सप्तरंग

म्हणे, 'ती' सध्या काय करते!

- बाळू दत्तात्रय राठोड

प्रेमाची दुनिया आणि प्रेमाची किमया काय असते, हे प्रेम झाल्यावरच कळते. तरुणाईच्या मनात प्रेमाची नशा काही औरच असते. प्रेम करून दमावे आणि प्रेमात कोणासाठी तरी झुरावे, असे प्रत्येकाला वाटते. अनेकांना कॉलेज जीवनातील प्रेमाचे किस्से आयुष्यभर आठवणीत असतात. प्रेमात पडल्यावर दिवस कसे फुलपाखरांसारखे उडून जातात कळतच नाही. या जगात ज्यांच्या आयुष्यात प्रेम उमलले नसेल अशी माणसे खूप दुर्मिळ.

प्रेमाचा अनुभव प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने वेगळा असतो. प्रत्येकालाच प्रेमरूपी फुलाचा मध चाखता येत नाही. प्रेमाची नशा इतकी प्रभावी व उत्कट असते की, जरी प्रेमकळीचे फुलात रूपांतर झाले नाही, तरीही तिची किंवा त्याची आठवण मनाच्या एका गाभाऱ्यात आयुष्यभर परागासारखी दडून राहते. जीवनही चालते, संसारही चालतो, पण "ती' किंवा "तो' सतत आठवणीत असतो. भूतकाळात घडलेल्या गोष्टी, सोबत घालविलेले क्षण पुन्हा पुन्हा आठवण्यात मानवी मनाला विलक्षण आनंद मिळत असतो.

मनातील कुठलेही पान कधीही उलगडून पाहा, आठवणींचे हिरवेपण नेहमी ताजे टवटवीत भासते! त्या वेळेचा सगळा काळ डोळ्यांसमोर उभा राहतो... आणि मग त्यातच सुरू होते मनाची घालमेल. आपल्या भावना अनावर होतात आणि प्रश्‍न समोर येतो "ती' सध्या काय करत असेल... सहा जानेवारीला "सध्या ती काय करते' हा चित्रपट चित्रपटगृहांत झळकला आणि सगळ्या कॉलेज कट्ट्यांवर, सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या. युवकांमध्ये तर जोरदार चर्चा रंगलेली दिसते आणि का नाही रंगणार, विषय आहेच प्रत्येकाच्या भावनेशी जुळलेला. कॉलेज कट्ट्यांवर, चहाटपऱ्यांवर व युवकांमध्ये, मित्रांमध्ये एकमेकांची गंमत करीत एकमेकांना चिडवले जात आहे. गमतीदार पद्धतीने चर्चा रंगल्या आहेत. 'काय मित्रा, काय मग कुठे आहे सध्या तुझी "ती'... काय करते...'' 

या चित्रपटाच्या निमित्ताने विविध प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड होऊ लागले आहेत. अनेक मेसेज व्हायरल झाले आहेत. ट्विटर, फेसबुकवर तर "# ती सध्या काय करते' असे हॅशटॅग वापरत तरुणाई सैराट झाली असल्याचे दिसते. प्रेमातील आठवणी, मित्रांमधील गमतीजमती, राजकारणामधील टीकाटिप्पणी व समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब यामध्ये दिसून येत आहेत. असेच काही व्हायरल झालेले मेसेज आपल्यासाठी... 
#ती_सध्या_काय_करते_!!!??... 

रंग, रूप आणि देहाच्या पलीकडे 
तो तिला सन्मानाने 
कधी पाहणार? 
याची वाट बघतेय... 
भररस्त्यात तिची छेडछाड 
तिच्यावरचे बलात्कार 
कधी थांबणार? 
याची वाट बघतेय... 

ती सध्या काय करतेय..? 

ती काहीही करू दे 
तू काय करतोय ते बघ अगोदर 
तुझे खायचे हाल आहेत 
जगतोय बापाच्या जीवावर आणि वर तोंड करून विचार करतोय #ती_सध्या_काय_करतेय म्हणे... 


"ती' म्हणजे नेमकी कोणती? 
बसमध्ये दररोज दिसणारी? 
गावी गेल्यावर भेटलेली? 
कॉलेजमधली? 
कुणा नातेवाइकाच्या लग्नात ओळख झालेली? 
जुन्या ऑफिसमधली? 
जाम confuse आहे... 

अशा गमतीजमती मेसेजबरोबर चिंतन करायला लावणारा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात आहे. या चर्चेच्या निमित्ताने प्रत्येकाला प्रेम, विरह, आठवणी, यातून आयुष्य कसे बदलते हे मात्र विचार करायला लावलेले आहे. जगातील आत्यंतिक आनंद विश्‍वापैकी एकमेव प्रेमविश्‍व मानणारी तरुण पिढी आता अधिकच पुढे गेलेली दिसते. "ती' काय करते यापेक्षा आपण काय करतो हे अधिक चांगले. "ती'च्या भावविश्‍वातील आणखी वेगळेपण शोधायला आपल्याला नक्कीच एक सुंदर मार्ग गवसल्यावाचून राहणार नाही. 

प्रेम हे जणू मांगल्याचेच प्रतीक... जिथे मांगल्य तिथेच सत्य... जिथे सत्य तिथेच शिव आणि जिथे शिव तिथेच सुंदरता... आणि ही सुंदरता असते फक्त नि फक्त तिच्यातच... ती कोण? तीच ती शिवाची पार्वती, कृष्णाची राधा, प्रभुरामाची सीता... हो ती... तीच आपली माती आणि माता... हा भाव जर जागृत झाला तर मग काय... तिच्यावर झालेले अन्याय, अत्याचार... आणि होत असलेले अनन्वित छळ औषधालाही उरणार नाहीत. काय तर दोस्तांनो, प्रेम हे चांगल्या मनातच रुजत असतं... त्याला चांगल्या विचारांची गरज असते. चित्रपटातील "ती' फक्त एक भलावण असते. अंतरहृदयातील "ती' मात्र शाश्‍वत शक्ती असते. अनेकदा हीच शक्ती आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करायला तयार होते... प्रेम म्हणजे "लग्न' नव्हेच... तर आठवणींचे फार मोठे न सरणारे आणि न उरणारे असे मधुर फळ... बस खात खात आस्वाद घेत राहावं माणसानं... अशीच एखाद्या कातरवेळी आठवावं आणि सांगावं मनाशी मनाला... होय, ती मला उभारी देतंय माझ्याच जगण्याला... "ती'च्या साठी झुरत झुरत जगावं एखाद्या कलंदरासारखं... कुठलेही आढेवेढे न घेता... विरहाच्या पागोळ्यात लपेटून घ्यावं स्वतःला आठवणींच्या मोरपिसात... असो... शेवटी प्रेमात पडलेल्या व यातून विरहात जाऊन आठवणीत जगत असलेल्या मित्रमैत्रिणींना एकच सांगेल... प्रेमात थोडं झुरावं.... प्रेमात थोडं मरावं... विरहात जळूनसुद्धा "फिनिक्‍स'सारखं उरावं... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT