pandit kumar gandharv
pandit kumar gandharv sakal
संपादकीय

नवसर्जन; की फक्त स्मरण?

मंदार कारंजकर

पंडित कुमार गंधर्वांच्या जन्मशताब्दी वर्षाची नुकतीच सांगता झाली. गेल्या वर्षभरात या निमित्ताने अनेक जण कुमारजींबद्दल बोलले, व्यक्त झाले. या महान कलाकाराचे स्मरण केले जाणे स्वाभाविक आणि आवश्‍यकही. पण ते कुमारांच्या सांगीतिक विचारांना साजेसे नको का? या आणि अशा काही संबंधित प्रश्नांच्या अनुषंगाने केलेली परखड टिप्पणी.

पं. कुमार गंधर्व विचार करणारे कलावंत होते. त्यांच्या मापदंडानुसार विचार करणं म्हणजे फक्त स्तुति-सुमनं उधळणं नव्हे. त्यांना आवडणाऱ्या अनेक कलाकारांबद्दल ते एकाच वाक्यात स्तुती आणि टीका करून जातात. जन्मशताब्दीच्या निमित्ताने या श्रेष्ठ कलाकाराविषयी अनेक कार्यक्रम झाले. लोकांनी भाषणे केली. कुमारांच्या रचना गायल्या गेल्या.

आज खुद्द कुमार गंधर्व असते तर या सभा आणि भाषणे ऐकून त्यांना काय वाटलं असतं? श्रोत्यांना सतत काहीतरी वेगळं, नवीन आणि उत्तम दर्जाचं ऐकवण्यासाठी धडपडणारे कुमारजी सभागृहांत त्यांच्याच रचना तशाच्या तशा गायल्या जात आहेत, हे बघून संतुष्ट झाले असते कि दुःखीकष्टी? त्या रचना कितीही वेळा ऐकल्या तरी छान वाटतं हे मान्य; परंतु ती खऱ्या अर्थाने त्यांना दिलेली मानवंदना ठरेल का?

कुमार गंधर्वांची सांगीतिक मूल्ये काय होती? आजच्या काळात ती कितपत संबद्ध आहेत? आज ती जोपासली जाऊ शकतात का, आणि कशी? आज त्यांच्या विचारसरणीला अनुसरून कोणती गायक मंडळी काम करीत आहेत? अशा अनेक महत्त्वाच्या बाबींची मीमांसा या वर्षभरात करता आली असती. माझ्या कुवतीनुसार ज्या दोन-चार गोष्टी मला महत्त्वाच्या वाटतात, त्या मांडायचा मी इथे प्रयत्न करणार आहे.

गायनक्षेत्राची बदललेली स्थितीः आज आपण शास्त्रीय संगीताची एकंदरीत अवस्था पहिली तर ती त्या काळाच्या तुलनेत फार वेगळी आहे. आजचे कलाकार आणि श्रोते हे दोघेही मवाळ आहेत. हा मवाळपणा काहीसा बदललेल्या परिस्थितीमुळे आहे आणि काहीसा ढासळलेल्या कलेच्या समजेतून.

आज बरेच बुजुर्ग गायक तानपुरे न घेता मोठ्या कार्यक्रमांतून गातात. दुसऱ्या बाजूला, मी अत्यंत सुरेल सरोदवादनाला आणि त्यानंतर अत्यंत बेसूर गाण्याला दाद देताना एकाच श्रोतृवर्गाला पाहिलं आहे. आजच्या रसिकांची संगीताची समज काही अंशी खालावली आहे. या दोन्ही बाबी कुमारजींच्या काळात बऱ्याच अंशी लागू नव्हत्या.

कलाकारांची हरवलेली फुरसतः कुमारजींच्या काळात, कलाकार फुरसतीत असायचे. कुमारजी एकेका गाण्यासाठी ३-४ महिने विचार करायचे. माझ्या पिढीतील कलाकारांना एका कार्यक्रमासाठी तीन महिने विचार करणं म्हणजे नक्की काय, याची कल्पना नाही. ज्यांना टाळ्या मिळतात त्याच गोष्टी परत ऐकवणं सुरु असतं.

आजचे गाणारे, साथीदार सर्वच मंडळी फार बिझी आहेत. त्यात त्यांचा दोष नाही. अस्तित्व टिकवण्यासाठी आजच्या अनेक कलाकारांना खूप धडपड करावी लागते आहे. त्यापुढे जाऊन गाणं वाढवणं वगरे फारच मुश्किल.

गाणं वाढवायचं कसं?ः प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझ्यापेक्षा बुजुर्ग अशा अनेक कलाकारांचं गाणं काळानुसार मी ढासळताना पाहिलं आहे. कुमारजींसारख्या कलाकारांकडे बघून त्यांनी गाणं कसं वाढवलं असेल हा प्रश्न वारंवार पडतो. आज गाणं समृद्ध करणं म्हणजे काय हे माहिती असणं दुर्मिळ झालं आहे. ते समृद्ध करण्याची इच्छा त्याहून दुर्मिळ आहे.

आजची समस्या नक्की काय आहे? आजच्या बहुतांश रसिकांना गाण्यात खोल जाण्यासाठी धडपडणारा कलाकार कोण आहे हे ओळखता येत नाही. त्याला मदत करणं, सांभाळणं ही दूरची गोष्ट. आज अनेक क्षुल्लक बाबींना सांगीतिक मानदंड म्हणून मिरवण्यात येतं.

गाण्याची पट्टी, अनवट राग, जोड राग, गळ्याची फिरत अशा बाबींना मानदंड बनवल्याने आणि त्यांच्या उगाच मागे लागल्याने खरं संगीत मागेच राहातं. कुमारजी, किशोरीताई, उस्ताद आमिरखान इत्यादी अनेक कलाकारांच्या काहीशा अतिरेकी वृत्तीच्या चाहत्यांमुळे भंपक मापदंडांची रेलचेल आहे. बरेचदा त्यांच्या नादी लागून तरुण कलाकार स्वतःच गाणं बिघडवून घेताना देखील पाहिले आहेत.

बदललेलं ‘प्रॉडक्ट’

‘कुमारजींच्या काळात, लोकं कुमारजींना ऐकायला ’ यायचे. ‘उड जायेगा’ ऐकायला नाही. श्रोते गायकाला किंवा गायिकेला ऐकायला यायचे. त्या कलाकाराचे सांगीतिक विचार, सांगीतिक मूल्य, एक्स्प्रेशन या पातळींवर त्यांचं आणि कलाकारांचं नातं होतं. आज बहुतांशवेळा श्रोत्यांचं नातं कलाकाराच्या नावाशी किंवा त्याच्या एखाद्या गाण्याशी असतं. मग ते गाणं कसं गायलं आहे, त्यातला सांगीतिक विचार जपला गेला आहे का, या बाबी अलाहिदा.

‘मुक्काम वाशी’ या पुस्तकात कुमार गंधर्व म्हणाले आहेत, की तुम्ही चांगला कलाकार निर्माण करण्याच्या भानगडीत पडू नका. चांगला कलाकार घडायचा असेल तर घडतोच. मन्सूर, भीमसेनजी, निवृत्तीबुवा असे अनेक कलाकार परिस्थिती प्रतिकूल असून सुद्धा घडले आणि पुढे आले. कुमारजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एकूणच संगीताची परिस्थिती आणि तिचा विचार करताना मला दोन बाबी खूप महत्त्वाच्या वाटतात:

कलाकारांचा 'धीर' - आजचे अनेक कलाकार, ज्यात तरुण कलाकार पण येतात; खरंतर आर्थिकदृष्ट्या बऱ्याच चांगल्या स्थितीत आहेत. संध्याकाळी काय खायचं, महिन्याभराने काय करायचं इतकी भीषण आपली परिस्थिती नाही. कार्यक्रम मिळवण्यासाठी धडपड करावी लागणार हे सगळे मान्य आहे; परंतु गाण्यात तडजोड करण्याची, मनाने खचण्याची, सांगीतिक मूल्यांशी तडजोड करण्याची गरज नाही. मी का गातो/गाते? मला काय दर्जाचं गाणं ऐकवायचं आहे? या प्रश्नांची धग आपल्यात सतत जिवंत हवी आणि तो मापदंड साध्य करण्याचा मार्ग आपण सोडायला नको.

श्रोत्यांची जाण: श्रोत्यांनी अजून सजग होणं, स्वतःची समज आणि समृद्धी वाढवणं फार गरजेचं होऊन बसलं आहे. श्रोते उत्तम आणि सुमार संगीताला सारखीच दाद देऊ लागले, की कलाकारांचा धीर डळमळतो. अनेक तरुण आणि थोडे बुजुर्ग कलाकारदेखील चांगले श्रोते निर्माण व्हावेत म्हणून प्रयत्न करत आहेत. असे प्रयत्न होणंदेखील गरजेचं आहे. या लेखाचा हेतू कोणालाही दुखावणं किंवा उणे-दुणे काढणं नसून आजची खरंच गरज काय आहे आणि त्यादृष्टीने काही प्रश्न विचारणं आणि त्या निमित्ताने एकत्रित विचार करणं आहे. इथून पुढेही अनेक संधी येणार आहेतच.

(लेखक शास्त्रीय संगीताचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Pushpa Kamal Dahal : नेपाळच्या पंतप्रधानांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ३ वाजेपर्यंत फक्त ३६.०७ टक्के मतदान, सर्वाधिक मतदान कुठे?

Randeep Hooda: 'स्वातंत्र्य वीर सावरकर' ओटीटीवर होणार रिलीज; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या...

Latest Marathi Live News Update: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा, कार्यकर्त्यांच्या घेतल्या धावत्या भेटी

ICMR On Side Effects Of Covaxin: Covaxin च्या दुष्परिणामांबाबतचे आरोप खोटे? समोर आले नवे अपडेट; ICMR ने अहवालावर उपस्थित प्रश्न केले

SCROLL FOR NEXT