Amar Adake writes his tour experience of Morjai Ashok s home for tourist
Amar Adake writes his tour experience of Morjai Ashok s home for tourist sakal
सप्तरंग

पद्मसतीचा अशोकदा

डॉ. अमर अडके

त्याच नादात पद्मसतीला अशोकदाच्या घरापाशी पोचलो. ऐंशी वर्षांची उभी उमर एकट्याने जंगलात काढणारा हा माणूस, आता पद्मसतीच्या त्याच्या एकुलत्या घरात हौशी पर्यटक येऊन राहतात.

मुक्काम मोरजाई पठार... अवघं मोरजाई पठार धुक्‍यात लपेटून गेलं होतं. पठारावर सैरभैर फिरणारा वारा.. अंगाला चांगलाच झोंबत होता, इतका की मोरजाईच्या पाषाण मंदिराबाहेर पडणंही नको वाटावं. गेली चाळीस वर्षं डोंगरदऱ्या फिरताना निसर्गाचं हेच चैतन्य मी अनुभवतोय! किल्ल्यावर असो, डोंगरमाथ्यावर असो, भर जंगलात असो... रात्री-अपरात्री फिरण्याची खोड काही केल्या जात नाही. मग तो मोकळा वारा पिऊन, पानांच्या सळसळीत मिसळून जाऊन, पायतळीच्या माती-पाचोळ्याशी बोलून, परिचित आवाजाच्या मालकांच्या इशाऱ्यांचा आदर राखून. गारठलेल्या अंगाने उत्तररात्री स्लीपिंग बॅगमध्ये शिरणं, हा दशकांचा परिपाठच बनलाय. अशा उत्तररात्री काही दीर्घ श्‍वास अन् काही क्षणांचा डोळा लागणं एवढंच पुरेसं असतं. हे उद्याच्या चैतन्याचं पूर्वरूप असतं.

आजचं धुकं काही वेगळाच संदेश देत होतं; पण मनाची खात्री होत नव्हती. सहस्रकांच्या पाषाण मंदिरातल्या भल्या पहाटे जाग आली. सगळं आवरून पाठीवर सॅक बांधली. पद्मसतीच्या दिशेने चालू लागलो, पण मनातून धुकं काही जाईना. त्याच नादात पद्मसतीला अशोकदाच्या घरापाशी पोचलो. ऐंशी वर्षांची उभी उमर एकट्याने जंगलात काढणारा हा माणूस, आता पद्मसतीच्या त्याच्या एकुलत्या घरात हौशी पर्यटक येऊन राहतात. त्याच्याशी जिवाभावाचे दोन शब्द बोलल्याशिवाय दाजीपुराकडच्या डंगात शिरल्याचं मला आठवत नाही. पद्मसतीपासून सावराई सड्यापर्यंतची घनदाट जंगलातली चढ-उतारांची जळवाच्या पाण्याच्या बाजूने जाणारी चाल म्हणजे जातिवंत जंगलाची अस्सल अनुभूती. जळवाच्या पाण्याच्या अलीकडे आणि पलीकडे एक-दोन कि.मी. पाचोळ्याखाली जळवांचंच साम्राज्य, अगदी मे महिन्याच्या गदमदणाऱ्या शेवटच्या आठवड्यातसुद्धा ! सावराई सड्याच्या अलीकडच्या चढापर्यंत त्या प्रेमाने जागोजागी भेटल्या आणि रक्ताशी नातं जोडून गेल्या.

त्यांच्या आपुलकीच्या रक्तखुणांसह अखेरीस सावराई सड्यावर पोचलो. चहूबाजूंच्या उतारावरल्या गर्द जंगलाने वेढलेला हा सडा माथ्यावरच्या तळ्यामुळे एखाद्या पाचूमधल्या मोत्यासारखा शोभतो. दोन-चार दिवसांपूर्वीपर्यंत पडून गेलेल्या वळवाच्या सरींनी सड्यावरच्या वाळलेल्या गवतात हिरवी पाती डोकावू लागली होती; पण वरच्या उन्हाने तापून जमीन उष्ण उसासे सोडत होती, त्यामुळे गदमदत होतं.

त्या दमट दुपारी सड्यावर आमच्याखेरीज दुसरं कोणीच नव्हतं. दाजीपूरकडच्या उताराच्या रस्त्याने जंगलातून चालू लागलो. चर्चा सुरू झाली... येणाऱ्या पावसाची, हवामान खात्याच्या अंदाजाची, त्याच्या लवकर येण्याची, त्याच्या सरासरीची, तो दाखल झाल्याच्या वृत्तपत्रांतील बातम्यांची, त्याने व्यापलेल्या अंदमान आणि केरळाची.... पुन्हा मनात उफाळून आलं रात्रीचं मोरजाईवरचं धुकं!! सावराई सडा ते सांबर कोंड, वाघाचं पाणीमार्गे दाजीपूर ही एक नितांतरमणीय निसर्गयात्रा असते. या जंगलाकडून जे हवं ते सर्व मिळतं. या जंगलाचं वाचन ही एक अनोखी अनुभूती असते. इतकंच काय, इथला निसर्ग सर्व ऋतूंच्या सर्व स्वरूपाचे सर्व संकेत देतो, हे मी अनेक वेळेला अनुभवलंय.

अरण्य, घाटवाटा आणि दुर्गवाटांवर निसर्ग हा असा भेटतो आणि त्याच वाटांवर तिथल्याच मातीतली माणसंही भेटतात. ती या साऱ्यांत इतकी मिसळून गेलेली असतात की, त्यांना वेगळं काढणं शक्‍यच नसतं. या बोरबेट दाजीपूरच्या जंगलवाटेवरचा असाच आमचा अशोकदा. बोरबेट, मोरजाई, मधल्या चढाची नडवेलीची मूळ वस्ती, त्याच्या पुढची पद्मसती, मग घनदाट जंगलाची दाजीपुराकडे जाणारी अरण्यवाट, मधलं विस्मयकारक जळवाचं पाणी, खड्या चढ-उताराची पुढची डंगातली वाट, घनदाट चढाने वर आल्यावर अचानक सामोरा येणारा विस्तीर्ण सावराई सडा, मग दाजीपूरकडच्या हल्लीच्या वाटेवरचं सांबरकोडं, खोलातलं वाघाचं पाणी किंवा सावराई सडा उतरून बक्कळ उताराची हडकीच्या सरीतली रोमांचकारी उतारवाट, खालची ठक्‍याच्या वाडीतली जुनी कोकऱ्यांची घरं, कोकऱ्यांच्या घरापलीकडची विस्तीर्ण पठाराची गवतवाट, खालच्या दरीला लागून असलेली दगडांच्या कुंपणातली उगवाई, तिच्या बगलेतून घसरड्या उताराची दरीच्या खांद्यावरची शिवगडाची वाट, शिवगडाच्या पायथ्याचा कातळ चढ, सतीच्या घुमटीपासून शिवगडाचा बुरुजांमधला प्रवेश, शिवगडाच्या अंतरंगातलं विस्तीर्ण पठार, पश्‍चिमेकडच्या बुरुजांखालच्या कातळ पायऱ्या, त्याच्या पलीकडे कोकणात उतरणारी घोणसरीची जुनी जंगलवाट हे सारं किमान चार दशकं मला भुलवणारं, ओढ लावणारं, वारंवार बोलावणारं, तिथल्या वाड्या-माणसांसकट मनात घरून बसलेलं एक चैतन्यदायी अरण्य आहे.

याच अरण्याच्या उत्तरेच्या बाजूच्या पद्मसतीत उभं आयुष्य गेलेला अशोकदा असाच माझा सोयरा. आम्ही जरी अशोकदादा असं त्याला आपुलकीने एकेरी म्हणत असलो, तरी आमचा अशोकदा आयुष्याची आठ दशकं पार केलेला आहे. तशा याच्या तीन पिढ्या पद्मसतीत वाढल्या. पद्मसती म्हणजे भरजंगलातल्या मोकळ वनातली एकाकी वस्ती. वस्ती कसली, अशोकदाचं एकच घर. बारमाही पाण्याच्या झऱ्याशेजारचं. अशोकदाचं घर हे आमचं या जंगलातलं हक्काचं वस्तीचं स्थान. तिथं ऊन, पाऊस आणि थंडी अशा तीनही ऋतूत घालवलेल्या रात्री केवळ न विसरण्याजोग्या. कुडाच्या भिंती आणि झापाच्या छपरातून मनाला येईल तसं नाचणारा वारा, कधी उसंत न घेता कोसळणाऱ्या पावसातली रात्र, कधी झोपडीही विरघळून जाईल अशा धुक्यातली रात्र, कधी भरकाळोख्या रात्री अंगापर्यंत पोहचणारं तारांगण अशा वर्णनातीत रात्रीचा पद्मसतीचा मुक्काम, हे माझ्या जीवनातलं आनंद संचयाचं भांडार आहे.

सरत्या दुपारी कोल्हापुरातून निघून गगनबावड्याच्या अलीकडे सांगशी फाट्याला वळायचं आणि कच्च्या चढाच्या रस्त्याने कुंभी नदीला ओलांडून घनदाट जंगलातल्या वाटेने बोरबेटच्या पठारावर पोचायचं. उजवीकडच्या मोरजाई पठाराला नजरेत सामावत बोरबेटच्या बाहेरच्या वाटेने पद्मसतीच्या वाटेला लागायचं. आता चित्र खूपच बदललंय. सांगशी फाट्यापासून बोरबेटपर्यंत पक्का रस्ता तर झालाय, पुढेही बावेलीमार्गे रस्त्याने आता राधानगरीपर्यंत जाता येतं. बोरबेट ते पद्मसतीही आता गाडी जाते. पण, हे सगळं नव्हतं तेव्हाचा काळ. बोरबेट ते पद्मसती घनदाट जंगलातून जावं लागायचं. मग कलत्या सूर्याच्या साक्षीने पद्मसतीला अशोकदाच्या घरापाशी चालत पोहोचायचं. तो वाटच बघत असायचा. तिथला सूर्यास्त नेहमीच कातर करायचा. मग त्याच्या झोपडीवजा घरासह सारं जंगलच अंधारात विरघळून जायचं. कंदिलाच्या उजेडात आतलं अंतरंग अधिकच हळवं करायचं. मग हळूहळू घराच्या भोवती कुणाचा तरी वावर जाणवायला लागायचा, कधी खसफस अगदी भिंतीला लागूनच असायची. कधी रात्रीच्या निरव शांततेत चुबूक चुबूक असा पाणवठ्यावरचा आवाज यायचा, कधी दूरवरून जंगल दणाणून सोडणारी डरकाळी अंगाचा थरकाप उडवायची, कधी जवळच शिंगाला शिंग भिडल्याचा, माथ्याला माथा भिडल्याचा, पाय रोवून ताकदीने मारता मारता घेतलेल्या श्‍वासाचा... डोळा कधी लागला कळायचंच नाही. मग भल्या पहाटे गार वाऱ्याच्या झुळकीने, पक्ष्यांच्या किलबिलिटाने आणि अशोकदाच्या नेहमीच्या हालचालीने जाग यायची.

पद्मसतीपाशी उभं राहिलं की पश्‍चिम आणि उत्तरेला घनदाट झाडीने वेढलेलं मोरजाई पठार, समोर दक्षिणेला दूरवर जंगलपट्टा आणि दऱ्यांच्या पलीकडे उंचावर दिसणारा घनदाट झाडींनी व्यापलेला चावराई सड्याच्या अलीकडचा पूर्व-पश्‍चिम घनगर्द डोंगर आणि त्याच्या पलीकडचा इदरगंजपर्यंतच्या धूसर डोंगररांगा... हे कमी म्हणून की काय, पूर्वेच्या कमी दाट अरण्याच्या विलोभनीय खुजा डोंगरांच्या रांगा. प्रत्येक ऋतूतलं या सर्व डोंगरांचं दृश्‍य वेगळं; पण तेवढंच मोहक असतं. इथून मानबेटला जाणं असो, किंवा डोंगरपल्याडच्या जुन्या परंतु आता उठलेल्या नडवेलीवाडीत जाणं असो किंवा डंगातून, जळवाच्या पाण्याजवळून घनदाट जंगलातल्या चढ-उतारांनी सावराई सड्यापर्यंत जाणं असो, या सगळ्या निसर्गयात्रेतले आमचे सोबती म्हणजे धाकलू, शंकर, शांताराम, नामदेव आणि अर्थातच अशोकदाचा पाहुणचार किंबहुना हे माझे सोयरे नसते, तर या जंगलाचं विलोभनीय अंतरंग मी पाहू शकलो नसतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT