Hous of Bamboo
Hous of Bamboo sakal
संपादकीय

हौस ऑफ बांबू : पाठपुरावामॅन ऑफ मराठी...!

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! लौकरच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार, याची खात्री बाळगा. कारण आता या चळवळीला निर्णायक तोंड फुटलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी आता महाराष्ट्र सरकारला शेवटी निर्वाणीचं शस्त्र उपसावं लागलं. केंद्र सरकारने टोलवत ठेवलेला मराठी भाषेचा अभिजात दर्जा (बऱ्या बोलाने) देता की नाही, असा धोशा लावण्यासाठी सरकारनं एक जबर्दस्त पाठपुरावा समिती गठित केली आहे.

समितीला कुणी घाबरत नाही, हे खरं. पण ही समितीच अशी सणसणीत आहे की दिल्लीश्वर तातडीनं अभिजात दर्जाचं सर्टिफिकेट काढून हातात ठेवतील. कारण साक्षात माजी सनदी अधिकारी सर ज्ञानेश्वर मुळेसाहेब (भा. वि. से.) यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुळे साहेबांसोबत समितीवर आपले सर्वांचे नेहमीच लाडके असणारे डॉ. सर सदानंदमहाराज मोरे यांचीही नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जोडीला विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. सर राजा दीक्षित, मराठी भाषा सल्लागार समितीचे डॉ. सर लक्ष्मीकांत देशमुख आणि ‘सरहद’ या संस्थेमार्फत सामाजिक कार्याची हद्द करणारे सर संजय नहार यांचीही कुमक असणार आहे.

या मंडळींचा महिमा म्या काय वर्णावा? सर संजय नहार यांना तर श्रीनगरचे गल्लीबोळ पुण्यासारखे तोंडपाठ आहेत. गृहस्थ देशभर फिरुन यथेच्छ समाजसेवा करतात. काश्मीरमध्ये तर त्यांचा इतका बोलबाला आहे की, काश्मिरी लोकच त्यांना ॲड्रेस वगैरे विचारतात म्हणे!

मराठी साहित्य (आणि संमेलनं- पंजाबातील घुमान संमेलन समाविष्ट) हा त्यांचा काश्मीरइतकाच लाडका प्रांत. सर लक्ष्मीकांत देशमुख हे बोलूनचालून मराठी भाषेचे प्रांताधिकारीच! सर राजा दीक्षित आणि सर सदानंदमहाराज यांना तर जागतिक पातळीवर (पक्षी : पुण्यात) जगन्मान्यता आहे.

सर ज्ञानेश्वर मुळेसाहेब (भा. वि. से.) हे सनदी क्षेत्रातलं गाजलेलं नाव. खरंतर यशस्वितेचा मूर्तिमंत पासपोर्टच!! जपान, मॉरिशस, मॉस्को, न्यूयॉर्क, मालदीव अशा कित्येक ठिकाणी भारतातर्फे जोरदार कामगिरी बजावल्यानंतर ते यथावकाश निवृत्त झाले. पण याच कारकीर्दीत त्यांनी मराठीत पुस्तकं लिहिणं सोडलं नाही.

सनदी नोकरी करताना त्यांना बराच मोकळा वेळ मिळत असणार, असा माझा कयास आहे. कारण या साहेबांच्या नावावर पाच-सहा कवितासंग्रहदेखील आहेत, हे कळल्यावर मी निपचित पडल्ये!! त्यांचं ‘माती, पंख आणि आकाश’ हे आत्मकथन कुठंतरी बीएच्या अभ्यासक्रमात आहे, असंही आठवतं.

आज आपल्यापैकी काहींच्या हातात पासपोर्ट असेल. तो तसा आला, याला कारणीभूत हे सर मुळेसाहेब (भा. वि. से.) आहेत. पासपोर्ट प्रक्रिया सुटसुटीत करुन टाकणारे ते कार्यक्षम अधिकारी असल्यानं जगभरात त्यांची ओळख ‘पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया’ अशी झाली आहे. एकंदरित माणूस तालेवार!!

एकंदरित ही पाठपुरावा समितीच इतकी अभिजात दर्जाची आहे की, आता त्यांच्या पाठपुराव्यापुढे कोण टिकणार? या समितीनं दर महिन्याला एकदा दिल्लीत जाऊन केंद्रीय अधिकाऱ्यांकडे तगादा लावून भंडावून सोडायचं, अशी अपेक्षा आहे. त्याच कामगिरीवर या अभिजात मंडळींना नामजाद करण्यात आलं आहे.

दरमहा किमान एकदा केंद्रीय अधिकारी किंवा नेत्यांच्या दाराची बेल वाजवून तगादा लावायचा, हे काम वाटतं तितकं सोपं नाही. एक ना एक दिवस अभिजात दर्जा मिळणारच, यात शंका घेण्याचं आता कारणच काय?

सर ज्ञानेश्वर मुळेसाहेब (भा. वि. से.) यांचं मनापासून अभिनंदन! पासपोर्टमॅन असं बिरुद त्यांना लाभलं आहेच, पण पाठपुरावा यशस्वी झाल्यास, ‘पाठपुरावामॅन ऑफ मराठी’ असा दर्जा आम्ही त्यांना बहाल करु. चालेल नं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT