिहासिक पार्श्वभूमीचा होता. इस्राईलविरुद्ध इजिप्त व सीरिया अर्थात इस्राईल विरुद्ध अरब यांच्यामध्ये पन्नास वर्षांपूर्वी याच दिवशी युद्ध झाले होते. याला ‘योम किप्पूर युद्ध’ म्हणतात.

या वर्षी पन्नास वर्षांनंतर त्याच दिवशी ‘हमास’च्या शस्त्रसज्ज दहशतवाद्यांनी इस्राईलच्या सीमेलगत बावीस ठिकाणांवर हल्ले चढविले. इस्राईलच्या सीमेलगत हजारो क्षेपणास्त्रांचा मारा करत इस्राईलची आयर्न डोम क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा फोल ठरविली. ‘हमास’च्या या दहशतवाद्यांनी इस्राईलमधील शेकडो जणांना मारले. त्याचप्रमाणे दीडशेजणांना पकडून ओलिस ठेवले. इस्राईलने प्रतिहल्ला केल्यास अपहरण केलेल्या नागरिकांची हत्या करू, अशी धमकी ‘हमास’ने दिली आहे.

या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल ‘हमास’ची मोक्याची ठिकाणे आणि त्यांनी ताब्यात घेतलेल्या इमारती नष्ट करण्याचे आदेश इस्राईलच्या हवाई दलाला देण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांपासून इस्राईलकडून ‘हमास’वर प्रतिहल्ले सुरू आहेत. इस्राईलच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार इस्राईल गाझापट्टीवर पूर्ण ताबा मिळवणार असून या परिसरात भूसुरुंग पेरणार आहे.

‘हमास’ने इस्राईलवर एवढा मोठा हल्ला करत परिस्थिती एवढ्या टोकाला नेण्याचे कारण काय असावे, याबाबत विविध दावे करण्यात येताहेत. ‘अल अक्सा मशिदीच्या परिसरात इस्राईलकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या हिंसाचाराला प्रत्युत्तर, इस्राईलला धडा शिकविण्यासाठी आणि त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वागायला भाग पाडण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे,’ असा दावा ‘हमास’चा कमांडर महंमद डाएफ याने केला आहे.

जेरुसलेममधील ‘अल अक्सा’ ही मशीद इस्लाममधील तिसऱ्या क्रमांकाचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर; ज्यू समाज त्याला ‘टेम्पल माउंट’ या नावाने संबोधते. त्यांचे देखील हे पवित्र धार्मिक स्थळ आहे. या परिसरातल्या नागरिकांमध्ये आणि इस्राईलच्या सैनिकांमध्ये सातत्याने संघर्ष होत असतो. काही दिवसांपूर्वी काही ज्यू व्यक्तींनी या मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले होते.

‘हमास’ची वाटचाल, कार्य

‘हरकत अल-मुकावामा अल-इस्लामिया’ अर्थात ‘हमास’ या इस्लामी बंडखोर संस्थेची स्थापना पॅलेस्टाईनचे नेते शेख अहमद यासीन यांनी १९८० मध्ये केली. त्यासाठी त्यांना मुस्लिम ब्रदरहूड्सनी मदत केली. सुरुवातीपासूनच या संघटनेचा इस्राईलच्या अस्तित्वालाच कडाडून विरोध आहे. पाश्चिमात्त्य देशांच्या दाव्यानुसार ‘हमास’ला इराणकडून पाठबळ मिळते. या संघटनेवर जागतिक स्तरावर अनेक निर्बंध आहेत.

दुसरीकडे वेस्ट बँक येथील येथील रामल्लाह येथून सरकार चालविणाऱ्या फतह पक्षाशी देखील ‘हमास’चे मतभेद आहेत. या पक्षावर पॅलेस्टाईनचे उदारमतवादी आणि हिंसाचाराविरोधात असलेले नेते यासर अराफत यांचा प्रभाव आहे. २००६-०७ मध्ये ‘हमास’ने फतह पक्षाचा पराभव करत गाझापट्टीतील सत्ता ताब्यात घेतली.

परंतु इस्राईल आणि इजिप्त या दोन्ही देशांनी ‘हमास’वर बंदी घालत त्यांच्या सीमा बंद केल्याने, ‘हमास’ला विविध वस्तूंची, साधनांची टंचाई जाणवू लागली. असे असूनही ‘हमास’ देशाबाहेरील शक्तींकडून आर्थिक मदत मिळवण्यात यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे इस्राईलने परवानगी दिलेल्या देशांकडूनही त्यांना काही प्रमाणात मदत मिळू लागली.

दरम्यानच्या काळात पॅलेस्टाईनवर पूर्ण निर्बंध लादण्याबाबत युरोपीय देशांत मतभेद निर्माण झाले. पॅलेस्टाईनवर निर्बंध लादल्याने तेथील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागेल, असे काही देशांचे मत आहे. सध्या इस्राईल करत असलेल्या हवाई हल्ल्याने ज्याप्रमाणे गाझापट्टीतील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो, त्याचप्रमाणे इस्राईली नागरिकांनाही अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.

कारण ‘हमास’च्या ताब्यातील भूमी प्राप्त करण्यासाठी इस्राईली सैन्य कारवाई करत असतानाच, ‘हमास’नेही इस्राईलच्या सुमारे शंभर ते दीडशे ओलिस ठेवलेल्या नागरिकांना मारण्याची धमकी दिल्याने, त्यांच्या भवितव्याचे काय हा प्रश्न इस्राईचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यासमोर आहे.

यापूर्वीही ‘हमास’ने इस्राईलच्या एका सैनिकाचे अपहरण करून त्याला सोडण्याच्या बदल्यात ‘हमास’चा म्होरक्या आणि हजारो समर्थकांची सुटका करण्यास इस्राईलला भाग पाडले होते.

हल्ल्यामागे चाचपणीची गणिते

‘हमास’ने केलेल्या हल्ल्यामागील कारणाबाबत अन्य एक दावा असा की, अरब जगतातील बदलती समीकरणे चाचपण्यासाठी ‘हमास’कडून हा हल्ला करण्यात आला. सौदी अरेबिया आणि इस्राईल यांच्यामध्ये चांगले संबंध प्रस्थापित व्हावे यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न होताहेत.

यासाठी अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या काळात केलेल्या अब्राहम कराराची कार्यवाही, अर्थात इस्राईल, संयुक्त अरब अमिराती व बहारीन या देशांत परस्परांतील सहकार्य आणि संबंध सुधारण्यावर भर देण्यात आला होता. मात्र आता ‘हमास’ने केलेल्या हल्ल्यानंतर आणि इस्राईलकडून सुरू असलेल्या प्रतिहल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील देशांच्या परस्परांतील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सौदी अरेबिया, इजिप्त, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिराती तसेच बहारीन हे देश मध्य आशियांत शांतता निर्माण करण्यासाठी इच्छुक आहेत. कारण या प्रदेशात कोणत्याही परिस्थितीत प्रदीर्घ काळ युद्ध सुरू राहिल्यास त्याचा प्रभाव या देशांचे इस्राईलबरोबरील संबंधांवर पडणार आहे.

दरम्यान गाझापट्टीतील इस्राईली सैन्याच्या कारवाईमुळे सामान्य नागरिकांना प्राण गमवावे लागत आहेत. परिणामी अतिउजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून नेतान्याहू सरकारसमोरील आव्हाने वाढणार आहेत. इस्राईली सैन्याने केलेल्या कारवाईबाबत प्रकाशात आलेल्या काही प्राथमिक अहवालानुसार, इस्राईलने गाझापट्टीतील सुमारे वीस लाख पॅलेस्टिनी नागरिकांना सुरक्षित स्थळी निघून जाण्यास सांगितले आहे.

कारण हा भाग इस्रायली सैन्य बेचिराख करून टाकणार आहे, असा दावा या अहवालात आहे. परंतु इस्राईलच्या सुरक्षा दलांनी गुरुवारी हे दावे फेटाळून लावत अशा पद्धतीने गाझापट्टीतील नागरिकांना कुठेही जाण्यास सांगितले नसल्याचे म्हटले आहे.

त्याचप्रमाणे इस्राईलमधील न्यायपालिकेतील फेरबदलामुळे नेतान्याहू सरकारला नागरिकांच्या प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागत आहे. न्यायपालिकेतील फेरबदलाविरोधात इस्राईलमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चांचे आयोजन करण्यात आले होते, ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते.

वर्तमानातील युद्धजन्य परिस्थितीमध्ये परस्परांतील मतभेद विसरून इस्राईलमधील सत्ताधारी आणि विरोधकांचे मिळून राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याचे आवाहन इस्राईलमधील विरोधी पक्षनेते याईर लॅपीड यांनी नेतान्याहू यांना नुकतेच केले आहे.

या सर्व घडामोडींमध्ये दीर्घकाळ चर्चेत असलेला एक मुख्य मुद्दा मात्र मागे पडला आहे, तो म्हणजे इस्राईल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी द्विराष्ट्रवादाचा मुद्दा. याला संयुक्त राष्ट्रांनी देखील पाठिंबा दिला होता. मात्र सध्याच्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रांची भूमिकासुद्धा बदलण्याची शक्यता आहे.

या सर्व घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर या संघर्षाबाबत भाष्य करत, भारत दहशतवादाविरोधात इस्राईलच्या बाजूने ठाम उभा असल्याचा संदेश देत इस्राईलला पाठिंबा जाहीर केला आहे. असे असले तरी भारत, पॅलेस्टाईलचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशीही सौहार्दपूर्ण राजनैतिक संबंध टिकविण्याचा प्रयत्न करत आहे. अब्बास हेदेखील या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध चांगले ठेवण्यासाठी समतोल साधण्याचा प्रयत्न करत आहेत.

(लेखक परराष्ट्र धोरणाचे दिल्लीस्थित विश्‍लेषक आहेत.)

(अनुवाद - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT