Dhing Tang
Dhing Tang Sakal
satirical-news

ढिंग टांग : …पवित्र देशा, शेजारी देशा, ‘थापां’च्या देशा!

- ब्रिटिश नंदी

सुप्रसिद्ध, सुविख्यात आणि सुसंस्कृत नेपाळी इतिहासकार खड्गप्रसाद ओली ऊर्फ केपीबा यांचे आम्ही प्रचंड फॅन आहो! भारतीय संशोधकांनी अत्यंत निगरगट्टपणे खोटा इतिहास रचून जगाला सांगितल्यामुळे नेपाळभूमीचे अतोनात नुकसान झाले, ही केपीबा ऊर्फ ओली यांची सुकी खंत आहे. दुसऱ्याच्या गोष्टी हाडपून स्वत:च्या म्हणून सांगणारे भारतीय लोक हेच खरे ‘थापा’डे आहेत, असे त्यांचे स्पष्ट मत आहे. जगातील किती तरी गोष्टी मूलत: नेपाळीच असतात, मग शेजारचे इतर देश त्या चोरुन नेतात, हा खरा इतिहास केपीबांनी सांगितला. ‘गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे, आता माझ्यापास कळ्या आणि थोडी ओली पाने’ ही कविता तुमच्यामते भले आरती प्रभूंची असेल, पण प्रत्यक्षात ती आरतीप्रभु थापा या नेपाळी कवीची आहे, हे त्यातील ‘ओली पाने’ या उल्लेखावरुन सहजच लक्षात यावे. इतिहासकार ओली ऊर्फ केपीबा हे ओरिजिनली नेपाळीच आहेत, हे आधी स्पष्ट केले पाहिजे.

त्यांचा प्राचीन इतिहासाचा अभ्यास प्रचंड दांडगा आहे. गेल्या वर्षीच त्यांनी प्रभुरामचंद्र हे नेपाळी होते, आणि अयोध्याही नेपाळातच होती, हे पुराव्यानिशी शाबित केले आहे. प्रभु रामचंद्र नेपाळी होते, याचा अर्थ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नही होतेच. ते सोडा; महर्षी विश्वामित्रदेखील नेपाळचेच होते, हेही त्यांच्यामुळेच साऱ्या जगाला कळले. त्या काळात जप-तप करण्यासाठी चांगली जागा नेपाळातच होती, हे कोणीही कबूल करेल.- सर्वत्र जंगले आणि हिमशिखरे! त्यामुळे नेपाळ कायम ऋषिमुनींनी गजबजलेला राहायचा. शेजारच्या भारतातून असुर येत आणि ऋषिंच्या यज्ञकर्मात अडथळे आणत, नेपाळी गोष्टी चोरुन नेत. हे असे युगानुयुगे चालू आहे.

महाभारतापासून मोमोजपर्यंत सगळे काही भारतीयांनी नेपाळभूमीतून चोरुन आणले आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुळात नेपाळ ही ओरिजिनल भूमी! भारत त्या काळात मुळी अस्तित्वातच नव्हता. अरबी समुद्राच्या लाटा मुंबईच्या चौपाटीवर नव्हे, तर थेट काठमांडूच्या किनाऱ्याला धडकत असत. उदाहरणार्थ, आयुर्वेद हीदेखील नेपाळचीच देणगी आहे, भारताची नव्हे! नेपाळात प्रचंड जडीबुट्या होत्या. तेथे त्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्या भारतात आणल्या जात. भारतातील लोकांना अपचनाचे प्रचंड विकार होते. त्यामुळे नेपाळातून खास एक जडीबुटी चोरुन आणण्यात आली. ती आता इसबगुल नावाने प्रसिध्द आहे. खुद्द ओली ऊर्फ केपीबा यांनी वेळोवेळी या जडीबुटीचे गुणधर्म सिद्ध करुन दाखवले आहेत. किंबहुना दरवेळी इसबगुल घेतले की ते किमान एक संशोधन पुढे आणतात. केपीबा ऊर्फ ओली यांनी नुकतेच एक नवे संशोधन पुढे आणले असून त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे (खुलासा : याचा मात्र इसबगुलाशी संबंध नाही!) खळबळ माजली आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनी पंतप्रधान आवासाच्या प्रांगणात योगासने करताता केपीबा ऊर्फ ओली यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला तो असा : योगासनांचा शोध हा नेपाळमध्येच लागला. योगाभ्यास ही नेपाळची देणगी आहे. भारत अस्तित्वात नव्हता तेव्हापासून नेपाळी लोक योगासने करत आहेत! हे ऐकून आम्ही त्यांना नम्रपणे सूर्यनमस्कारच घातला, आणि त्यांच्या गौप्यस्फोटापासून संरक्षण मिळवण्यासाठी नाक धरुन प्राणायाम सुरु केला.

इसबगुलाचा शोध नेपाळात लागला असला तरी ते आता सहजासहजी उपलब्ध कां नाही?

अशी खंतही मनात डोकावून गेली.

जरा कान इकडे करा! केपीबा ऊर्फ ओली यांच्यामते भारतीय माणसे मुळात भारतीय नसून मूळची नेपाळीच आहेत!! आता बोला!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT